बुध्द धम्म आणि स्त्री स्वातंत्र्य

*बुध्द धम्म आणि स्त्री स्वातंत्र्य*


प्राचीन भारतात स्त्रियांची स्थिती दयनीय होती. समाजात त्यांना शिक्षणापासून ज्ञानापासून वंचित ठेवले जात होते.
भगवान बुध्दांच्या आगमनानंतर स्त्रियांना त्यांच्या धम्मात संघात जे स्थान प्राप्त झाले जे अधिकार मिळाले याची बौध्द इतिहासात बरीच उदाहरणे मिळतात.

बुध्दाच्या संघात प्रवज्जित झालेल्या स्त्रिया ह्या वेगवेगळ्या परिस्थितीतून वेगवेगळ्या प्रकारच्या समाज जिवनातून संघात आल्या होत्या कठिण परिस्थितीतून त्यांनी आपल्या जिवनाचे उत्थान कसे केले याचे वर्णन आपल्याला थेरीगाथेत मिळते.

आज बुध्दावर त्यांच्या धम्मावर अनेक निराधार आरोप करण्यात येतात त्यातील एक आरोप म्हणजे बुध्दांचा स्त्रियांबाबतचा दृष्टीकोन हा भेदभावाचा होता अथवा बुध्द हा स्त्री स्वातंत्र्याच्या विरोधात होता.
यामध्ये आरोपकर्ते हे बुध्दांनी स्त्रियांना संघात घेण्यास प्रथमत नापसंती दर्शविली तसेच विनयपिटकात स्त्रियांना दुय्यमस्थानी ठेवले आहे. असे आरोप करतात.

आता आपण यांच्या आरोपांचे खंडन करणारी उदाहरणे पाहू.

भिक्खूनी संघाच्या स्थापनेचा इतिहास असा आहे की, बुध्दाची मावशी महापजापतीगोतमी हिने बुध्दाजवळ जाऊन स्त्रियांना संघामध्ये घेण्याची विनंती केली. परंतु बुध्दाने तसे करण्यास नकार दिला. त्यानंतर महापजापतीगोतमी आनंदाकडे गेली व म्हणाली. आनंदा, गृहत्याग करून भगवंतांचा धम्म व विनय याचा स्विकार करून गृहहीन जिवन जगण्याची अनुमती तथागत स्त्रियांना देत नाहीत. नंतर आनंद ज्या ठिकाणी तथागत होते. त्या ठिकाणी गेला व तथागतांना अभिवादन करून म्हणाला. भगवान महापजापतीगोतमी प्रवेश द्वाराजवळ उभी आहे. तिचे पाय सुजले आहेत आणि ते धुळीने माखलेले आहेत. दुखी कष्टी होऊन ती रडत अश्रू ढाळीत आहे. कारण गृहत्याग करून भगवंतांचा धम्म व विनय यांचा स्विकार करून गृहहीन जिवन जगण्याची अनुमती भगवान स्त्रियांना देत नाहीत. भगवान तिच्या इच्छेनुसार स्त्रियांना अनुमती दिली तर बरे होईल.
यावर बुध्दाने आनंदाचे म्हणणे नाकारले.
नंतर आनंदाने याचे कारण विचारले असता तथागतांनी उत्तर दिले.
"आनंदा, गैरसमज करून घेऊ नकोस. निब्बाणप्रत पोहचण्यास स्त्रियासुध्दा पुरूषाइतक्याच समर्थ आहेत असे माझे मत आहे. माझ्याविषयी गैरसमज करून घेऊ नकोस. स्त्री पुरूषाच्या विषमतेच्या तत्वांचा मी पुरस्कर्ता नाही. महापजापतीगोतमी च्या विनंतीला मी दिलेला नकार हा स्त्री पुरूषातील विषमतेवर आधारलेला नाही तर तो व्यवहारीक कारणांवर आधारलेला आहे.

आता ही व्यवहारीक अडचण आपल्याला तत्कालीन समाजव्यवस्थेतच शोधावी लागेल.

बुध्दकाळात आजच्यापेक्षा वैचित्र्यपूर्ण अशी समाज व्यवस्था होती.
*आम्रपाली* वरून तत्कालीन समाजव्यवस्थेची कल्पना येते.
आम्रपाली ही वैशालीची गणिका होती. ती जनमान्य राजमान्य गणिका होती. अर्थात जनमान्य राजमान्य गणिका असणे हे काय दर्शविते ?
ते हेच दर्शविते की त्या काळात लैंगिक दुराचार होत असत. त्यामुळे अश्या व्यवसायाला मान्यता देणे क्रमपाप्त होते. लैंगिक गुन्ह्यांना वाव मिळू नये म्हणून एखादी गणिका असणे हे जनतेला मान्य होते.
अशा समाजव्यवस्थेत बुध्दाने स्त्रियांना प्रवज्जित करून भिक्खूनी बनविणे हे एक धाडसाचे काम होते. भिक्खुणींना भिक्षा मागण्यासाठी पिंडपातासाठी लोकवस्तीत जाणे सुध्दा धोकादायक बाब होती. यासाठी शुभा भिक्खूणीवर आलेला प्रसंग लक्षात घ्या.
शुभा एके दिवशी जिवक वैद्याच्या आम्रवनात एकटीच जात होती. वाटेत तिला एका लबाड मनुष्याने गाठले. तिच्या सुंदर रूपाकडे पाहून तो भुलून गेला आणि आपली वासना तृप्त करण्यासाठी तिचे मन वळवू लागला. तिने त्याला अनेक प्रकारे उपदेश केला. परंतु त्या कामांध माणसावर त्याचा काहीएक परिणाम झाला नाही. शेवटी तो बलात्कार करण्यास सुध्दा तयार आहे असे जेव्हा त्या भिक्खूणीला दिसून आले तेव्हा ती त्याला म्हणाली, 'अरे तू मला का अडवीत आहेस ?' तेव्हा तो तिच्या नैत्रादी सुंदर अवयवांचे वर्णन करू लागला. आणि म्हणाला, हे सुंदरी, हे तुझे सुंदर नेत्र पाहून मी कामविकाराने पिडीत झालो आहे.
त्यावर भिक्खूनी म्हणाली, एवढंच ना ? माझ्या डोळ्यांचीच तुला गरज आहे ना. घे हा डोळा असे म्हणून आपल्या दोन बोटांनी डोळा उपटून त्याला दिला. हे तिचे साहसी कृत्य पाहून तो मनुष्य घाबरून गेला व तिची क्षमा मागितली.

असे प्रसंग भिक्खूनींवर येतील म्हणूनच बुध्दाने स्त्रियांना संघात घेण्यास विरोध केला होता.

दुसरी बाब म्हणजे बुध्दांच्या भिक्खू संघात औषध, भोजन मिळण्यासाठी, शिक्षेतून बचाव होण्यासाठी अनेक संधीसाधू, स्वार्थी लोक भिक्खू होऊन संघात प्रवेश करीत. जर स्त्रियांना भिक्खूणी करून संघात घेतले तर कित्येक व्याभिचारी लोक स्त्रियांसाठी संघात घुसून विघ्न करतील व त्यायोगे अखंड भिक्खूसंघाला धोका पत्करावा लागेल. या हेतुने बुध्दाने स्त्रियांना भिक्खूणी बनविण्यास नापसंती व्यक्त केली तर त्यात बिघडले कुठे ?
असे अनेक प्रसंग आपणाला थेरींच्या चरित्रात गाथेत सापडतात.

इथे बुध्द हे स्त्री विरोधी होते असे म्हणणारे आणखी एक गोष्ट सांगतात की, बुध्द एकदा आनंदाजवळ म्हणाले होते 'हे आनंद, भिक्खू संघात जर स्त्रियांना प्रवज्जित केले नाही तर माझा धम्म एक हजार वर्ष सुस्थितीत राहिल. परंतु त्या प्रवज्जित झाल्याने केवळ पाचशे वर्ष पर्यंत राहण्याची शक्यता आहे.
तथागतांच्या या वाक्यांचा उलगडा स्थविर नागसेनाने राजा मिलिंद याला दिलेल्या उत्तरात केला आहे. स्थविर नागसेन म्हणतात. धम्माची मुळे चारित्र्यात आहेत. जो पर्यंत लोकांचे चारित्र्य बिघडणार नाही, तो पर्यंत भगवान बुध्दांच्या धम्माचा कधीही लोप होणार नाही.
यामधून नागसेनास हे सुचवायचे आहे की बुध्दाने कितीही चांगला धम्म सांगितला तरी अनुयायांनी त्याचा अभ्यास व तदनुसार आचरण करणे महत्वाचे आहे. स्त्रियांना भिक्खूनी केल्याने त्यांचा आणि भिक्खूचा जवळचा संबंध येणार आहे. येथेच धम्माला आवश्यक असणाऱ्या चारित्र्याची कसोटी आहे. स्त्री आणि पुरूष निसर्गातच असे घटक आहेत की ते जवळ येताच त्यांची वासना जागृत होते. भिक्खू आणि भिक्खूणी सुध्दा यास अपवाद नाहीत. भिक्खू भिक्खूणी आपल्या इंद्रियावर ताबा प्राप्त करेपर्यंत असे होणे साहजिकच आहे. जो पर्यंत बुध्द व त्यानंतर ज्येष्ठ भिक्खू आहेत तो पर्यंत ठिक. परंतु नंतर असा दबदबा न राहिल्यास अनाचार नक्कीच माजेल. शिवाय बुध्द धम्माला बदनाम करण्यासाठी काही लोक तत्पर असतच. हे ओळखून भगवान बुध्दाने असे विधान केले की, स्त्रियांना प्रवज्जित केल्याने धम्म पाचशे वर्षच टिकेल. यातून बुध्दाचा दूरदर्शीपणा दिसून येतो.

बुध्द स्त्री स्वातंत्र्याच्या विरोधात होता हे दाखविणारी एक बाब काही लोक  बुध्दाचा दृष्टीकोन व अनुभव लक्षात न घेता सर्वसामान्यांपुढे ठेवतात ती अशी की, एकदा आनंद बुध्दांना विचारतात.
भगवान आमचा स्त्रियांशी संबंध आला तर आम्ही त्याच्यांशी कसे वागावे ?

तथागत - आपण त्यांना पाहिलेच नाही असे वागावे.
आनंद - परंतु त्यांना पाहणे भाग पडले तर ?
तथागत - तुम्ही त्यांच्याशी बोलू नये.
आनंद - आणि बोलणे भाग पडले तर ?
तथागत - अशावेळी तुम्ही स्मृतिवान, स्मृतिसंपन्न वृत्तीने त्यांच्याशी वागले पाहिजे.

हा प्रसंग सुत्तपिटकात आला आहे. त्याची उदाहरणे समजून घेण्यासाठी आपण बौध्द वाड़्मयातून काही उदाहरणे घेऊ.

भगवान बुध्द श्रावस्ती येथे जेतवनात अनाथपिंडकाच्या आरामात होते. तेव्हा उदायी नावाचा भिक्खू श्रावस्तीतील अनेक कुटुबांत जात येत असे. त्याच्या ओळखीची एक तरूण कुमारिका दुसऱ्या एका घरी विवाह करून दिली होती. एके दिवशी उदायी तिच्या सासऱ्याच्या घरी जाऊन एका एकान्त जागी बसून तिच्याशी गोष्टी करित बसला ही बाब तिथे उपस्थित असलेल्या विशाखेने पाहीली व उदायीला म्हणाली, "तुम्ही जरी कामवासनेपासून मुक्त असला तरी पुष्कळ लोकांना याची खात्री वाटणार नाही. असे सांगूनही उदायीने ते ऐकले नाही. तेव्हा विशाखेने याबाबत वर्तमान भिक्खूंना याची कल्पना दिली. तेव्हा भिक्खूंनी झाल्याप्रकाराची  निंदा केली.

जेव्हा बुध्द श्रावस्तीत होते. त्या काळी उपनंद शाक्यपुत्र आपल्या मित्राच्या घरी जाऊन त्याच्या बायकोबरोबर एकान्तात बसला ते पाहून तो मित्र त्याच्यावर टिका करू लागला.

एकदा भिक्खू अनुरूध्द कोसल देशात प्रवास करित श्रावस्तीला जात असता एका गावात आले. तेथे एका स्त्रीची धर्मशाळा होती. अनुरूध्दाने एक रात्र तेथे राहण्यास जागा मागितली. त्या स्त्रीने त्यांना जागा दिली. त्यानंतर तेथे काही पायस्थ आले. त्यांनाही त्या धर्मशाळेत जागा मिळाली. अनुरूध्दाला पाहिल्याबरोबर त्या स्त्रीचे मन विकृत झाले. ती त्यांना म्हणाली भदंत येथे तुम्हाला फार दाटी होईल. आतल्या बाजूस तुमची निजण्याची सोय करते. त्यावर काहीही न बोलता अनुरूध्दाने ही गोष्ट मान्य केली. रात्री ती स्त्री सर्व अलंकार घालून अनुरूध्द जेथे झोपला होता तेथे आली व त्यांना म्हणाली भदंत तुम्ही जसे सुरूप आहात तसेच मी ही सुरूप आहे. आपण माझा स्विकार करावा, माझी सर्व संपत्तीही स्विकारावी, मला आपली बायको करा. त्यावर अनुरूध्द काहीच बोलला नाही. तेव्हा ती स्त्री अनुरूध्दाला नानाप्रकारे वश करण्याचा प्रयत्न करू लागली. परंतु अनुरूध्दाने आपल्या इंद्रियाचे दमन करून तिच्याकडे मुळीच लक्ष दिले नाही.
वरील तिन घटना पाहिल्यावर जरी बुध्दाने आनंदाजवळ जे उद्गार काढले की, स्त्रियांना पाहिलेच नाही असे वागा. स्त्रीयांशी मौन धारण करा आणि बोलण्याची वेळ आलीच तर सावधान वृत्तीने वागा. असे सांगणे किंवा तशा सूचना देणे गैर आहे असे कोण म्हणेल ?

या काही उदाहरणांवरून बुध्दाने सुरूवातीला स्त्रियांना संघप्रवेश का नाकारला होता याची प्रचिती येते.

आता दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे विनयपिटकातील आठ गुरूधम्म या नियमांचे पालन.
आचार्य धर्मानंद कोसंबी यांच्यामतानुसार हे आठ गुरूधम्म हे तथागतांच्या काळात बनले नसावेत कारण एखादी गोष्ट दृष्टोत्पतीस पडल्यानंतरच भगवान बुध्द तसा नियम घालून देत असत. महापजापतीगोतमी आणि इतर स्त्रिया संघात दाखल झाल्या झाल्या असे नियम घालून दिले नसावेत. भगवान बुध्दांच्या काळात जेथे गणसत्ताक राज्ये होती तेथे स्त्रियांचा चांगलाच मान ठेवण्यात येत आहे. अशोक काळानंतर ही परिस्थिती पालटली. या देशावर यवन व शक लोकांच्या स्वाऱ्या होऊ लागल्या आणि उत्तरोत्तर स्त्रियांचा दर्जा अगदी खालचा ठरून समाजात त्यांचा मान राहिला नाही. त्याकाळात भिक्खुणीसंबधाने अशा प्रकारचे नियम अस्तित्वात आले तर त्यात  काहीच नवल नाही.

इथे काही विचारवंत भिक्खुणींना जे विनय घालून दिलेत ते किती जाचक व कठिण आहेत यावर लक्ष केंद्रित करतात परंतु तसेच नियम भिक्खूंना सुध्दा पाळावे लागतात धम्म हा विनयावरच टिकून आहे हे विचारवंत विसरतात. त्यामुळे प्रथम त्यांनी भिक्खु भिक्खूणी या दोहोंचा विनयाचा नीट अभ्यास करावा व नंतरच त्यावर आपले मत मांडावे.
गृहस्थी स्त्रियांचे जिवन व भिक्खुणी जिवन यात खुप फरक असतो. त्यामुळे स्त्री स्वातंत्र्याच्या विचार करताना स्त्रियांच्या या दोन्ही जिवनांना एकाच तराजूत तोलू नये.

भगवान बुध्दांचे स्त्रियांविषयीचे काही मत आपण पाहूया.

*भगवान बुध्द चुल्लवेदल्ल सुत्तात म्हणतात.* अर्हत्वपदास नेणारा पावित्र्याचा परमोच्च मार्ग जसा पुरूषांकरिता मोकळा आहे. तसाच स्त्रीयांसाठी मोकळा आहे.

*कोसलनरेश पसेनदीला मुलगी झाल्यावर तो खिन्न झाला होता.*
भगवान बुध्द पसेनदीला म्हणाले.
'हे राजा ! स्त्रीपण पुरूषांपेक्षा श्रेष्ठ होऊ शकते अशी ही स्त्री मधुरभाषिनी, शीलवती, सासऱ्याला देव मानणारी व पतिव्रता असते. ती त्या बालकास जन्म देते, जो पुढे शूर, छत्रपती राजा होतो. अशा भाग्यशाली स्त्रीचा पुत्र राज्यावर शासन करतो. अनेक बालकांना महापुरूष बनवणाऱ्या त्यांच्या माताच असतात.

*सिगाल सुत्तात तरूणास उपदेश देताना पत्नीस कसे वागवावे हे बुध्दाने सांगितले आहे.*

*एकदा एका भिक्खु नी बुध्दाला प्रश्न विचारला होता की, काही कुटुंबे भरभराटीस येतात आणि काही नष्ट होतात असे का होते?*
या प्रश्नास बुध्दाने दिलेले उत्तर स्त्री जातीचा सन्मान करणारेच आहे.
बुध्द म्हणतात, "जर कुटुंबाची सूत्रे कर्तबगार स्त्री अथवा पुरूषाच्या हाती असतील तर ती भरभराटीस येतात आणि जर ती नितीभ्रष्ट स्त्री अथवा पुरूषाच्या हाती असतील तर ती कुटुंबे रसातळाला जातात.

*एकदा भिक्खु बुध्दाला विचारतात या जगात चक्रवर्ती राजा जन्माला येतो तेव्हा काय होते?*
भगवान बुध्द म्हणतात, जेव्हा एखादा चक्रवर्ती राजा जन्माला येतो तेव्हा सात भांडारे अस्तित्वात येतात. रथ, हत्ती, घोडे, रत्ने, स्त्रिया, कुटुंबाचा शास्ता पिता आणि गादीचा वारसदार राजपुत्र ही ती भांडारे होत.

*स्त्री ही जगाला किती मौल्यवान देणगी आहे. याबद्दल आपल्या एका उपदेशात भगवान बुध्द म्हणतात.*
स्त्री ही जगातील सर्वोकृष्ट देणगी आहे. कारण तिची उपयुक्तता अमोल आहे. तिच्यापासून बोधिसत्व व चक्रवर्ती हे जन्म घेतात.

बुध्दाने स्त्रियांना संघात प्रवेश नाकारला तो पक्षपाती पणा करत होता व विनयपिटकात स्त्रियांचे दुय्यमस्थान आहे असे म्हणणाऱ्या अभ्यासकांनी त्याच थेरींच्या तोंडून बाहेर पडलेले उद्गार थेरीगाथेतून अभ्यासावेत.

मुक्ता ही ब्राम्हण कन्या भिक्खुणी झाल्यानंतर उद्गार काढते "मी खरोखरच स्वतंत्र आहे, माझ्या स्वातंत्र्याला सीमा नाही.

भिक्खुणी सोमा म्हणते, स्त्रीचे नैसर्गिक जिवन हे आमच्या अरियांच्या आड कसे येऊ शकते ?

अशा असंख्य भिक्खुणींची उदाहरणे आपण थेरीगाथेतून घेऊ शकतो.

तथागतांच्या अग्गसावकांमध्ये जसे भिक्खू अग्गसावक होते तसे भिक्खुणी सुध्दा अग्गसावक होत्या. यावरून धम्मात प्रवज्जित झाल्यावर त्या भिक्खूणींनी स्त्रियांनी किती प्रगती साधली होती याचे उदाहरण मिळते.

पाश्चात्य विद्वान सर लेपेल ग्रिफिन म्हणतात, " इतर कोणत्याही संप्रदायापेक्षा बौध्द धम्मात स्त्रियांच्या सुखाकरिता आणि दास्यमुक्ती करिता अधिक कार्य केले आहे.

सर चार्ल्स एलिएट यांच्या मते बर्मा, थायलंड, तिबेट इत्यादि देशात स्त्रिया पाश्चिमात्य देशातील स्त्रियांप्रमाणेच स्वातंत्र्य उपभोगतात.
चीन आणि जपान या देशात जेव्हा बुध्द धम्म आपल्या पूर्ण ऊर्जितावस्थेत होता ( इसवीसन १० वे १२ शतक ) तेव्हा तिथे काही महिला लेखक सुध्दा उदयास आल्या होत्या.

वरील लेखातील सर्व विवेचन पाहिल्यास कोण म्हणेल बुध्द हा स्त्रियांविरोधी होता व नंतर तो बदलत गेला ?

स्वातंत्र्य, समता व बंधुत्व या त्रयींचा पुरस्कार करणाऱ्या बुध्दावर केलेले आरोप हा त्याची महती न पचणाऱ्या निर्बुध्द माणसाला शोभणारा आहे असेच खेदाने म्हणावे लागेल.

- अरविंद भंडारे
पालि रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबई
31 ऑक्टोबर, 2018

संदर्भ -
थेरीगाथा.
बुध्द धर्मावरील १६ आरोप व त्याचे खंडन.
विनयपिटक.
भगवान बुध्द.

आणखी खोलात उतरण्यासाठी Woman in Buddhist Literature - B. C. Law
Women Under Primitive Buddhism - I.B. Horner.
Women in Early Buddhist Literature - I. B. Horner.
Psalms of the Sisters - Mrs. Caroline Rhys Davids
 हि पुस्तके अभ्यासावित.
Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel

WhatsApp
🌐 भाषा: