समाजातील स्पीडब्रेकर्स : आंबेडकरी एकजुटीला रोखण्याचे अदृश्य षडयंत्र"
आपण सर्वांनी रस्त्यावरचे स्पीडब्रेकर्स पाहिले आहेत. त्यांचे काम रस्ता बंद करणे नसते, तर वाहनांचा वेग कमी करणे असते. गाडी पुढे जात असते, पण तिची गती मंदावलेली असते.
आज मला अशाच काही "स्पीडब्रेकर्स" बद्दल बोलायचे आहे. मात्र हे स्पीडब्रेकर्स रस्त्यावर नाहीत, तर समाजाच्या प्रवासात आहेत.
आजकाल आपण बघतोय की सर्वत्र रस्त्यांची आणि पुलांची कामे जोरात सुरू आहेत. वरवर पाहता सगळा 'विकास' दिसतोय. पण या गुळगुळीत रस्त्यांच्या पडद्यामागे प्रस्थापित विचारसरणीच्या सरकारने एक भयंकर षडयंत्र रचले आहे.
संविधानावरील हल्ल्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे, आरक्षणाचे उपवर्गीकरण आणि क्रिमी लेअरचा घाट घालणे, नोकऱ्यांचे खाजगीकरण, बहुजन विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप थांबवणे आणि मराठी शाळा बंद करून त्या खाजगी कंपन्यांच्या घशात घालणे असे अनेक प्रकार सुरू आहेत. मागासवर्गीयांवर अन्याय-अत्याचार झाल्यावर गुन्हेगारांना पाठीशी घातले जाते आणि कल्याणाचा निधी इतर योजनांकडे वळवला जातो.
जेव्हा जेव्हा वंचित, शोषित आणि मागासवर्गीयांवर अन्याय होतो, तेव्हा त्याविरुद्ध लढण्यासाठी आणि व्यवस्थेला जाब विचारण्यासाठी जो समाज सर्वात आधी एकवटतो, तो म्हणजे आंबेडकरी समाज. आंबेडकरी चळवळ ही कुठल्या एका जातीची चळवळ नाही, तर ती फुले-शाहू-आंबेडकर आणि तथागत बुद्धांच्या, संविधानाच्या मूल्यांवर चालणारी एक प्रगल्भ विचारधारा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटल्याप्रमाणे, या देशाचा खरा इतिहास म्हणजे ब्राह्मणवाद विरुद्ध बौद्धवाद असाच आहे. त्यामुळे विषमतेवर पोसलेल्या या प्रस्थापित सरकारला जर कोणाची सर्वात जास्त भीती वाटत असेल, तर ती या आंबेडकरी एकजुटीची.
या वैचारिक चळवळीला बाहेरून हरवणं शक्य नाही हे ओळखून, व्यवस्थेने आता एक नवीन पद्धत शोधली आहे. अन्यायाविरुद्ध पेटून उठणाऱ्या या समाजाच्या गाडीला ब्रेक लावण्यासाठी सरकारने रस्त्यावर नाही, तर समाजातच काही 'स्पीडब्रेकर्स' तयार केले आहेत. हे स्पीडब्रेकर्स म्हणजे आपल्याच गल्लीतले तथाकथित दादा, ताई, भाई आणि समाजसेवक म्हणून मिरवणारे महाशय.
हे असे लोक आहेत जे स्वतःला समाजाचे प्रभावशाली व्यक्ती म्हणून सादर करतात. त्यांचा काही भोळ्या लोकांवर प्रभाव असतो, काहींनी लोकांची आर्थिक मदत केलेली असते. त्यामुळे असले भोळे लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात.
सरकार अशा लोकांना खतपाणी घालून पोसते. सरकार कडून त्यांना छोटी-मोठी पदे दिली जातात. तरुणांना आकर्षित करण्यासाठी यांच्याकडे शाखा, डीजे पार्ट्या, सार्वजनिक सत्कार अशी साधने दिली जातात. जेव्हा एखाद्या वस्तीत किंवा शहरात अन्याय होतो आणि समाज रस्त्यावर उतरायला लागतो, तेव्हा सरकारचे हे 'स्पीडब्रेकर्स' ऍक्टिव्ह होतात. ते तरुणांना भावनिक ब्लॅकमेल करतात. "तुम्ही शांत रहा, मी वरच्या साहेबांशी तुमची भेट करून मॅटर सोडवतो" अशी खोटी आश्वासने देऊन मंत्र्यांसोबत केवळ बैठकांचे सोपस्कार पार पडतात, पण मूळ प्रश्न सुटत नाही. मधल्या काळात वेळ गेल्यामुळे लोकांचा संताप निवळतो आणि जनसामान्यांच्या एकजुटीची ताकद विखुरली जाते.
सर्वात मोठी शोकांतिका ही आहे की, या स्पीडब्रेकर्सना आपण काय करतोय याचे भानच नसते. त्यांना वाटते की प्रस्थापित नेत्यांनी त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी टाकली आहे.
यामधील काही स्पीडब्रेकर्सकडे 'चिकित्सक विचारांचा' (Critical Thinking) पूर्ण अभाव असतो. वाचन, तर्क आणि विचारधारेशी त्यांचा संबंध नसतो आणि त्यांच्या नादी लागलेली गरीब तरुणाई त्यांच्या याच खोट्या रुबाबाच्या अंधारात ओढली जाते. हे लोक प्रस्थापित व्यवस्थेचे अप्रत्यक्ष गुलाम आहेत, हे त्यांना स्वतःलाच कळत नाही.
जर आजच्या तरुणांना भरकटायचं नसेल आणि या अदृश्य गुलामगिरीतून बाहेर पडायचं असेल, तर आपल्या अवतीभवती असलेले हे 'स्पीडब्रेकर्स' वेळीच ओळखता आले पाहिजेत. त्यांना बाजूला सारून चळवळ पुढे नेण्यासाठी एकच प्रभावी मार्ग आहे: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ साहित्याचे (Original Writings) आणि संविधानाचे प्रत्यक्ष वाचन करणे.
जेव्हा तरुण पिढी थेट मूळ ऐतिहासिक संदर्भ आणि खंड वाचेल, तेव्हा कुठलाही स्पीडब्रेकर त्यांची दिशाभूल करू शकणार नाही.
कारण शेवटी परमपूज्य विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनीच सांगून ठेवलं आहे:
“पुस्तक वाचले की मस्तक सुधारते आणि सुधारलेले मस्तक कधीही कोणासमोर नतमस्तक होत नाही.”
Name: तुषार मोहिते.
(Gen Artificial Intelligence Expert, आंबेडकरी तरुण)
Email: tusharmohite313@gmail.com


छान..! ❤️🙌 जय भीम!
ReplyDeleteधन्यवाद, नमो बुद्धाय जय भीम 🙏
Delete