"राजा ढाले" आंबेडकरी विचार विश्वातील प्रज्ञावंत ‘राजा’

आंबेडकरी विचार विश्वातील प्रज्ञावंत ‘राजा’

तुम्हला राजा ढाले यांच्या बदल काय वाटते ते कॉमेंट्स मध्ये नकीच सांगा हिच त्यांना आदरांजली💐💐

आंबेडकरवादी विचारविश्वाला एक नवा आयाम देणारे प्रज्ञावंत राजा ढाले यांचे मंगळवारच्या पहाटेला परिनिर्वाण झाले आहे. सत्तरच्या दशकात मलूल होत जाणाऱ्या आंबेडकरवादी राजकीय आणि सामाजिक विश्वाला आपल्या खणखणीत प्रज्ञेने अभिसिंचीत करून त्यात जोम आणण्याचे आणि जोश भरण्याचे ऐतिहासिक कार्य राजा ढाले यांनी केले. विझत जाणाऱ्या आंबेडकरी राजकीय प्रवाहाला पुन्हा गतिमान करण्यासाठी त्यांनी दलित पँथरचा विद्रोहवणवा प्रज्वलित केला. भोगलेल्या दुःखाचे रडगाणे गात भावनिक साहित्य निर्मितीच्या आवर्तात अडकलेल्या तत्कालीन दलित साहित्याला राजा ढालेंनी वैचारिक बुद्धिवादी प्रतीवादाच्या पायावर अधिष्ठित केले. बौद्ध धम्माचा गाढा अभ्यास करून आंबेडकरवादी विचारप्रवाहाच्या नव्या वाटा राजा ढालेंनी निर्माण केल्या. त्यांच्या निधनामुळे एक लढाऊ संघटक, प्रज्ञावंत विश्लेषक,निष्ठावंत चिंतक, सव्यसाची लेखक, दशसहेस्त्रू वक्ता काळाच्या पडद्याआड झाला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनानंतर थोड्याच काळात आंबेडकरी चळवळीचे रुपांतर निव्वळ राजकीय चळवळीत झाले. त्यातही रिपब्लिकन नेत्यांच्या वैय्यक्तिक महत्वाकांक्षा व गटबाजीमुळे चळवळीची छकले उडाली. बाबासाहेबांच्या हयातीत चळवळीचा जो धाक निर्माण झाला होता तो या काळात पूर्णपणे विरून गेला होता. खेड्यापाड्यात राहणाऱ्या धर्मांतरित बौद्ध जनतेवर सवर्ण म्हणविणाऱ्या हिंदूंकडून होणाऱ्या अन्याय-अत्याचाराने परिसीमा गाठली होती. मेंदूच्या ठिकऱया उडविणारे अत्याचार, रिकाम्या पोटांचे आक्रोश, मरणाच्या खस्तांचे उमाळे, उद्याच्या चिंतांचे धुमसणे यांच्याकडे लक्ष द्यायला कॉंग्रेसचे अंगवस्त्र म्हणून वावरणाऱ्या रिपब्लिकन नेत्यांना वेळ नव्हता. अशा स्थितीत मुंबईत शिक्षण घेण्यासाठी आलेल्या आणि सिद्धार्थ विहार वसतिगृहाच्या एका लहानश्या खोलीत पुस्तकात डोके खुपसून बसणाऱ्या राजा ढालेंचे मन आणि मस्तक विदीर्ण केले. मेंदू कुरतडत जाणाऱ्या या भयाण वास्तवाने राजा ढालेंमधील लढाऊ पँथर जागा केला. राजा ढालेनी सभोवतालच्या निर्दय वास्तवावर आपल्या विद्रोही कवितांच्या माध्यमातून आग ओकणाऱ्या विद्रोही तरुणांना संघटीत केले. अन्याय अत्याचाराचा मुकाबला करून आपल्या बांधवांमध्ये स्वाभिमानी जीवनाची उमेद जागवायची असेल तर कवितेत बंदिस्त असलेला विद्रोहाचा वणवा वाड्या-वस्त्यांपर्यंत पोहोचला पाहिजे हे राजा  ढालेनी आपल्या सहकारी तरुणांना पटवून दिले. आपल्या खणखणीत लेखणीच्या जोरावर त्यांनी आंबेडकरी चळवळीला पुन्हा गतिमान करण्याची रणभेरी फुंकली. यातूनच अमेरिकेतील ब्लॅक पँथरच्या धर्तीवर दलित पँथरची निर्मिती झाली. यामध्ये त्यांना नामदेव ढसाळ,उमाकांत रणधीर, विठ्ठलराव साठे, प्रा. अरुण कांबळे, गंगाधर गाडे यांसारख्या सळसळत्या तरुणाईची साथ लाभली. या तरुणाईने विद्रोहाचा एल्गार बुलंद केला.उद्ध्वस्त मानवतेवर केले जाणारे अत्याचार समाप्त करण्यासाठी तरुणांचा हा झंझावात गावाखेड्याच्या वेशीपर्यंत पोहोचला. अत्याचाराच्या विरोधात केवळ कथा - कविता लिहूनच नव्हे, भाषण ठोकूनच नव्हे तर रस्त्यावर उतरुनही आम्ही संघर्ष करु शकतो हे दलित पँथरने दाखवून दिले. राजा ढालेनी निर्माण केलेल्या पँथरच्या या झंझावताची दखल  तेव्हाच्या राजसत्तेलाही घ्यावी लागली होती. या लढाऊ संघटनेच्या निर्मितीचे, वैचारिक अधिष्ठानाचे, संघटनात्मक बांधणीचे आणि लढ्यात उतरविण्याचे श्रेय  राजा ढालेंचे  होते, ही गाथा  इतिहास आपल्या हृदयात कायमचे कोरुन ठेवील यात शंका नाही.

राजा ढालेंनी आंबेडकरवादी तत्वविचाराला धरुन पँथरच्या निर्मितीचा पाया रचला. मात्र पुढे नामदेव ढसाळांशी वैचारिक मतभेद झाले. ढसाळांना आंबेडकरवादी तत्वविचार अपुरा वाटू लागला.यासाठी त्यांनी या तत्वविचाराला मार्क्सवादाची फोडणी देण्याचा प्रयत्न केला. या स्थितीत राजा ढालेंनी आपल्या बिनतोड युक्तिवादाने आणे प्रज्ञावंत लेखणीने आंबेडकरवादी तत्वविचाराची महत्ता पटवून दिली. त्यांनी आपल्या तात्त्विक निष्ठेंशी कोणत्याही स्थितीत तडजोड केली नाही. आपल्या विचार व तत्वाचा चौकटीत राहून प्रस्थापित विषम व्यवस्थेवर  ते अविश्रांतपणे आयुष्याच्या अखेरपर्यंत चौफेर हल्ला करीत राहिले. तात्त्विक निष्ठेंसाठी आपले सर्वस्व पणाला लावण्याचे त्यांचे हे मोठेपण आंबेडकरी चळवळीतील सर्वच कार्यकर्त्यांना आजही मार्गदर्शक ठरणारे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी  आपल्या,` बुध्द आणि त्यांचा धम्म ` या धम्म ग्रंथात एक सुंदर वाक्य कोरले आहे.  ते असे, `कीर्तीचा लोप ही क्षुल्लक गोष्ट आहे, पण प्रज्ञेचा लोप ही खरोखरीच दुःखद् गोष्ट आहे.`  या वचनाला प्राणपणाने जपण्याचा बाणा राजा ढाले यांनी आपल्या अखेरच्या क्षणा पर्यंत कायम ठेवला. तो जपत असताना त्यांना त्याची मोठी किंमत मोजावी लागली. परंतु त्यांनी याची कधी पर्वा केली नाही. संधीसाधूपणा हा त्यांचा जीवनाच्या शब्दकोषात डोकावला नाही हे त्यांच्या एकंदरीत जीवन प्रवाहातून दिसून येते.
राजा ढाले यांचा स्वभावधर्म वैचारिक व साहित्यिक होता. त्यांचे व्यक्तित्व सौंदर्याने भरलेले होते.त्यांचे हस्ताअक्षर अगदी सुरेख आणि चित्तवेधक होते. त्यांचे वैचारिक साहित्य अलंकारिक शब्दांनी ओतप्रोत भरलेले आणि साहित्यिक सौंदर्यशास्त्रात भर घालणारे आहे. त्यांचे आचार, विचार आणि कृती ही प्रखर आणि विद्रोही असली तरी ती मांडण्याची शैली मात्र मोहक आणि चित्तवेधक होती. राजा ढाले हे  प्रज्ञेशी इमान राखणारे बौध्दिक नम्रता व प्रामाणिकपणा सांभाळणारे  व्यक्तीमत्व होते. मात्र चळवळीवर कुणी वैचारिक हल्ला केला तर त्याला त्याच पध्दतीने  तत्काळ प्रत्युत्तर देण्यात ते कधीही मागेपुढे पाहत नसत.  याची प्रचीती त्यांच्या लेखनातून निरंतर येते. त्यांच्या ‘ अस्तित्वाच्या रेषा’ या साहित्य संग्रहात अशा अनेक वैचारिक लेखांचा खजिना भरलेला आहे.  सन १९७० च्या दरम्यान नागपुरातून पसिध्द होणाऱया `युगवाणी` या पत्रिकेच्या दिवाळी अंकात द.भि.कुलकर्णी यांनी दलित साहित्याला, `साहित्य शास्त्र `नाही.  हे कसले साहित्य?  असा प्रश्न उपस्थित करणारा प्रपंच मांडला होता. त्याला ढालेनी `अस्मितादर्श `च्या दिवाळी अंकात   एक दीर्घ लेख लिहून सडेतोड उत्तर दिले होते. असेच खरमरीत उत्तर त्यानी ख्यातनाम ब्राह्मणी साहित्यिका आणि ब्राह्मणवादी विचारवंत दुर्गा भागवंतांना दिले होते. दुर्गाबाईनी १९७३ साली आपल्या एका भाषणातून वेश्या ही समाजाची गरज भागविते, म्हणून या व्यवसायाला मान्यता मिळावी, असे मत व्यक्त केले होते. याला ब्राह्मणांच्या प्रसार माध्यमांनी उचलून धरले होते. यावर राजा ढालेंनी चंद्रकांत मुगले व तुका कोचे संपादित धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या विशेषांकात,`वेश्या व्यवसाय आणि समाज शास्त्रज्ञ` या  शिर्षकाचा लेख लिहून तर्कपुर्ण पद्धतीने सडेतोड उत्तर दिले.  त्यावेळी हा लेख मोठा गाजला होता. `साधना `मासिकाच्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या  विशेषांकात ढालेंनी,  `काळा स्वातंत्र्य दिन` हा लेख लिहून दलित पँथरच्या वैचारिक व बंडखोर भूमिकेची मांडणी ठामपणे केली  होती. अशा अनेक वैचारिकदृष्ट्या  प्रगल्भ  लेखावरुन राजा ढाले नावाचे वैचारिक बंडखोरीचे वादळ पुढे आले होते.
राजा ढाले हे कवी, लेखक, विचारवंत, चिकित्सक व साक्षेपी टीकाकार म्हणून महाराष्ट्रात ख्यातनाम आहेत. तापसी, येरू, चक्रवर्ती, जातक, विद्रोह आदी लघु अनियतकालिकांत आणि  इतर असंख्य अनियतकालिकांत राजा ढाले यांचे लेखन प्रसिद्ध झाले आहे.   त्यांच्या कविता, कथा, प्रस्तावना, प्रसंगोपात लेख, संशोधनात्मक लेखन असे विपुल साहित्य  आहे.  त्यांचे प्रत्येक लेख हे गाजलेले आहेत. त्यांच्या लेखनाचा प्रभाव तेव्हाच्या युवा पिढीवर परिणामकारक रीतीने झालेला होता. त्यातून नवयुवा लेखकांना विचाराची व लिहिण्याची नवी प्रेरणा मिळाली होती. ते कथाकारही होते. त्यांची बहुचर्चित, `धम्मलिपी ` ही पत्रिका सर्वाधिक गाजली. यातून त्यांनी माधव गडकरी, दुर्गा भागवत, बाळ ठाकरे, लक्ष्मणशास्त्री जोशी, बाळ गांगल सारख्या मोठ्या साहित्यिक व विचारवंतांचा समाचार आपल्या `शस्त्रकियेच्या टेबलावर `  या टीकात्मक आणि चिकित्सक स्तंभातून घेतला. `धम्मलिपी मधील हे सदर त्या काळात अत्यंत लोकप्रिय ठरले होते.या सदरातून त्यांनी विषमतावादी हिंदू धर्म, धार्मिक पोथी, पुराण आणि धर्मशास्त्रावर आधारित संस्काराची चिरफाड केली. त्यांच्या वैचारिक मांडणीला उत्तर देण्याची हिंमत त्यावेळी कुणी करीत नसत. एवढा वचक त्यांनी स्थापित केला होता.
पँथर राजा ढाले यांचे अंतिम दर्शन व्हिडीओ
https://youtu.be/x7PdvJQzF-k

आंबेडकरी वैचारिक साहित्य संपदेशिवाय त्यांनी बौद्ध धम्मावर विपुल लेखन केले आहे. बौध्द धम्मातील काही ग्रंथांचा अनुवाद त्यानी केला आहे तसेच धम्म विषयक स्वतंत्र मांडणी मांडणी करणारे लेखन त्यानी केले आहे. त्यांच्या बौद्ध तत्वज्ञानावरील लेखांतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा धम्म विषयक  दृष्टीकोण चिकित्सकपणे मांडल्याचे जाणवते. त्यानी कविता आणि गीतांचीही रचना केलेली आहे. मराठी साहित्यातील ब्राह्मणी प्रवृत्तीचा त्यांनी आपल्या लिखाणातून वेळोवेळी खरपूस समाचार घेतला आहे. ते साठोत्तरी कालखंडातील एक बंडखोर विद्रोही विचारवंत व साहित्यिक होते. इतिहासाच्या संदर्भात त्यांचा एक वेगळा दृष्टीकोन त्यांच्या साहित्यातून दृग्गोचर होतो. या संदर्भात ते म्हणायचे,` इतिहास हे काही करमणुकीचे साधन नाही, ते एक दुधारी शस्त्र आहे.  त्याने गुलामी  लादता येते आणि तशीच गुलामी तोडताही येते. अशा या वाघावर  ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे व्यक्तीपूजक आहेत, असा आरोप झाला असताना  ते उत्तर देतात, `आम्ही डॉ. आंबेडकरांच्या विचाराचे पूजक आहोत. या माणसाने आमच्या आधीच सारा विचार केलायं. काही नवा विचार सुचलायं, असं आम्हाला वाटत असते, तेव्हा ध्यानात येते की, डॉ. आंबेडकर यांना ते आधीच सुचलेले होते. जे-जे विचार मनात येतात, ते-ते बाबासाहेबांनी आधीच लिहून ठेवलेले आहेत. म्हणून आमचे म्हणणे असे की, डॉ. आंबेडकरांना ओलांडून तुम्हाला पुढे जाता यायचे नाही.` आंबेडकरी विचार व तत्वप्रणालीचा हा परीघ आपल्या परीने अलंकारीत करुन राजा ढाले यांनी कीर्ती ऐवजी प्रज्ञेला  अधिक महत्व दिले. राजा ढाले यांचा पिंड राजकीय नव्हता, मात्र  आंबेडकरवादी समाजविश्वात व्यक्तीची ओळख त्याच्या राजकीय भूमिकेवरुनच ठरविली जाण्याचा अनिष्ट पायंडा पडला आहे. उत्तुंग साहित्यिक प्रतिभा असलेले साहित्यिक, अद्वितीय कर्तृत्व असलेले कलाकार, गायक, कवी, प्रशासक इत्यादी सर्वांना आंबेडकरवादी समाज त्यांच्या राजकीय भूमिकेच्या तराजूनेच मोजतो. यामुळे इच्छा असो किंवा नसो आंबेडकरवादी समाजातील लेखक, कवी, कलाकार, प्रशासक यांना राजकीय भूमिका घेणे भाग पडते. यामुळेच राजा ढाले यांनी राजकीय भूमिका घेऊन राजकारणात भाग घेतला होता. ते  काही काळ भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष होते. त्यांनी भारिप बहुजन महासंघाच्या तिकिटावर १९९९ साली उत्तर-मुंबई मतदारसंघातून तर २००४ साली  ईशान्य मुंबई मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविली होती. मात्र मूळचा राजकीय पिंड नसल्याने त्यांना राजकीय क्षेत्रात उपेक्षा आणि विश्वासघाताचे बळी व्हावे लागले होते. याची त्यांना शेवट पर्यंत खंत होती.  या वैविध्यपूर्ण वाटचालीत त्यांनी आज आपला अखेरचा श्वास घेतला. या प्रज्ञा पूजकाला आमचे विनम्र अभिवादन !

©सुनील खोबरागडे
Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel