महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा युवकांना संदेश
Saturday, 10 February 2024
0
*"महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा युवकांना संदेश."* भाग 1 Dr. Babasaheb ambedkar information in marathi
===================================युवकांच्या परिषदेत मला जे सांगावयाचे आहे ते मी पुस्तक रुपाने प्रसिद्ध करू इच्छित होतो. तथापि कामाच्या वाढत्या व्यापामुळे ते आज जरी शक्य झाले नसले तरी ते मी लवकरच सर्व पुस्तक रुपाने प्रसिद्ध करेन. आजच्या प्रसंगी मी फक्त महत्वाच्या एक दोन गोष्टी सांगू इच्छितो.माझी चाळीशी उलटून गेली असल्याने मी आता युवक नाही हि कबुली मी दिलीच आहे. मनुष्याने आपल्या आयुष्यात खाणे, पिणे व जगणे हि आयुष्यातील इतिकर्तव्यता मानता कामा नये. खाणे-पिणे हे जगण्याकरिता असावे व जगणे हे मानमरातबाचे व समाजास भूषणभूत होण्यासाठी समाजसेवेचे असावे. 'खाण्याला काळ व भुईला भार' असे जगणे असेल काय नी नसेल काय सारखेच आहे. याबाबतीत प्रसिद्ध नाटककार कै. गडकरी यांनी एके ठिकाणी म्हटले आहे कि,'जोपर्यंत समाज आपली मानमान्यता ठेवतो तोपर्यंतच जगण्यात भूषण आहे.' नाहीतर अप्रिय होऊन अगदी म्हातारा होऊन बिछान्यास खिळून अगर सुनामुलांच्या तिरस्कारास पात्र होऊन झिजून झिजून जगण्यापेक्षा त्या अगोदर आलेले मरण भूषणाचे असते.
![]() |
| Dr.babasaheb ambedkar information in marathi |
मी एकेकाळी तरुण होतो तेव्हा माझ्या अनुभवाच्या गोष्टी मी आपणास सांगू इच्छितो. तरुणांनी नेहमी आपल्यापुढे उदात्त ध्येय ठेवले पाहिजे. तरुणांनी एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे कि कोणतीही चांगली गोष्ट संपादन करण्यासाठी तप करावे लागते. म्हणूनच आपल्यात एक म्हण रूढ आहे कि, 'तपा अंती फळ.' कार्य आत्मोन्नतीचे असो राष्ट्रन्नतीचे असो कशाचेही का असेना त्यासाठी सतत प्रयत्न करावयास हवे आहेत. माणसाने त्या कार्यास स्वतःस वाहून घेतले पाहिजे. मी अनेक अर्वाचीन तरुण पहिले आहेत कि जे 15 मिनिटे टेबलावर सतत बसू शकत नाहीत, त्यांना घटकोघटकी विडी ओढावी लागते. चहा प्यावा लागतो, त्याशिवाय त्यांना कामच करता येत नाही. हे योग्य नाही. कोणीही इसम आपल्या उपजत बुद्धीवर पराक्रम करू शकत नाहि जगात खुळी माणसे फारक कमी निपजतात तसेच बुद्धीचा विकास करणेहि दरेकाच्या हातची गोष्ट आहे. 24 तासापैकी सतत 20 तास टेबलावर बसून काम करता आलं पाहिजे. मी माझ्या विद्यार्थी दशेत येथे परदेशातही सतत 20 तास टेबलावर बसून काम केले आहे. ज्या कोणास आपल्या बुद्धीचा प्रभाव वाढवायचा आहे त्यांनी तप केले पाहिजे, श्रम केले पाहिजेत.
Dr. Babasaheb ambedkar information in marathi
मनुष्य संकटात अगर दारिद्र्यात सापडला म्हणजे तो निराश होत असतो. आपणास यश मिळणार नाही अशी भावना त्याच्या मनात उत्पन्न होते. जर का या भावनेने मनुष्यास घेरले म्हणजे तो मनुष्य आयुष्यात कुचकामाचा ठरतो. हरेक तरुणाने आशा कधीच सोडू नये. ज्या दिवशी तो आशा सोडील त्या दिवशीच तो जगात जगला काय आणि मेला काय सारखाच होईल. हरेक तरुणात महत्वकांक्षा असली पाहिजे. महत्वकांक्षेशिवाय मनुष्य धडपड व प्रयत्न करूच शकत नाही. यासाठी अस्पृश्य मानलेल्या तरुणांमध्ये महत्वकांक्षेचं बी प्रथम रुजले पाहिजे. आज आपण जेथे जेथे जाल मग ती मामलेदार कचेरी असो कलेक्टरचे ऑफिस असो अगर कोर्ट असो, दर ठिकाणी या पांढरपेशा भट ब्राह्मणांचाच सूळसुळाट झालेला दिसेल. या सर्व परिस्थितीवरून इतर जणांना निराश होणे हे जरी स्वाभाविक असले तरी आज आपण निराश न होता मनात उच्च महत्वकांक्षा धरून त्या दृष्टीने प्रयत्नांची शिकस्त करावयास हवी आहे. मला जरी मुंबईचा गव्हर्नर केले तरी ते कमीच होईल असे मानणारा मी आहे. हे सांगण्याचा मतलब इतकाच कि, आपल्यापैकी दरेकाने उच्च महत्वकांक्षा बाळगून ती फलद्रूप करण्याचा कसोशीने प्रयत्न केला पाहिजे.
(12 फेब्रुवारी 1938 रोजी मनमाड येथे अखिल जी.आय.पी. रेल्वे अस्पृश्य कामगार आयोजित युवक परिषदेत केलेले भाषण)
संदर्भ:- डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखाण आणि भाषणे, खंड 18 भाग 2, पान नं-115,116.
संकलन:- प्रकाश कदम.
THE REPUBLICAN.
Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment