✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    Waiting for a Visa:-dr.babasaheb ambedkar (अस्पृश्यतेच्या कटू आठवणी)

    डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या हयातीत एकच आत्मचरित्र लिहीले. हे आत्मचरित्र वेटिंग फॉर अ व्हिजा नावाने इंग्रजीत प्रकाशित झाले होते. अवघ्या वीस पानांचे हे चरित्र आंबेडकरी साहित्यातील एक महत्त्वाचा दस्तावेज आहे. सध्या स्टार प्रवाहवर सुरू असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरवगाथा या मालिकेत सुरू असलेला कथानकाचा भाग वेटिंग फॉर अ व्हिजा मध्ये बाबासाहेबांनी लिहीलेल्या कथनावर सुरू आहे. आजवर ज्यांना कुणाला हे आत्मचरित्र वाचवयास मिळालेले नाही खास त्या सर्व दर्शक व वाचकांसाठी इथे क्रमाक्रमाने प्रकाशित करत आहोत. नक्की वाचा. आपल्या वॉलवर शेअर करा. व्हॉट्सअपवर देखील शेअर करा.

    -------------------------------------------------------------------------------

    व्हिजाच्या प्रतीक्षेत

    (अस्पृश्यतेच्या कटु आठवणी)
    🗄 WAITING FOR A VISA ✈

    परदेशीयांना अस्पृश्यता अस्तित्वात आहे, हे माहीत असते; परंतु ती खरे सांगायचे म्हणजे पुढच्या दाराने माहीत नसल्यामुळे (ती त्यांनी प्रत्यक्ष अनुभवली नसल्यामुळे) ती प्रत्यक्षात किती जुलमी आहे, हे समजण्यास ते असमर्थ असतात. बहुसंख्य हिंदूंचा समावेश असलेल्या गावाच्या टोकाला थोडेसे अस्पृश्य राहतात. ते त्या गावाला आत्यंतिक घाणीपासून मुक्त करतात. सर्व प्रकारचे निरोप (सांगावे) पोचविण्यासाठी रोज गावोगाव पायपीट करतात. हिंदूंच्या दारात अन्न (तराळकी) मागतात, दूर अंतरावर उभे राहून हिंदू बनियाच्या (वाण्याच्या) दुकानांतून मसाले व तेल विकत घेतात, गावाला सर्वतोपरी आपले घर मानतात. पण तरीही त्या गावातील कोणालाही कधीच स्पर्श करीत नाहीत किंवा त्यांचा स्पर्शही होऊ देत नाहीत, हे कसे काय शक्य आहे, हे परदेशीयांना समजणे कठीण आहे. सवर्ण हिंदू अस्पृश्यांना जी वागणूक देतात, तिची ओळख करुन देण्याचा उत्तम मार्ग कोणता, हा एक प्रश्न आहे. (अस्पृश्यतेचे) सर्वसाधारण वर्णन अथवा अस्पृश्यांना देण्यात आलेल्या वागणुकीच्या प्रकरणांचा पूर्वेइतिहास, ह्या दोन्ही पध्दतींनी हा उद्देश साध्य करता येईल. मला वाटते की, पूर्वेइतिहासाची पध्दती आधीच्या पध्दतीपेक्षा अधिक प्रभावी ठरेल. ही उदाहरणे निवडताना मी थोडेसे माझ्या अनुभवाकडे व थोडेसे इतरांच्या अनुभवाकडे लक्ष वेधले आहे. माझ्या स्वतःच्या आयुष्यात घडलेल्या घटनांपासून मी सुरुवात करतो.

    आमचे कुटुंब मुळात मुंबई इलाख्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातून आले. जेव्हापासून ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य सुरु झाले अगदी तेव्हापासून कंपनीच्या सैन्यात नोकरी करावी लागल्याने माझ्या वाड-वडिलांनी त्यांचा वारसाने येणारा व्यवसाय सोडून दिला. माझ्या वडिलांनी देखील कुटुंबाची परंपरा पाळली व त्यांनी सैन्यात नोकरी मिळवली. ते अधिकाऱ्याच्या दर्जापर्यंत पोहोचले. ते सेवानिवृत्त झाले तेव्हा ते सुभेदार होते. सेवानिवृत्त झाल्यावर माझ्या वडिलांनी कायमची वस्ती करण्याच्या हेतूने दापोलीला कुटुंब हलविले. परंतु काही कारणास्तव माझ्या वडिलांनी आपला विचार बदलला. कुटुंब दापोली सोडून सातारा येथे गेले. तेथे आम्ही १९०४ पर्यंत राहिलो. मी लिहीत आहे ती, त्याचप्रमाणे मी जी आठवू शकतो ती पहिली घटना सुमारे १९०१ साली घडली. तेव्हा आम्ही सातारा येथे राहत होतो. माझी आई तेव्हा मरण पावली होती. आमचे वडील सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील गोरेगाव येथे कॅशियरच्या कामावर बाहेर होते. तेथे हजारोंच्या संख्येने मरत असलेल्या दुष्काळग्रस्त पीडीत लोकांना रोजगार देण्यासाठी मुंबई सरकारने तलाव खोदण्याचे काम सुरू केले होते. जेव्हा माझे वडील गोरेगावला गेले तेव्हा त्यांनी मला, माझ्यापेक्षा मोठ्या असलेल्या माझ्या भावाला आणि मरण पावलेल्या माझ्या सर्वात लहान बहिणीच्या दोन मुलांना माझ्या आत्याच्या व काही दयाळू शेजाऱ्यांच्या हवाली केले. माझी आत्या अत्यंत मायाळू होती. परंतु तिचा आम्हांला काही उपयोग झाला नाही. ती काहीशी बुटकी होती आणि तिला पायांचा त्रास होता. त्यामुळे तिला कोणाची तरी मदत घेतल्याशिवाय हालचाल करणे अत्यंत कठीण जाई. बऱ्याचदा तिला उचलून न्यावे लागे. मला बहिणी होत्या. त्यांची लग्ने झालेली होती व त्या त्यांच्या कुटुंबासह दूर राहत होत्या. आमची आत्या तिच्या असहाय्यतेमुळे जेवण तयार करण्याचे काम करु शकत नव्हती. त्यामुळे जेवण तयार करणे, ही आमची विशेष समस्या बनली होती. आम्ही भाकरी तयार करु शकत नव्हतो. त्यामुळे आम्ही पुलावावर राहिलो. तो तयार करण्याचे सर्वात सोपे असल्याचे आम्हांला आढळून आले. त्यासाठी तांदूळ आणि मटण मिसळणे, यापेक्षा आणखी काही करण्याची आवश्यकता नसे.

    कॅशियर असल्यामुळे माझे वडील आपले ठाणे सोडून आम्हाला पाहण्यासाठी साताऱ्याला येऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी, आम्हांला गोरेगावला यावे व आमची उन्हाळ्याची सुट्टी त्यांच्याबरोबर घालवावी, असे आम्हाला लिहिले. आम्ही मुले त्या सूचनेने अत्यंत उत्तेजित झालो. कारण, विशेष म्हणजे तोपर्यंत आम्हांपैकी कोणीच आगगाडी पाहिलेली नव्हती.
     मोठी तयारी करण्यात आली. इंग्लिश बनावटीचे नवीन शर्ट, चकाकणाऱ्या भिंगाच्या टोप्या, नवीन बूट, नवीन रेशीम किनारीची धोतरे प्रवासासाठी मागवण्यात आली. माझ्या वडिलांनी आमच्या प्रवासाबाबतचा सर्व तपशील दिला आणि कोणत्या दिवशी आम्ही निघणार हे त्यांना कळवावे असे सांगितले. उद्देश असा की, ते त्यांचा शिपाई रेल्वे स्टेशनवर आम्हाला भेटून आम्हाला गोरेगावला आणण्यासाठी पाठवू शकले असते. ह्या व्यवस्थेनुसार मी स्वतः, माझा भाऊ व माझ्या बहिणीच्या मुलांपैकी एक जण यांनी सातारा सोडले. आमच्या आत्याला शेजाऱ्यांकडे सोपविले. त्यांनी तिची काळजी घेण्याचे वचन दिले. रेल्वे स्टेशन आमच्या जागेपासून १० मैल दूर होते आणि टांग्याची (दोन घोड्यांच्या गाडीची) आम्हाला स्टेशनला नेण्यासाठी व्यवस्था करण्यात आली. आम्ही विशेष प्रसंगासाठी करतात तसा पेहराव केला होता. आम्ही आमचे घर अत्यानंदाने परंतु आमच्या आत्याच्या रडण्या-ओरडण्यात सोडले. ती आमच्या जाण्याच्या दुःखाने बहुतेक कोलमडली होती...

    क्रमशः

    लेखक- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
    संकलक - Er Suraj Talvatkar
    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: