लोकनेते एकनाथ भगत स्मृती चौकाला मागणीचा जनतेतून जोर वाढला.
लोकनेते एकनाथ भगत यांच्या नावाने त्यांच्या स्मृती जपण्यासाठी दिवा मध्ये एका चौकाला नाव द्यावे -सौरव जयश्री संदीप आढांगळे(युवक उपाध्यक्ष RPI(A), दिवा विभाग.)
ठाणे - दिवा शहरातील आंबेडकरी चळवळीला स्वतःचे संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे, आगरी समाजाचे अभिमान व रिपब्लिकन पक्षाचे ओबीसी आघाडी अध्यक्ष दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या नावाने दिवा विभागात एक चौक उभारण्यात यावा, अशी तीव्र मागणी दिव्यातील आंबेडकरी समाजातून जोर धरत आहे.
आगरी समाजात जन्मलेले पण विचारांनी आंबेडकरी, भगत यांनी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत समाजाच्या न्याय, हक्क आणि संघटनासाठी झगडण्याचं कार्य केलं. “एक गाव, एक जयंती उत्सव मंडळ” ही संकल्पना दिव्यात साकार करून त्यांनी समाजात एकता निर्माण केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना त्यांनी प्रत्यक्ष कृतीत आणले.
खैरलांजी हत्याकांडानंतर दिवा शहरातून रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून निघालेल्या मोर्चाचे नेतृत्व एकनाथ भगत यांनी केले होते. बौद्ध समाजाच्या न्यायहक्कासाठी लढणारे हे योद्धा नेते म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या व दिनेश पाटील यांच्या अथक प्रयत्नातून दिवा शहरात बुद्ध विहार आणि जय भीम स्तंभाची उभारणी झाली.
संविधान रॅलीची संकल्पना प्रथमच दिवा शहरात राबविण्याचे श्रेयही त्यांनाच जाते. सामाजिक सलोखा टिकविण्यासाठी, ओबीसी व बौद्ध समाजातील तरुणांना चळवळीशी जोडण्यासाठी भगत यांनी अविरत प्रयत्न केले.
२२ जुलै २०२५ रोजी त्यांच्या निधनानंतर दिव्यातील आंबेडकरी समाज शोकसागरात बुडाला. श्रद्धांजली वाहण्यासाठी स्वतः केंद्रीय मंत्री व रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले साहेब दिवा येथे आले होते. त्यांनी भगत यांच्या स्मरणार्थ चौक उभारणीसाठी निधी देण्याचं आश्वासन दिलं. तसेच आमदार राजेश मोरे यांनीही चौकाच्या कामासाठी सहकार्य करण्याचं वचन दिलं आहे.
जनभावना ओळखून, लवकरच दिवा प्रभाग समितीकडे “लोकनेते एकनाथ भगत चौक” अशी अधिकृत मागणी दिनेश पाटील (दिवा शहर अध्यक्ष RPI-A) यांच्या नेतृत्वात सादर करण्यात येईल.
दिव्यातील प्रत्येक समाजबांधवाच्या अंतःकरणातून एकच आवाज येत आहे —
> “आंबेडकरी चळवळीचा मशालधारी,
एकनाथ भगत अमर राहो!” 🔵

Leave Comments
Post a Comment