स्वाभिमानी रिक्षावाले : ‘भवतू सब्ब मंगलम्’मधून झालेली एक ग्रेट भेट
स्वाभिमानी रिक्षावाले
आज मी विरारला गेलो होतो. रिक्षामध्ये स्टेशनला येण्यासाठी बसलो होतो. नेहमीप्रमाणे स्टेशनकडे जाणारा रस्ता ट्रॅफिकमुळे जवळजवळ बंद होता. मी समोर पाहिले. रिक्षाच्या काचेवर लिहिले होते, “भवतू सब्ब मंगलम्.” मग नंतर रिक्षाच्या हँडलकडे पाहिले, तर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्धांच्या प्रतिमांना हार घातलेला होता.
मला खूप आनंद झाला. त्या रिक्षावाल्यांना मी म्हटलं, “जरा थोडं बाजूला होता का? मला फोटो घेऊ द्या.” रिक्षावाले म्हणाले, “जयभीम का?” मी म्हटलं, “हो, जयभीम.”
पुढे रिक्षावाले म्हणाले, “अहो, बाहेरच्या देशात भारत ही बुद्धाची भूमी म्हणून लोक ओळखतात. रामाची भूमी नाही.”
मला कमाल वाटली त्यांच्या एकदम मोकळेपणाने बोलण्याची. आणि स्वाभिमान वाटला त्या दोन प्रतिमांना पाहून. मनात विचार आला की, किती अभिमान आहे या व्यक्तीला आपल्या धम्माचा. नाहीतर आमचे काही बांधव, “धम्म बुद्ध आहे म्हणून सांगणार आणि डोक्यात इतरांचे विचार घेऊन वागणार.” भल्या-भल्या माणसांचा असा अनुभव येतो आहे.
या सगळ्यांसमोर मला ते रिक्षावाले खूप श्रेष्ठ आणि धिट वाटले.
पुढे ते म्हणाले, “सर, देव आहे का?” रिक्षात इतरही पॅसेंजर बसले होते.
“अहो, ते पुण्याचे विद्यानंद बापट म्हणतात की, ‘देवाला कोणी पाहिलं आहे का?’”
आपली माणसं म्हणे पूजतायतं. मी म्हणालो, “हो, डबक्यात परत परत जात आहेत. काय करणार.”
तोपर्यंत विरार स्टेशन आले. मी पैसे देऊन विचारलं, “साहेब, तुमचं नाव काय?”
ते म्हणाले, “योगेश भिकुराम खैरे.”
मी अजून आनंदित झालो. म्हटलं, “मी पण खैरे.”
आपले गाव कोणते, ते म्हणाले, “श्रीवर्धनमधले सायगाव.”
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्धाच्या दोन प्रतिमांनी दोन बंधूंना एकत्र आणले होते.
मी त्यांना सांगितले, “श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन माझे गाव.”
तेव्हा पटकन ते म्हणाले, “श्रीधर खैरे साहेब माझे नातेवाईक आहेत.”
मी म्हटलं, “तेसुद्धा माझे बंधु आहेत.”
मला फारच आनंद झाला होता.
एका रिक्षाचालकाने आंतरराष्ट्रीय स्तरावरची गोष्ट सांगितली होती. नाहीतर आमचे बंधू-भगिनी कितीही टाहो फोडा, डबक्यातच जात आहेत.
शेवटी हिम्मत महत्त्वाची. त्यांच्या काचेवर समोरच मोठ्या अक्षरात लिहिलेले होतं, “भवतू सब्ब मंगलम्.”
जयभीम म्हणून त्यांचा फोटो घेतला आणि मी निघालो. तेव्हा नजरेसमोर येत होते, “भवतू सब्ब मंगलम्.”
आज एक ग्रेट भेट झाली होती..
प्रा. डॉ. संजय हिराजी खैरे
अध्यक्ष, अपरान्त साहित्य कला
प्रबोधिनी, जिल्हा रायगड
बुधवार,दि.२३/९/२०२६

Leave Comments
Post a Comment