अपरिचित रेणुसे वस्ती बौद्ध लेणी.

 भारतात १२०० च्या आसपास लेण्या सापडतात, त्यातील बहुतांश महाराष्ट्रात १००० च्या आसपास लेण्या सापडतात. त्यांमध्ये काही चांगल्या अवस्थेत, काही दुर्लक्षित / अतिक्रमण झालेल्या, आडवाटेवरील लेण्या आढळतात. काही डोंगरांच्या कुशीत लपून, दडून राहिलेल्या आढळतात. त्यातीलच एक अपरिचित लेणी जी निसर्गाच्या सान्निध्यात डोंगरांच्या कुशीत लपून राहिलेली आहे आणि आता जनमाणसात माहीत होणारी लेणी आहे.

सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात असणाऱ्या धामण्याचा डोंगर, पांडवगड धावडी गाव येथील डोंगरांतील निसर्गाच्या सौंदर्याच्या कुशीत ह्या लेण्या आणि पायथ्याशी गाव आहे. पण हे नाव कुणाला जास्त माहीत नाही. पण एक प्राचीन ऐतिहासिक ठेवा असल्यामुळे फिरस्ती, भटकंती करणारे आणि लेणी संवर्धक, अभ्यासक ह्यांच्यामुळे उजेडात येत आहेत.



रेणुसे वस्ती मधून डोंगरावर खड्या चढणीची, वेडीवाकडी वळणाची पायवाट, काटेरी झाडी, झुडपातून पार करत साधारण १० ते १५ मिनिटात डोंगराच्या मध्यावर पोहोचतो, ही वाट थोडी दमछाक करणारी आहे. सहसा कुणाला माहीत नाही. चारी बाजूला झाडी, झुडपे आणि एका बाजूला काळ्या पाषाणात कोरलेली आणि मातीत दडलेली लेणी दिसते. प्रथम एक विहार खोली आहे. त्यात दगडाचे अवशेष दिसतात, हे शिल्प असू शकतात पण भग्न झालेले असल्यामुळे ते काय असावेत हे सांगता येत नाही. हे विहार मातीने भरलेले आहे. बाजूलाच चैत्यगृह आहे. ते ही मातीने भरलेले आहे. जमिनीपासून समांतर असून उंची फक्त ३ फुटांच्या आसपास असून दगडी चैत्य कमान दिसते. तिथून आत खाली उतरावे लागते, आत खाली उतरल्यावर त्यांची उंची साधारण १२ फुटांच्या आसपास आहे. आत स्तूप आहे त्याचा वरील काही भाग भग्न झाला आहे, तरी तो मातीत रुतला असल्यामुळे स्तूपाचा वरचा अंडाकृती भाग पूर्ण आणि खाली जोत्याचा किंचित भाग दिसतो, स्तूपाचा वरील अंडाकृती भागाची उंची ४ फूट रुंदी ५ फुटांच्या आसपास आहे. माती काढल्यास ह्या स्तूपाचा जोत्याचा भाग खाली किती खोल असेल हे माहीत पडेल. स्तूपाला तडा गेल्या आहेत. या चैत्य स्तूपाच्या पाठीमागील भिंतीवर पाच खोबणी दिसतात, तसेच बाजूच्या भिंती भग्न झालेल्या दिसतात त्यामुळे बाजूच्या खोबणी नष्ट झाल्या असाव्यात, ह्या खोबणीचा वापर लाकडी छतासाठी स्तूपावर केला असावा. कालाच्या ओघात ते नष्ट झालेले दिसते. माती काढून साफ करून गतवैभव पुन्हा आणण्याची गरज आहे.

चैत्यगृहा शेजारी मोठा सभामंडप विहार आहे. ते ही मातीने भरले आहे. समोरून जमिनीलगत समांतर २ ते ३ फूट उंच भाग दिसतो. स्थानिक लेणी संवर्धक समूह, स्थानिक लेणी संवर्धक ह्यांनी थोड्या प्रमाणात माती काढल्यामुळे आत उतरता येते, हा भिक्खू निवास विहार, सभामंडप आहे. त्याची समोरून लांबी २५ फुटांच्या आसपास आणि रुंदी ४० फुटांच्या आसपास आहे.

 

पूर्ण सभामंडप विहार मातीने भरले आहे. जिथून आत प्रवेश करतो तेथील जमिनीपासून छतापर्यंत काही भाग साडेपाच फूट उंच आहे, त्या पुढील सर्व भाग वरील छतापासून जमिनीपर्यंत २ ते ३ फुटांचा एवढाच वरचा भाग पाहण्यास मिळतो, त्यात डाव्या आणि उजव्या भिंतीत दोन खोल्या आणि समोरील भिंतीत ३ खोल्या दिसतात. अशा सात खोल्या ह्या विहार सभामंडपात आहेत. माती बाहेर काढल्यास अजून लेणीची माहिती मिळू शकते. ह्याचे छत सपाट आहे. या विहारापुढे पाण्याचे जिवंत टाक आहे. पावसाळ्यात ह्या लेणीवर धबधब्याचे पाणी पडल्यामुळे काळाच्या ओघात निसर्गामुळे माती वाहून आली आहे. लेणी मातीने भरली आहे. लेणी जमिनीपासून आत खोलवर दिसते. याचा अर्थ नैसर्गिक आपत्तीत माती, दगडांचा खच लेणी समोर जमून लेणीमध्ये गेला असल्यामुळे, तसेच लेणी समोर मातीचा थर जमा झाल्यामुळे, लेणी लगेच झाडी झुडपातून जवळ गेल्याशिवाय दिसत नाही. ही लेणी दुर्लक्षित राहिली आहे. रेणुसे वस्ती ही हीनयान बौद्ध लेणी आहे.

लेणी संवर्धक, पुरातत्व खात्याने अशा दोन हजार वर्षांपूर्वीच्या लेणीची साफसफाई करून गतवैभव प्राप्त करून देणे आणि आपला ऐतिहासिक ठेवा वाचवणे गरजेचे आहे. हा वारसा जपणे, संवर्धन करणे गरजेचे आहे. पुरातत्व खात्याने लक्ष घालून ही बौद्ध लेणी मूळ स्वरूपात आणून तिथे बोर्ड लावून तिथपर्यंत रस्ता करणे गरजेचे आहे. या लेणीवर हळद, कुंकू लावून अतिक्रमण करण्याचा प्रयत्न दिसतो, माहितीअभावी नकळतपणे तरी वेळीच ह्या लेणीवर लक्ष देणे गरजेचे आहे. ह्या लेणीवर जाण्यासाठी वाई, एम.आय.डी.सी. चौकातून काळूबाई देवस्थान रोडवरून सरळ जाऊन बाजूला रेणुसे वस्ती, धावडी गाव आहे. धावडी गावात न जाता रेणुसे वस्ती लागते, तिथून तुम्ही वाघ माळा येथे यावे, ही शेवटची वस्ती आहे. त्याच्या वरच्या बाजूला पांडवगड आहे. वाघमाळा येथे गाडी लावून साधारण १० ते १५ मिनिटांत पोहोचता येते. त्या ठिकाणी पांडवगड डोंगरावर लेणीसंवर्धक, स्थानिक माहिती असणारी व्यक्ती बरोबर घेऊन लेणीवर जावे, ही लेणी अपरिचित असल्यामुळे माहिती पडणार नाही, रस्ता चुकू शकता, तसेच प्राणी असू शकतात, काळजीपूर्वक भेट द्या.

लेख - राकेश सदानंद पवार . 9867355724.

अभ्यासक / लेणी संवर्धक. ( अंधेरी – मुंबई)

एकजूट लेणी समहू–लेणीसंवाद.

संदर्भ – डोंगरदरीतला फिरस्ती.

Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel