✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    ध्यान साधनेचा स्वीकार करा, चित्तातील पाच विकार दूर करा | आनापानसती मार्ग

     ध्यान साधनेचा करा स्वीकार, दूर सारुनी चित्त विकार

    १) कामविकार / कामच्छंद

    भांड्यातील पाण्यामध्ये निळा किंवा काळा रंग टाकला असता त्यात आपली पडछाया दिसत नाही त्याप्रमाणे ज्याचे चित्त कामविकाराने व्यग्र झाले असेल त्याला आपल्या हिताचे ज्ञान होत नाही.

    उपाय

    अशा वेळी आत्मलज्जा व लोकापवादभय (लोक काय म्हणतील याचे भय) या दोन मनोवृत्ती वाढवून त्याचे दमन करावे. "अरे तू चांगल्या कुळात जन्मलास, सर्व इंद्रियात तुला संपन्नता मिळाली पण आता समाधीसाठी एकांत स्वीकारला असता कामछंदाने तुझे मन व्यग्र होऊन जावे, हे तुला शोभते काय? दुसरे सूज्ञ लोक तुला काय म्हणतील? मोठया उत्स्फूर्तपणे साधनेला बसला आणि सारा दिवस कामोपभोगांचे चिंतन करीत बसला असे ते म्हणणार नाहीत काय?"

    अशा तऱ्हेने मनास बोध करावा. व कामछंदाचे निवारण करून एकांतस्थळी ताठ बसून अश्वास व प्रश्वास यांचे अनित्य भावनेने अवलोकन करावे. असा हा आनापानसती मार्ग महाफलदायिनी आहे.

    आनापानसती ध्यान साधना - बौद्ध धम्म मार्ग


    २) क्रोध / व्यापाद

    स्वच्छ पाण्याचे भांडे तप्त झाले असता त्यातून वाफा निघतात व पाणी उकळू लागते. अशा वेळी त्यात आपले प्रतिबिंब दिसत नाही त्याप्रमाणे ज्याचे चित्त क्रोधीत झाले असेल त्याला आत्महित कशात आहे याचे ज्ञान होत नाही.

    उपाय

    अशा वेळी आत्मलज्जा व लोकापवादभय (लोक काय म्हणतील याचे भय) या दोन मनोवृत्ती वाढवून त्याचे दमन करावे. "अरे भल्या माणसा, तू आप्तइष्टाला सोडून या एकांतात येऊन राहिलास तरी क्रोधासारख्या भयंकर शत्रूला उराशी घट्ट धरून बसलास याबद्दल तुला लाज वाटावयास पाहिजे. आणि साधू पुरुष तुला काय म्हणतील? इतके सारे शिकलास पण क्रोध आवरण्यास शिकला नाहीस. असे म्हणून ते तुझा उपहास करणार नाहीत काय?"

    अशा तऱ्हेने मनास बोध करावा. व सर्वांप्रति मैत्री भावनेची मनोवृत्ती वाढवून एकांतस्थळी ताठ बसून अश्वास व प्रश्वास यांचे अनित्य भावनेने अवलोकन करावे. असा हा आनापानसती मार्ग महाफलदायिनी आहे.

    ३) आळस / उद्धटपणा

    जर भांड्यातील पाणी शेवाळाने भरले असेल अशा वेळी त्यात आपले प्रतिबिंब दिसणार नाही त्याप्रमाणे मनाला आळसाने ग्रासले असेल तर त्याला आत्महित कशात आहे हे समजणे अशक्य आहे.

    उपाय

    अशा वेळी सुद्धा आत्मलज्जा व लोकापवादभय (लोक काय म्हणतील याचे भय) या दोन मनोवृत्ती वाढवून त्याचे दमन करावे. "अरे भल्या माणसा, तू या एकांतात नंदीबैलासारखा रवंथ करून स्वस्थ पडून राहण्यास आलेला नाहीस. प्रापंचिक लोकांमध्ये जो उत्साह असतो त्याच्या शतपटीने तुझ्या मनात उत्साह हवा. दुसरे साधक तुला काय म्हणतील? प्रपंचाचा भार नको म्हणून तपस्व्याचे ढोंग करून खुशाल झोपून राहिला असे म्हणून ते तुझा उपहास करणार नाहीत काय?"

    अशा तऱ्हेने मनास बोध करावा. बसणे, उभे राहणे, चंक्रमण करणे अशा मार्गांचा अवलंब करून एकांतस्थळी ताठ बसून अश्वास व प्रश्वास यांचे अनित्य भावनेने अवलोकन करावे. असा हा आनापानसती मार्ग महाफलदायिनी आहे.

    ४) भ्रांतता (उद्वेग / बेचैनी / खेद)

    जर भांड्यातील पाणी वाऱ्याने हलू लागले असेल तर अशा वेळी त्यात आपले प्रतिबिंब दिसणार नाही त्याप्रमाणे ज्याचे चित्त भ्रांत झाले असेल, विचलित झाले असेल तर त्याला आत्महित कशात आहे हे समजणे अशक्य आहे.

    उपाय

    याचे निवारण साधनेनेच होत असते. आनापान साधना विचलित चित्ताला योग्य मार्गावर आणून ठेवते. तसेच त्याच्या अभ्यासाने चित्ताचे रक्षण होते. ते संयमित होते. असा हा आनापानसती मार्ग महाफलदायिनी आहे.

    ५) संशयग्रस्तता

    जर भांड्यातील पाणी गढूळ झाले असेल तर अशा वेळी त्यात आपले प्रतिबिंब दिसणार नाही त्याप्रमाणे ज्याचे चित्त संशयग्रस्त झाले असेल, तर त्याला आत्महित कशात आहे हे समजणे अशक्य आहे.

    उपाय

    संशयग्रस्तता आणि संदेह हा आळस, भ्रांतता यामुळे निर्माण होत असतो. अशा वेळी बुद्धाविषयी श्रद्धा बळकट करावी. त्यांच्या कल्याणकारी अगणित गुणांचे अवलोकन केल्याने श्रद्धा वाढीस लागते. त्यांनी दाखविलेला अष्टांगिक मार्ग हा जगातील एकमेव मार्ग आहे जो मानवाला दुःखापासून मुक्ती देतो. म्हणून खरे सुखकर्ते दुःखहर्ते हे भगवान बुद्ध आहेत, अन्य कोणी नाही. हे जाणून साधनेप्रती असलेली संशयग्रस्तता नष्ट करावी.

    अशा तऱ्हेने आळस न करता सकाळ, संध्याकाळ एक एक तास ध्यान साधना केल्यास विकार नष्ट होऊन जीवन निर्मळ होऊ लागते. 'एही पस्सिको' याचाच अर्थ 'या आणि पहा' — प्रत्यक्ष अनुभव घ्या आणि आयुष्यभर ही जीवनशैली कायम ठेवा.

    — संजय सावंत, buddhistcaves@gmail.com



    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: