जगाचे कल्याण बुध्द विचारानेच
जगाचे कल्याण बुध्द विचारानेच
आज सारे जग संपत्तीच्या मोहाने पछाडले आहे. प्रत्येक जण आपली संपत्ती कशी वाढेल या साठी पराकाष्ठा करतो आहे. त्या करीता एकमेकांना जीवानीशी संपवण्याचे काम चालु आहे. हे आपण पहातो आहोत. जग युद्धाच्या छायेखाली भयभीत झाले आहे, आणि युध्दाचे कारण आहे संपत्तीचा मोह. तेलाच्या अनेक विहिरी बॉम्ब हल्याने उध्वस्त केल्या जात आहेत. हे सारं का आणि कशासाठी एक देश दुसऱ्या देशा जवळ युद्ध करून आपली सत्ता प्रस्थापित करू पहातो आहे, याचे कारण आहे जगावर सत्ता प्रस्थापित करून त्या देशाला आपले वर्चस्व सिद्ध करायचे आहे. सारे जग मोहाने पछाडले आहे. आज प्रत्येक दिवसाच्या बातमीची सुरूवात एखाद्या माणसाच्या खुनाने होते आहे, भाऊ भावाला, सख्या बहिणीला भाऊ गळा आवळून मारतो आहे.आई वडिलांना मुलं जीवानीशी संपत्ती साठी खुन करून संपवीत आहेत. संपत्तीचा मोह दिवसें दिवस वाढतो आहे. राजकारणात एकाला निवडणुकीचे तिकीट मिळाले म्हणून दुसऱ्यांने त्याला ठार मारल्याच्या घटना आपण बातम्यां मध्ये वाचल्या आहेत हे सारं कशासाठी होत आहे संपत्ती साठी. संपत्तीचा मोह जगातल्या कोणत्याही माणसाला आवरता येत नाही, आणि म्हणूनच आज जगाला बुद्धाच्या विचारांची गरज आहे.
बुद्ध सांगतात "दु:खाचं मुळ कारण आहे तृष्णा(मोह) हाव आणि या मुळेच जग आणि जगातील माणसे या मोहाने पछाडली आहेत. बुद्ध म्हणतात याचे कारण आहे अज्ञान, आणि हे अज्ञान जर दुर करायचे असेल तर प्रत्येकाने योग्य शिक्षण घेऊन स्वयंप्रकाशीत होणे गरजेचे आहे.प्रत्येकाने आपल्याच स्वतःला समजून घेतले पाहिजे. आपल्यातील वाईट विचारांचा त्याग करून आदर्श चांगल्या विचारांचा स्विकार केला पाहिजे तरच हे जग आणि जगातील प्रत्येक माणूस सुखी होऊ शकतो.
बुद्ध म्हणतात "मी सांगतो आहे म्हणून नव्हे तर आपल्यास पटले तरच माझे विचार आपण मान्य करा.
संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर देशाला आज बुवा बाजी आणि अंधश्रद्धेने विळखा घातला आहे अशा वेळी बुद्धाचे शास्त्र शुद्ध विचारच आज जगाला या अंधश्रद्धेच्या विळख्यातून वाचवू शकतात. बुद्ध म्हणतात " एखादी गोष्ट आपण स्वतः आपल्या डोळ्यांनी पहात नाहीत, तो पर्यंत त्या गोष्टीवर विश्वास ठेऊ नका. त्या गोष्टीचा प्रत्यक्ष तुम्ही अनुभव घ्या तरच ती मान्य करा".जो पर्यंत आगीचा चटका आपल्याला लागत नाही तो पर्यंत तेथे आग आहे हे मान्य करू नका.
बुद्धाचे तत्त्वज्ञान आज सुद्धा जसेच्या तसे जगाला तंतोतंत लागू होत आहे एखादी गोष्ट किंवा अनुभव विज्ञानाच्या कसोटीवर पडताळून पहा तरच स्विकारा असे बुद्ध सांगतात.
बुद्ध तत्वज्ञान माणसाला माणूस म्हणून सन्मान पुर्वक वागवायला सांगते, प्रत्येकाने प्रत्येका जवळ प्रेमाने वागले पाहिजे. आपल्या मध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित केला पाहिजे.तरच आपण आपल्या जीवनात विकास करू शकतो. आपले जीवन विकसित करण्यासाठी बुद्धांच्या आर्य अष्टांगिक मार्गाचे आपण पालन केले पाहिजे.आज जगाला बुध्द विचारांची गरज आहे आणि म्हणून आजच्या बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने बुद्धाला म्हणजेच बुद्ध विचारांना शरण जाऊ या.
प्रा.डॉ.संजय हिराजी खैरे
अध्यक्ष अपरान्त साहित्य कला
प्रबोधिनी जिल्हा रायगड.


अतिशय सुंदर, विचारप्रवर्तक आणि आजच्या काळाची गरज अधोरेखित करणारा लेख. तथागत बुद्धांनी सांगितलेली करुणा, प्रज्ञा, समता, विवेक आणि तृष्णेपासून मुक्तीची शिकवण आजच्या संघर्षग्रस्त जगासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवता आणि बंधुभाव यांवर आधारित बुद्धविचार समाजाला अधिक शांततामय व न्याय्य दिशेने नेऊ शकतात.
ReplyDeleteप्रा. डॉ. संजय हिराजी खैरे सरांनी बुद्धविचारांची आजच्या सामाजिक वास्तवाशी सांगड घालत अत्यंत प्रभावी मांडणी केली आहे. अशा प्रबोधनपर आणि वैचारिक लेखनासाठी मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा. 💐🙏
नमो बुद्धाय! जय भीम!
— शक्ती गौतम भिसे
"जयभीम खैरे सर🙏
ReplyDeleteजगाचे कल्याण बुद्ध विचारानेच" हा तुमचा लेख मुद्द्याला हात घालणारा आहे.आज जग ज्या युद्ध,द्वेश आणि विषमतेने होरपळत आहे,त्यावर बुद्धाचा मैत्री, करुणा आणि प्रज्ञेचा मार्ग हाच एकमेव उपाय आहे,हे तुम्ही अगदी बरोबर मांडले आहे.
बाबासाहेबांनी हाच विचार ओळखून आपल्याला बुद्ध धम्म दिला.विज्ञानवाद आणि समतेवर आधारलेला हाच विचार माणसाला माणूस म्हणून जगवतो.
*जयभीम,नमोबुद्धाय*🙏