"मी अजरामर विद्यार्थी आहे" :- डॉ.बाबासाहेब आंबेडकर Dr. Babasaheb ambedkar information in marathi

🎓 *विद्यार्थी आंबेडकर* 📚📖✒

मी अजरामर विद्यार्थी आहे :- डॉ.बाबासाहेब आंबेडकर
Dr. Babasaheb ambedkar information in marathi 

डाॅ.आंबेडकरांसारखा *बुद्धिवान* माणूस अस्पृश्य वर्गात पूर्वी जन्मास आला नाही व पुढेही जन्मास येईल असे कोणास वाटत नाही. इतकी त्यांची *विद्वत्ता दांडगी व बुद्धिमत्ता तेजस्वी* आहे. तेव्हा ही विद्वत्ता व बुद्धिमत्ता त्यांनी कशी मिळविली म्हणजे त्यांनी आपली *विद्यार्थीदशा* कशी घालविली. हे समजणे हल्लीच्या व पुढच्या विद्यार्थ्यांनाही अतिशय उपयोगी होईल.
Dr. Babasaheb ambedkar information in marathi
        डाॅ.आंबेडकरांचा जन्म ता.१४ एप्रिल साली उत्तर हिंदुस्थानातील महू मुक्कामी झाला. या ठिकाणी त्यांचे वडील रामजी मालोजी सुभेदार हे लष्करात नोकरीवर होते. त्यांना *पेन्शन* मिळाल्यावर ते आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील मूळच्या *आंबडवे* गावी आले. परंतु तेथे मुलांच्या शिक्षणाची सोय नसल्यामुळे ते दापोलीस (तालुक्याच्या गावी) राहण्यास आले व तेथूनही ते साताऱ्यास राहण्यास गेले. डाॅ.आंबेडकरांचे मराठी चवथ्या इयत्तेपर्यंतचे शिक्षण दापोलीसच झाले व इंग्रजी चवथ्या इयत्तेपर्यंतचे शिक्षण साताऱ्यास झाले. त्यानंतर डाॅ.आंबेडकरांचे चौथ्या इयत्तेपुढील शिक्षण पार पडले. तो काळ आजच्यासारखा सुधारलेला नव्हता. त्यावेळी अस्पृश्यता अतिशय कडक रीतीने पाळण्यात येत असे. त्या कडक *अस्पृश्यतेची झळ* डाॅ.आंबेडकरांना *बाळपणीच* लागली आहे. कदाचित या झळीमुळेच ते आपल्या अभ्यासात उत्तम प्रगतीही मिळवू शकले असतील.
Dr. Babasaheb ambedkar information in marathi
        ज्यावेळेस हायस्कूलमध्ये डाॅ.आंबेडकरांनी संस्कृत विषय घेण्याचे ठरविले त्यावेळेस संस्कृतचे अध्यापक त्यांना तो विषय शिकविण्यास कबूल होईनात. ते तात्या पंतोजी म्हणाले कि, संस्कृत ही देवभाषा आहे आणि वेदातील शब्द *शूद्रांनी* ऐकूही नयेत अशी वेदांची आज्ञा आहे. मग ते वेद हस्तगत करण्याची ही संस्कृत भाषा मी *अतिशूद्राला* कशी शिकवू? ते पाप होणार नाही का? असे या ब्राम्हण बोवांनी म्हटल्यावर पुढे कोणाचे काय चालणार! त्यावेळेस अस्पृश्यांचा वाली कोण होता? निमूटपणे डाॅ.आंबेडकरांना आपला बेत बदलून पर्शियन भाषा शिकावी लागली. यावरून असे दिसून येईल कि, *आजच्या विद्यार्थ्यांपेक्षाही डाॅ.आंबेडकरांपुढे शिक्षणाच्या बाबतीत किती तरी अडचणी होत्या.*
         डाॅ.आंबेडकरांच्या अंगी एक *अतिशय चांगला गुण* आहे तो हा की, त्यांनी कोणतेही काम पत्करले की, त्यात *फत्ते* करून घेतल्याशिवाय ते राहत नसत. पर्शियन भाषा ते इतकी उत्तम शिकले की, *शाबासकी* मिळविण्याइतके *श्रेय* त्यांनी त्यात मिळविले. इ.स.१९०८ साली डाॅ.आंबेडकर मॅट्रिक झाले व इ.स. १९१२ साली ते बी.ए. झाले. तेथपर्यंतचे डाॅ.आंबेडकरांचे शिक्षण सर्वसाधारण असल्यामुळे त्यापासून सध्याच्या विद्यार्थ्यांनी पुष्कळ बोध घेण्यासारखा आहे. डाॅ.आंबेडकरांचे घराणे काही श्रीमंत नव्हते. लहानपणापासूनच ते गरीब स्थितीत राहत आले आहेत. एवढी गोष्ट खरी की, त्यांच्या वडिलांनी गरिबीतही आपला संसार सांभाळून *भीमरावाच्या शिक्षणाकडे अतिशय लक्ष दिले.* स्वतः डाॅ.आंबेडकरांनीही अभ्यासाच्या बाबतीत अतिशय त्रास घेतलेला आहे. त्यांनी शिक्षणाच्या बाबतीत पहिल्यापासूनच किती त्रास घेतलेला आहे याची थोडीशी कल्पना पुढील हकिगत वाचून येईल. डाॅ.आंबेडकर परळला राहत असत. तेथून ते एल्फिस्टन हायस्कूलमध्ये शिकण्यास जात असत. संध्याकाळी घरी आल्यानंतर जेवणखाण अाटोपल्यावर रात्री दहा वाजता ते झोपत असत. कारण, अभ्यासासाठी काही निराळी खोली नव्हती. एकाच खोलीत सर्व कुटुंबाची व्यवस्था असावयाची. तेथेच जेवण तयार करणे, तेथेच जेवणे व तेथेच झोपणे अशी एकंदर व्यवस्था असावयाची. तेथे अभ्यास करावयास जागा कशी मिळावी! परंतु या परिस्थितीतही त्यांनी फरक करून आपला अभ्यास पूरा केला. ते रात्री दहा वाजता झोपत असे वरती म्हटले आहे त्यावरून तुम्हांला वाटत असेल की, सकाळ झाल्याशिवाय ते उठत नसतील, पण असे नाही. त्यांचे आपल्या वडिलांना सांगणे असायचे की, मी रात्री दहा वाजता झोपल्यानंतर मला रात्री एक-दीड वाजता उठवीत जा.
          त्याप्रमाणे त्यांचे वडील रोज रात्री त्यांना एक-दीड वाजता उठवीत असत. मग त्या शांत वेळी भीमराव आपला अभ्यास करीत असत. अभ्यास झाल्यानंतर पुन्हा ते थोडी झोप घेत व सकाळीच उठल्यानंतर ते प्रातःर्विधी उरकल्यावर अभ्यासासाठी जेवल्याशिवायच हायस्कूलमध्ये जात असत. कारण इतक्या सकाळी सकाळी जेवण तयार असणे शक्य नाही. हे जेवण फोर्टमध्ये काम करणारा त्यांचा एक शेजारी कामावर जाता जाता त्यांना हायस्कूलमध्ये पोहोचवीत असे. जेवण म्हटल्यानंतर तुम्हांला जेवणाचा डब्बा तुमच्या नजरेसमोर येईल. परंतु तसे नव्हे. *भीमरावांचे जेवण म्हणजे साधी भाजी भाकर एका कागदात गुंडाळले* की, तो ९ वाजता कामावर जाता जाता भीमरावाच्या स्वाधीन करुन जात असे. त्याप्रमाणे सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा त्यांचा सर्व वेळ शाळेत अभ्यासात जाई. डाॅ.आंबेडकर इतके कसे शिकले याचे आश्चर्य वाटते. परंतु त्याचा विचार केल्यास त्यांचे एवढे शिक्षण कसे झाले याचा उलगडा होतो. दुसराही एक गुण त्यांच्याकडून अलीकडच्या विद्यार्थ्यांनी शिकण्यासारखा आहे. त्यांचे सर्व शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय ते समाजाच्या कोणत्याही भानगडीत पडले नाहीत. प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये हा गुण असणे अत्यंत जरूर व अवश्य आहे. नाहीतर त्यांची शिक्षणात प्रगती होणे शक्य नाही. *आमच्या समाजात विद्यार्थीदशेतच विद्यार्थ्यांना पुढारी होण्याचा मान मिळतो व त्यातच त्यांच्या विद्यार्थीदशेचा अंत होतो.*


  •           कोणालाही दोन अक्षरे येऊ लागली की, निरक्षर माणसे त्यांना मान देऊ लागतात. परंतु एवढ्या *अर्ध्या हळकुंडानेच* आमच्या विद्यार्थ्यांनी *पिवळे*  होऊ नये व फसून जाऊ नये. त्यांनी आपले ध्येय गाठीपर्यंत व शिक्षण पुरे होईपर्यंत कोणत्याही भानगडीत पडू नये. मध्यंतरीच पुढारी न होता अभ्यास पुरा केल्यानंतरच समाज कार्यात पडावे. 

एवढे सांगितल्यानंतर आपण डाॅ.आंबेडकरांच्या पुढील शिक्षणाकडे वळू. डाॅ.आंबेडकरांनी प्रथमपासूनच अभ्यासाच्या कामात अतिशय श्रम घेतल्यामुळे त्यांची *अतिशय हुशार विद्यार्थी यामध्ये गणना होऊ लागली.* ते बडोदे सरकारच्या मदतीने इ.स. १९१३ साली अमेरिकेला शिक्षण घ्यावयास जाऊ शकले व १९१६ सालपर्यंत एम.ए, पीएच.डी, पुढे ते डीएस.सी झाले व १९२३ साली बॅरिस्टरीची परिक्षा पास झाले. बॅरिस्टर झाल्यानंतर वास्तविक रीतीने त्यांची विद्यार्थीदशा संपली. परंतु *डाॅ.आंबेडकर अद्यापही विद्यार्थी आहेत व अखेरपर्यंतही विद्यार्थी राहण्याची त्यांची इच्छा आहे* असे त्यांच्या वाचनावरुन दिसून येते. सदा विद्यार्थी राहण्याचा हा त्यांच्यातील गुण आमच्यातील प्रत्येक साक्षर माणसाने घेतला पाहिजे. आमच्यातील व सर्व समाजातील पुष्कळसे लोक असे असतात की, परीक्षा संपेपर्यंतच ते पुस्तकांचे सोबती असतात. एकदा का परीक्षा संपली की, ते पुस्तकांचे नाव घेत नाहीत. अशा लोकांचे ज्ञान जेमतेच राहणार. *डाॅ.आंबेडकरांची बुध्दी जी तेजस्वीपणे चकाकत आहे त्याला कारण त्यांनी आजन्म पत्करलेली विद्यार्थीदशाच होय.*

*शांताराम अनाजी उपशाम*

*#७ नोव्हेंबर #विद्यार्थी दिन #जनता #१९३३*
Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel