महाराष्ट्रातील आद्य भाजे बुद्ध लेणी
महाराष्ट्रातील आद्य भाजे बुद्ध लेणी.....
भाजे लेणी समूह, महाराष्ट्रातील लोणावळ्याजवळील सुंदर सह्याद्री पर्वतरांगांत वसलेली, भारतातील प्राचीन शिल्पकलेचे आणि वास्तुकलेचे अद्भुत उदाहरण मानली जातात. भाजे गाव पुणे जिल्ह्यात, मावळ तालुक्यात लोणावळ्याच्या पूर्वेस ८ कि.मी. वर व मळवळी रेल्वेस्थानकाच्या दक्षिणेस ३ कि.मी. वर विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी वसले आहे. लोणावळा-पुणे रेल्वे लाईनवर, लोणावळ्यानंतर येणारे मळवली स्थानक, येथून १५ ते २० मिनिटांवर लोहगड आणि विसापूर किल्ले डोंगर माथ्यावर वसलेले आहेत. ह्याच डोंगराच्या कडेकपऱ्यांमध्ये अनेक लेणी कोरली आहेत. ह्या निसर्गरम्य परिसरात भाजे गाव वसलेले आहे. येथे अनेक धबधब्यांमधून, भाजे लेणी डोकावताना दिसते. भाजे गावाजवळील डोंगरात ही बौद्ध लेणी आहेत. वास्तविक ही लेणी सर्वत्र विखुरलेली आणि गर्द झाडीत लपलेली आहेत. त्यामुळे इथील लेणी समूहांतील लेण्यांची संख्या सांगणे कधीकधी अवघड होऊन बसते. यामध्ये बौद्ध स्तूप आणि त्याचप्रमाणे यक्ष, गंधर्व, अनेक शिल्पे आहेत. गावाजवळ ४०० फूट उंचीवर ही लेणी आहेत. येथील चैत्यगृह महत्त्वपूर्ण आहे. त्याच्या बाजूला भिक्खूंना राहण्यासाठी असलेल्या खोल्या आढळतात. या लेण्यांना २६ मे, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.
हा लेण्यांचा समूह सुमारे इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकातील ते ई.स. पहिले शतकात कोरल्या असाव्यात असे अभ्यासकांचे मत आहे. येथे एकूण २९ लेणी आढळतात. हे महाराष्ट्रातील लेणी बौद्ध हीनयान म्हणजेच थेरवाद पंथाची आहेत. ह्यात मूर्ती पूजा करत नसत. प्रतीकांच्या स्वरूपात पूजा करत असत. बौद्ध धर्माचा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा या ठिकाणी जतन करण्यात आला आहे. भारतामध्ये प्राचीन काळात बौद्ध धर्माचा प्रसार करीत असताना, बौद्ध भिक्खूंच्या वसाहतीसाठी डोंगरामध्ये लेणी खोदण्यास मौर्यकाळात सुरुवात झाली. महाराष्ट्रात सातवाहन काळात भाजे लेणी बौद्ध धर्माचे एक प्रमुख केंद्र होते. बौद्ध भिक्खू उपासना तसेच धर्मप्रसाराचे कार्य येथून करीत होते.
पश्चिमाभिमुख असलेली ही लेणी २९ लेण्यांचा समूह आहे. ह्यामध्ये आपणास चैत्यगृह, विहार, पानपोई, धम्मलिपि (ब्राह्मी) शिलालेख ह्यांचा समावेश आहे. कोकण ते देशावर जाणाऱ्या इंद्रायणी खोऱ्यातील प्राचीन घाटवाटेवर ही लेणी कोरली गेली आहेत. बौद्ध भिक्खू धर्म प्रचारासाठी जात असताना या जुन्या घाट मार्गातून जात असत. त्यामुळे प्रवासात निवासासाठी तसेच ध्यान धारणा, पूजेसाठी लेणी, स्तूप, विहार, पानपोई ह्यांची निर्मिती असावी. अशा पद्धतीने कातळात कोरलेली ही महाराष्ट्रातील पहिली लेणी आहे. याला आद्य लेणी म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही.
अभ्यासकांच्यानुसार चैत्यगृहात उभारलेले खांब अगदी सरळ नसून, काही अंशी कललेल्या अवस्थेत घडवलेले दिसतात. चैत्य गृहातील आतील भिंती सुद्धा काही अंशी तिरक्या कोरलेल्या दिसतात. अशा विशिष्ट कोनांमध्ये कलत्या खांबामुळे छताचा पूर्ण भार सांभाळू शकतील, पण वास्तविक अशा कलत्या खांब आणि छतावरील भाराचा काही संबंध नसल्याचे कारागिरांच्या लक्षात आले असावे, भाजे लेणी मधील चूक किंवा खांबांची रचना इतर लेण्यांमध्ये दिसून येत नाही. पहिली कलाकृती निर्माण केल्यावर इतर कलाकृतीमध्ये काय बदल करायचे हे ध्यानात येत असते. ह्या तर्का नुसार ही महाराष्ट्रात कोरलेली पहिली लेणी असावी.
मळवली पासून २ कि.मी. आणि मुंबई-पुणे महामार्गावरून १० ते १५ मिनिटांत लेणीवर पोहोचतो. या ठिकाणी गाडी पार्क करून, दगडी पायऱ्या चढून गेल्यावर आपल्याला प्रवेश शुल्क द्यावे लागते. त्या पुढे गेल्यावर मुख्य गेटमधून प्रवेश केल्यावर समोर पिंपळाच्या आकाराचे भव्य असे चैत्यगृह लक्ष वेधून घेते. कलाकृती पाहून मन स् स्तंभ होते. बाजूला असणारी एक मजली विहारे आहेत. भिकूंसाठी खोल्या आहेत. त्यांना खिडक्या आहेत. दगडी बाक आहेत. तसेच विहाराच्या बाहेर नक्षीकाम केलेले पाहण्यास मिळते.
उत्तरेकडील १ आणि २ क्रमांकाची लेणी ही विहार आहेत. पहिल्यामध्ये फक्त मोकळा परिसर दिसतो तर दुसऱ्या लेणीत आपल्याला उजव्या, डाव्या आणि समोरील भिंतीला समांतर दगडी बाक दिसतात. ३ नंबर हे शून्यगार आहे. त्या पुढे ४ थ्या लेणीत प्रवेशद्वाराच्या बाजूला दोन खिडक्या आणि बाहेरच्या बाजूला २ दगडी बाक आहेत. आतमध्ये उजव्या आणि डाव्या बाजूला ३ + ३ = ६ खोल्या आहेत. मधला भाग मोकळा आहे. ५ व्या क्रमांकाची लेणी भग्न झाली आहे. त्यालाच लागून ६ व्या क्रमांकाची लेणी आहे. उजव्या बाजूला २ खोल्या आहेत त्यात दगडी बाक आहे. समोर २ पूर्ण खोल्या आहेत. वरील भागात वेदिका पट्टी आहे त्यावर उजव्या आणि डाव्या बाजूला २+२ असे ४ आणि मध्ये मोठे पिंपळाच्या आकाराचे १ असे ५ चैत्य गवाक्ष आहेत. समोरील उजव्या बाजूच्या खोलीच्या प्रवेशद्वारावरती वेदीकपट्टीच्या खाली एक दानकर्त्यांचा शिलालेख आहे. तो असा आहे. लेणी क्र. ६ मध्ये आहे.
बाधया हामिकजयाया दानं
𑀩𑀸𑀥𑀬𑀸 𑀳𑀸𑀫𑀺𑀓𑀚𑀬𑀸𑀬𑀸 𑀤𑀸𑀦𑀁
बाध या शेतकऱ्याच्या बायकोचे दान.
पुढे विहार पाहून झाले की आपण आपली पावले चैत्यगृहाकडे वळवतो. हे चैत्यगृह म्हणजे शैलगृह आहे. एखाद्या कातळात लेणी कोरून दगडी स्तूप उभारणीला शैलगृह म्हणतात. चैत्यगृहाच्या बाहेरील बाजूस डाव्या भिंतीवर यक्षिणी कोरलेली दिसते, तिच्या हातातले झाड ही व्यवस्थित दिसते. हे शिल्प भाजे लेणीच्या चैत्यगृहाच्या दर्शनी-सौंदर्याची चुणूक आहे. तसेच कारागीर, शिल्पकार एवढेच थांबले नाही तर चैत्यगृहाच्या दर्शनी भागात चैत्य गवाक्ष, पिंपळाच्या पानांच्या प्रतिमा, कोरीव छज्जे, वेदिकापट्टी अशी सुंदर कलाकृती कोरलेली दिसते. हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे चैत्यगृह आहे. या चैत्यगृहाला कार्ले लेण्यांसारखा व्हरांडा नाही. कारागिरांनी थेट चैत्यगृहात खांब कोरलेले दिसतात. व्हरांडा नसल्यामुळे पावसाचे पाणी थेट चैत्यगृहात येत असे.
पुढे मोकळे मैदान आहे. समोर चैत्यगृह आहे. त्याच्या दोन्ही बाजूला असलेले एक-एक मजली विहार उल्लेखनीय आहेत. याच्या एकूण स्थापत्यरचनेवरून अजिंठ्याच्या लेणे क्र. २६ ची आठवण होते. तसे पाहता दोन्ही चैत्यगृहात ७०० हून अधिक वर्षांचे अंतर आहे. या पैकी डावीकडील विहार हे भग्न अवस्थेत असून, उजवीकडील विहार सुस्थितीत आहेत. शक्यतो हे विहार नंतरच्या काळात परंतु सातवाहन काळात हे राजांच्या कारकीर्दीतच कोरले गेले असावे. चैत्यगृह महाराष्ट्रा मधील सर्वात प्राचीन चैत्यगृह मानले जाते. ६ दगडी पायऱ्या चढून आपण चैत्यगृहात पोहोचतो. वरती कातळात कोरलेली भव्य अशी पिंपळाच्या आकाराची चैत्य कमान आहे. कमानी खाली आपणास १९ सरळ पट्ट्या पाहण्यास मिळतात. त्याच्या आत छतावर कमानीवर लाकडी कमान, तुळया, दगडी खांब, दगडी स्तूप पाहून आपण काही क्षण स् स्तब्ध होतो. आतील बाजूस कललेले २७ अष्टकोणी खांब आणि त्यावरती गजपुष्टावर अर्धवर्तुळाकार २२ लाकडी कमान (तुळया) आणि समोरच्या बाजूला ११ लाकडी कमान (तुळया) बसवल्या आहेत.
१९६० च्या दशकात ह्या लेण्यांची डागडुजी करताना २ लाकडी फळ्या (तुळया) ह्यावर धम्म(ब्राह्मी) लिपीतील शिलालेख सापडले. ह्यावरून सिद्ध होते की ह्या लाकडी सागवाणी तुळया, कमान ह्यांना २००० वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. ह्या फळ्या, तुळया सडल्या किंवा कुजल्या नाहीत किंवा त्यांना वाळवी सुद्धा लागली नाही. असा कोणता लेप वापरला असेल, ज्यामुळे फळ्या टिकून राहिल्यात? काळाच्या ओघात दोन-तीन फळ्या खराब झाल्या, त्या पुरातत्व खात्याने बदलल्या, पण उर्वरित अजून टिकून आहेत. हे पाहून आपण आश्चर्यचकित होतो. स्तूपाच्या मागील १५, १६, १७ क्रमांकाच्या खांबांवर तथागत भगवान गौतम बुद्ध ह्यांचे चित्र काढलेल्या रंग-गिळाव्यांचे काही अवशेष दिसतात. बारकाईने पाहिल्यास आपल्या लक्षात येते, ही चित्रे गौतम बुद्ध ह्यांची पद्मासनात बसलेली आहेत. दोन्ही हात छातीजवळ आहेत, म्हणजेच नमस्कार (अंजली) मुद्रेमध्ये आहेत. गौतम बुद्धांची दोन्ही हात एकत्र जोडलेली मुद्रा, नमस्कार (अंजली) मुद्रा म्हणून ओळखली जाते, जी आदर, अभिवादन, शांती आणि एकाग्रतेचे प्रतीक आहे. या मुद्रेत तळहात छातीसमोर किंवा पोटाजवळ एकत्र जोडलेले असतात आणि अंगठ्याची टोके एकमेकांना स्पर्श करतात, जे विश्वबंधुत्वाचे आणि आध्यात्मिक शरणागतीचे दर्शन घडवते.
चैत्यगृहातील डावीकडील खांबांवर आपणास फुलांची नक्षी कोरलेली दिसते. उजवीकडील खांबावर आपणास कमळ आणि खुंटीवर अडकवलेला हार कोरलेला दिसतो. या चैत्यगृहाची रुंदी ८.१३ मीटर, खोली १७.८ मीटर असून उंची ८.८३ मी. आहे. खांबांच्या बाजूने प्रदक्षिणा करण्यासाठी मार्गिका आहे. मुख्य चैत्यगृहाच्या उजवीकडून सरळ जाऊन स्तूपाच्या मागे अर्ध वर्तुळ होऊन, परत डावीकडे सरळ समांतर सपाट भाग आहे. त्यावर जमिनीपासून साधारण पाच फुटांवर समांतर अशा भिंतीला चौकोनी ७७ खोबणी आहेत. चैत्यगृहाच्या उजव्या बाजूने चालू होऊन, स्तूपाच्या मागून डाव्या बाजूला प्रवेशद्वारापर्यंत समांतर आहेत.
चैत्याचे छत गजपुष्ट चापाकार आकाराचे असून, त्या खाली चैत्य स्तूप आहे. त्याची उंची साधारण ९ फुटांच्या आसपास असून, त्यावर लाकडी हर्मिका आहे. त्यावर छत्री, यष्टी दिसत नाही. काळाच्या ओघात नष्ट झाली असावी. या दगडी स्तूपाचे वैशिष्ट्य असे की स्तूपावर असलेला गुळगुळीतपणा हाताच्या स्पर्शाने जाणवतो. काही अभ्यासक ह्याला झिलई देणे असेही म्हणतात. ही झिलई हात लावूनच अनुभवावी अशी आहे. झिलई देणे म्हणजे एखाद्या वस्तूवर दिलेला चकचकीत, चमकदार लेप किंवा मुलामा, ज्यामुळे वस्तूला चमक येते. सोप्या भाषेत म्हटले तर वस्तूवरचा चकाकीपणा. हा गुळगुळीतपणा कसा आणि कोणती पद्धत वापरून दिला आहे, हेही आश्चर्यात टाकणारे आहे.
चैत्यगृह पाहून पुढे गेल्यावर आपणास दोन पानपोंढी पाहण्यास मिळतात. त्याच्यावर दानकर्त्यांचा धम्म (ब्राह्मी) लिपीतील शिलालेख पाहण्यास मिळतो, तो असा आहे.
महारठीस कोसिकीपुतस
विण्हुदत्तस देयधम पोढी
𑀫𑀳𑀸𑀭𑀞𑀻𑀲 𑀓𑁄𑀲𑀺𑀓𑀻𑀧𑀼𑀢𑀲
𑀯𑀺𑀡𑁆𑀳𑀼𑀤𑀢𑁆𑀢𑀲 𑀤𑁂𑀬𑀥𑀫 𑀧𑁄𑀠𑀻
महारठीस कोसिकीचा पुत्र
विष्णुदत्त याने धर्मासाठी पानपोंढी दान दिली.
येथून काही अंतर पुढे गेल्यावर, लेणी क्र. 20 मध्ये 14 स्तूपांचा समूह दिसतो. बौद्ध भिक्खूंच्या स्मरणार्थ असे स्तूप कोरले जात असत. तसेच ह्या ठिकाणी कोरले आहेत. 6 आणि 7 क्रमांकाच्या स्तूपांवर शिलालेख आहेत, त्यावर भिक्खूंची नावे आहेत. 6 क्रमांकाच्या स्तूपावर थेरान भयंत संघदिनानं (आदरणीय भन्ते स्थीवर संघदिनाचा), तसेच 7 क्रमांकाच्या स्तूपावर थेरान भयंत अंपकिणकान थूपो (आदरणीय स्थीवर भन्ते स्थीवर अंपकिण यांचा स्तूप) असा शिलालेख कोरलेला आहे. पहिल्या स्तूपावर हर्मिका व्यवस्थित आहे. इतर स्तूपांवरील हर्मिका काळाच्या ओघात भग्न झालेल्या दिसतात. ह्या स्तूपांना ‘डागोबा’ असे म्हणतात. श्रीलंकेतील सिंहली भाषेतील मूळ शब्दावरून ‘डागोबा’ शब्द रूढ झाला आहे. काही अभ्यासकांच्या मते ‘मानवी शरीराचे अवशेष’ स्तूपाच्या अंड भागात ठेवतात, त्याला धातूगर्भ असेही म्हणतात. ह्या लेणीवर ऊन, वारा, पाऊस ह्यांपासून रक्षण होण्यासाठी छताचे आवरण दिले आहे.
त्या पुढे गेल्यावर चैत्याच्या दक्षिणेला लेणी विहार असून शिल्पपट, कथा कोरलेल्या आहेत. अभ्यासकांच्या मते ही बौद्ध जातककथेमधील शिल्प आहेत. हा विहार म्हणजेच ओसरीयुक्त मंडप असून येथे लहान कक्षही कोरण्यात आले आहेत. या विहाराला समोर ६ पूर्ण, उजव्या आणि डाव्या भिंतीत अर्धे २ खांब असे ८ खांब आहेत. विहाराच्या ओसरीमध्ये डावी भिंत सपाट असून डावीकडे कक्ष कोरण्यात आला आहे. या ओसरीचे छत अर्ध गजपुष्टाकार असून यात आडव्या पट्ट्या दिसतात. यात स्तूपाच्या बाह्य रेषांनी व चैत्य गवाक्षाचे अलंकरण दिसते. यातील तुळया आणि कमानी दगडात कोरलेल्या आहेत. ओसरीतील डाव्या भिंतीतील कक्षाखाली काही शिल्पाकृती असून यातील कथाभाग अजून समजलेला नाही. ओसरीच्या आत समोरील भिंतीवर प्रवेशद्वाराजवळ द्वारपालांचे रेखीव प्रभावी शिल्प कोरले आहेत, परंतु याहीपेक्षा महत्त्वाचे दोन शिल्पपट ओसरीतील उजव्या बाजूच्या कक्षद्वाराच्या दोन्ही बाजूस कोरलेले आहेत. एका बाजूला गजारूढ व दुसऱ्या बाजूला अश्वारूढ राजपुरुष दाखवले आहेत. त्यापैकी गजारूढ शिल्पपटात राजपुरुष गजावर आरूढ झालेला आहे. त्याच्या पाठी सेविका हातात धरलेला पताका दिसते. राजपुरुषाच्या गळ्यात पुष्पहार दिसतो. गजाच्या सोंडेमध्ये झाड पकडलेले दिसते. या शिल्पाखाली पशू, स्त्री, पुरुष दिसतात. त्या काळातील वस्त्रे, आभूषणे परिधान केलेली दिसतात. ह्यावरून त्या काळातील जनता, संस्कृती दाखवण्यात आली आहे.त्याच्या बाजूलाच चार घोड्यांचा रथ दिसतो. त्यावर अश्वारूढ पुरुष दिसतो. बाजूला दोन स्त्री शिल्प दिसतात. एका हातात छत्र, तर दुसरीच्या हातात चामर धरले आहे. ह्यातील एक पत्नी आणि दुसरी दासी असावी. त्याच्या बाजूला अजून एक अश्वारूढ शिल्प दिसते.
सुंदर कलाकृती घडवायला हजारो वर्षे लागतात. कारागिरांची मेहनत असते, त्यानंतर अशी ऐतिहासिक कलाकृती निर्माण होते. भाज्याच्या लेण्यांत अनेक उत्कीर्ण दान लेखही आहेत. त्यावरून दान देणाऱ्यांची माहिती मिळते, तसेच कला, बौद्ध विहार आणि चैत्यगृहाच्या स्थापत्याच्या संबंधात प्राथमिक अवस्था दर्शविणारी आहे. येथे थोडी शिल्पे असून याच काळातील पितळखोरे, कार्ले, बेडसे इत्यादी ठिकाणच्या शिल्पांशी ती साम्य दर्शवितात. शिल्पशैली, लाकूडकामाचा पुरावा व कललेले स्तंभ यांवरून या लेण्यांची प्राचीनता लक्षात येते. हे कार्ल्याप्रमाणे एक महत्त्वाचे अभ्यासकांचे आणि पर्यटकांचे केंद्र झाले आहे.
संदर्भ: 1. महाराष्ट्रातील बौद्ध लेणी, महाराष्ट्रातील प्राचीन लेणी.
लेख : राकेश सदानंद पवार.
संपर्क - 9867355724
अंधेरी-मुंबई
अभ्यासक-लेणीसंवर्धक.
एकजूट लेणी समूह- लेणीसंवाद.
सदर लेखा मार्फत जर कॉपीरेट्सचे उल्लंखन झाले आहे असे वाटल्यास आम्हाला कळवावे आम्ही त्याला बाहेर काढून टाकू.


Leave Comments
Post a Comment