✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    वर्षावास शुभारंभानिमित्त नाणेघाट–आंबिवली बौद्ध लेणी अभ्यास दौरा संपन्न; नैसर्गिक अडथळ्यांवर मात करत धम्म अध्ययन चारिका यशस्वी

               आषाढ गुरुपौर्णिमा आणि वर्षावास शुभारंभाच्या निमित्ताने एकजूट लेणी अभ्यास प्रचार समूह, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मुंबई–पुणे विभागाच्या संयुक्त विद्यमाने रविवार, २६ जुलै २०२६ रोजी नाणेघाट व आंबिवली बौद्ध लेणी अभ्यास दौरा, धम्म अध्ययन चारिका, लेणी संवर्धन कार्यशाळा आणि धम्मसेवा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या अभ्यास दौऱ्यात मुंबई आणि पुणे येथील उपासक-उपासिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

    Ambivli Naneghat Buddhist Caves


    नाणेघाट : इतिहासाचा जिवंत वारसा

    जुन्नर तालुक्यातील नाणेघाट हा सातवाहन काळातील महत्त्वाचा व्यापारी मार्ग म्हणून ओळखला जातो. कोकण आणि देश भागाला जोडणारा हा घाट आज इतिहासप्रेमी, अभ्यासक आणि ट्रेकर्ससाठी आकर्षणाचे केंद्र आहे.

    नैसर्गिक आपत्तीमुळे बदलला दौऱ्याचा मार्ग

    नाणेघाट परिसरात रस्ता खचल्यामुळे तसेच महाराष्ट्र वाहतूक पोलिसांनी घातलेल्या निर्बंधांमुळे नियोजित दौऱ्यात अडथळे निर्माण झाले. मात्र एकजूटचे संस्थापक दादूस डोळस यांनी पोलिस प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवत आणि सर्व सहभागींच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत अभ्यास दौरा आंबिवली बौद्ध लेणीकडे वळविण्याचा निर्णय घेतला. विशेषतः महिलांच्या सुरक्षिततेचा विचार करून घेतलेला हा निर्णय सर्वांनी कौतुकास्पद असल्याचे नमूद केले.

    आंबिवली बौद्ध लेणींचा अभ्यास

    कर्जत–मुरबाड मार्गावरील आंबिवली बौद्ध लेणी ही हीनयान परंपरेतील महत्त्वाची लेणी आहेत. येथे १२ विहार, ओसऱ्या आणि पाण्याच्या टाक्या असून त्यांचा ऐतिहासिक आणि पुरातत्त्वीय वारसा अभ्यासकांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

    या लेणींची माहिती दादूस डोळस आणि बबन ओव्हळ यांनी दिली. तसेच राकेश पवार यांनीही आंबिवली लेणींच्या इतिहासावर मार्गदर्शन केले.

    भंते संघरत्न यांची धम्मदेशना

    औरंगाबाद येथून विशेष उपस्थित राहिलेल्या आदरणीय भंते संघरत्न यांनी उपस्थितांना धम्मदेशना देत कार्यक्रमाला आध्यात्मिक उंची दिली. त्यांच्या उपस्थितीबद्दल सर्व सहभागींकडून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

    सन्मान आणि पुढील उपक्रम

    या प्रसंगी समाजसेवक सचिन पवार यांचा धम्मलिपी पुस्तक तसेच नथुराम जाधव लिखित महामाता रमाई – रामईच्या गोष्टी हे पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला.

    तसेच नाणेघाट दिशादर्शक फलक आणि आंबिवली बौद्ध लेणी माहिती फलक उभारण्यासाठी संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचा निर्धारही करण्यात आला.

    नाणेघाट दौरा पुन्हा आयोजित करण्याचा निर्णय

    नैसर्गिक अडथळ्यांमुळे नाणेघाटचा अभ्यास पूर्ण होऊ शकला नसला तरी सर्व सहभागींच्या एकमताने हा अभ्यास दौरा पुन्हा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

    मुंबईतील सुमारे ४० आणि पुणे टीममधील ८ अभ्यासकांनी या धम्म अध्ययन चारिकेत सहभाग घेतला. प्रतिकूल परिस्थितीतही बौद्ध वारसा जतन आणि संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम यशस्वी ठरला.

    — राकेश स. पवार

    एकजूट लेणी – लेणी संवाद

    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: