✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    सावित्रीमाईच्या कार्याचा आम्हाला विसर पडला आहे का..

    *"सावित्रीमाईच्या कार्याचा आम्हाला विसर पडला आहे का...?"*


                    एकोणिसाव्या शतकात सावित्रीमाई फुलेंनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत स्वतंत्र विचारशक्तीची साथ देत स्त्रियांसाठी, मुलींसाठी शिक्षणाची दारे खुली केली. खऱ्या अर्थाने स्वतंत्र, आत्मभान जपणारी, आत्मविश्वासू स्त्रीच्या जडणघडणीची सुरुवात त्यांच्या कर्तृत्वापासूनच होते........

              केवळ बहुजन समाजासाठीच नव्हे किंवा केवळ स्त्रियांसाठी नव्हे, तर एकूणच शोषित-वंचितांसाठी सावित्रीमाई फुले यांचे कार्य मौलिक ठरते. आज जगात अनेक क्षेत्रात माहिलांनी उत्तुंग भरारी घेतली आहे. आपल्या कर्तृत्वाच्या भरवश्यावर नुसतं पुरुषांच्या बरोबरीनेच नाही तर दोन पाऊले पुढे राहून काम करतांना दिसत आहेत......

              आज एसटी ड्रायव्हरपासून ते अंतरिक्षात अंतराळवीर होण्यापर्यत, सरपंचापासून ते राष्ट्रपती होण्यापर्यत, खेळापासून ते नाट्य कलेपर्यत, मजुरी करण्यापासून ते एक यशस्वी उद्योजिका होण्यापर्यत अश्या अनेक क्षेत्रात महिलांनी स्वतःच्या कार्यकर्तृत्वाचा प्रभावी ठसा उमटवला आहे..हि कमाल केली शिक्षणाची जननी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आणि शिक्षणमहर्षी क्रांतिसूर्य ज्योतिराव फुले यांनी....

             सावित्रीमाईच्या संघर्षामुळे आज महिला सक्षम झाल्या, एकट्या घरच्या बाहेर जाऊन स्वतःच्या हिमतीवर आपले कार्य करतात. ज्योतिरावांच्या कार्याला सावित्रीमाईची साथ नसती तर कदाचित आज महिलांची काय स्थिती असती हे वेगळे सांगायला नकोच.........

              खरंतर ज्या सावित्रीमाईने महिलांच्या अधिकारासाठी शेण दगड झेलले, समाजाच्या शिव्या खाल्या, अनेक लोकांचा विरोध सहन केला. पण आज सावित्रीच्या लेकी समाजात वावरताना अंतराळात फेऱ्या मारायचे सोडून वडाच्या झाडाला फेऱ्या मारतांना दिसतात. असे चित्र जेव्हा दिसत तेव्हा वाटतं की खरचं आम्हाला सावित्रीमाईच्या कार्याचा विसर तर पडला नाही ना.......?

                  आज महिला अभिमानाने चार-चौघांत वावरतात, प्रत्येक क्षेत्रात निर्भीळपणे कार्य करतात, अनेक विचारपीठावर स्वतःचे मत व्यक्त करतात पण हे सर्व करतांना आपला मेकअप तर उतरणार नाही ना याची हि काळजी घेणाऱ्या अनेक जण  दिसतात........

               आजच्या काही महिलांना उपवासाचे सोमवार, गुरुवार, शनिवार माहित असतात पण ज्या सावित्रीमाईच्या त्यागामुळे, कष्टामुळे, हिंमतीमुळे महिलांना स्वातंत्र्याची फळे खायला मिळत आहेत त्या सावित्रीमाईच्या जयंती,पुण्यतिथीचा आमच्या काही महिलांना विसर पडलेला दिसतो.........

                  गौतम बुद्धांनी स्त्रीमुक्तीसाठी पहिले क्रांतिकारी पाऊल उचलले होते. तिच्याकडे मानवतावादी दृष्टीकोनातून ‘एक मानव’ म्हणून बघितले. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यात महिलांना संरक्षण देऊन त्यांच्या सुरक्षिततेची हमी घेतली......

                  एकोणिसाव्या शतकात क्रांतिसूर्य ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले’ यांनी स्त्रीमुक्तीसाठी आशेचा किरण दाखविला. पुढे महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजव्यवस्थेत स्त्रियांना समानतेने वागविले जात नाही म्हणून त्यांना कायदेशीर हक्क मिळावे यासाठी संविधानामध्ये विशेष अधिकार दिले.....

               आजची सुशिक्षित महिला शिक्षणाच्या प्रभावाने धीट झाली , चार भिंती ओलांडून घराबाहेर पडली. विकासाची मिळवती झाली, आर्थिक बाबतीत अधिक स्वावलंबी झाली .'स्त्री' या शब्दांत असणारी शक्ती, निर्भिडता, आत्मविश्वास तिच्यामध्ये आला, स्त्री शिक्षीत झाली तरच ती अन्यायाविरूध्द लढू शकते. शिक्षणामुळे आचार-विचारात प्रचंड परिवर्तन घडून येते विचारांमध्ये क्रांती येते असे म्हटले जाते पण,जर आजची शिकलेली मुलगी अंतरिक्षामध्ये कल्पना चावलासारखी झेप घेण्याऐवजी वडाला फेरा मारत असेल तर काय म्हणावे.....?

             आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात  मुला-मुलींचा रक्तगट तपासणे गरजेचे असताना आपण त्यांची कुंडली बघण्यात व्यस्त आहोत. हि समाजाची खूप मोठी शोकांतीका आहे........

              आज महिलांना ५०% आरक्षण मिळाले आहे, मग खरच,त्या स्वतःच्या इच्छेने राजकारण करीत आहे का..?  त्या महिला स्त्रीयांवरील होणारा अन्याय, अत्याचाराच्या विरोधात एकजुटीने आवाज उठवित आहेत का...? आरक्षणाचा लाभ किती महिला उचलत आहेत...? समांतर आरक्षण असूनही आज राजकीय पक्षाच्या नाड्या पुरुषांच्या हातात का....? अश्या अनेक का.? च्या उत्तराचा शोध घेणे हा चिंतनाचा विषय आहे.....

            शेवटी सवित्रीमाईचा त्याग डोळ्यासमोर ठेवून आजच्या सावित्रीच्या लेकी वागायला हव्यात. कारण ती झाली नसती तर तुम्ही झाल्या नसत्या. सावित्रीमाई, ज्योतिराव फुले यांची जयंती आणि पुण्यतिथी साजरी करण्याची जबाबदारी फक्त माळी समाजापूरते मर्यादित न राहता प्रत्येक भारतीयांनी मग ते कोणत्याही जाती-धर्मातील असेल तरीहि साजरी करायला हवी. कारण या महापुरुषांनी कधी जातीभेद केला नाही आणि आमची आजची स्वतःला सुशिक्षित म्हणणारी पिढी या महापुरुषांना जाती-जातीत वाटून घेतली..........


    *सुरज पी. दहागावकर.*
    *रा.चंद्रपूर*
    *मो.न.८६९८६१५८४८*

    इथे हि वाचा
    Click here
    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: