भारतीय लोकशाही, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि आपण..

भारतीय लोकशाही, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि आपण..

प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना मन:पूर्वक आनंदी सदिच्छा…! ६९ वर्षांपूर्वी आज भारतीय संविधानाचा अंमल करण्यास सुरुवात झाली होती. भारतीय संविधानाचा पहिलाच शब्द ‘आम्ही’ असे सांगतो, सामावून घेतो की, स्त्री-पुरुष असो, गरीब-श्रीमंत असो, निरक्षर-सुसाक्षर असो, जात-पात-धर्म या सर्व भेदांना बाजूला सारून एकसंध भारताची बांधणी करतो. म्हणजेच भारतीय संविधान हे मानव केंद्रित आहे, व्यक्ती केंद्रित आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीची फार सुंदर व्याख्या केलेली आहे. बाबासाहेब म्हणतात,
” लोकांच्या सामाजिक, आर्थिक जीवनात रक्ताचा थेंबही न सांडता क्रांतिकारी परिवर्तने आणता येतील असे शासनाचे स्वरूप किंवा प्रणाली म्हणजे लोकशाही..” अर्थातच लोकशाही तत्वामध्ये बाबासाहेबांना रक्तपात अपेक्षित नाही. बाबासाहेबांनी ही लोकशाही टिकून ठेवण्यास, तिची जोपासना करण्यास काही अटी सांगितलेल्या आहेत.
बाबासाहेब म्हणतात,
१) समाजामध्ये असमान-समानता नसावी, म्हणजे कुण्या एक वर्गाचे विशेषाधिकार नसावेत
२) लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचे अस्तित्व असावे
३) कायदा आणि प्रशासनामध्ये समानता असावी
४) संवैधानिक नैतिकतेचे पालन केले पाहिजे
५) बहूसंख्यांकांचा अल्पसंख्यांकांवर अत्याचार नसावा
६) समाजामध्ये नैतिकता असावी
७) त्याचबरोबर समाजामध्ये सार्वजनिक विवेक असणे गरजेचे आहे.
             आजच्या घडीला भारतीय लोकशाहीला शह देण्याचा प्रयत्न होत आहे. बाबासाहेबांनी सांगितलेल्या,
अटींच्या विरोधात आज भारतीय लोकशाही मध्ये चित्र आहे. किंबहुना, तशी परिस्तिथी घडतांना दिसत आहे. आज देशात विशिष्ट वर्गाला विशेषाधिकार देण्यात येत आहेत. संसदेमध्ये विरोधी पक्षाची घुसमट केल्या जात आहे. कायदा आणि प्रशासनामध्ये समानता नाही, जवळच्यांना आणि अर्थाजन करणाऱ्यांना वेगळी वागणूक असेल, अल्पसंख्याकांनवर बहुसंख्यांचा अत्याचार वाढत आहे असेल, अशातच मॉब लिंचिंग, झुंडशाहीच्या घटना आहेत. समाजामध्ये नैतिकता कमी होताना दिसत आहे. मग, ह्यात जतपंचायत असो, जाती-पातीचे तेढ असोत की, माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना असोत. त्याचबरोबर सर्वांमध्ये सार्वजनिक विवेकवादाची कमतरता निर्माण होत आहे. पुरोगामीत्वाचे कार्य करणाऱ्यांच्या विवेकाला त्यांची हत्या करून संपविणे असोत. एकंदरीत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या लोकशाहीच्या संवर्धनाच्या अटींनाच आज भारतीय लोक शह देण्याचा प्रयत्न करीत आहेत.

संविधान सभेला संबोधित करतांना लोकशाही कायम-टिकून ठेंवण्यासाठी आवश्यक असलेल्या काही साधनांचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर सल्ला देतात. त्यामध्ये बाबासाहेब म्हणतात,
१) संवैधानिक पद्धतीचा अवलंब करणे
२) एखाद्या महान माणसाच्या पायावर स्वातंत्र्य अर्पण न करणे
३) राजकीय लोकशाही सामाजिक लोकशाही बनविणे. यामध्ये,
संवैधानिक पध्दती म्हणजे, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना लोकशाही तत्वामध्ये क्रांतिकारी परिवर्तने, बदल हवेत परंतु, ते बदल-परिवर्तने कुठलाही रक्तपात न होता. ते संविधानात्मक पद्धतीने, संविधानाच्या चौकटीत राहून, संविधानात्मक पद्धतींच्या अधीन राहून झाले पाहिजेत. स्वातोंत्रोत्तर आणि स्वातंत्र्यापूर्वी सत्याग्रह हे एक प्रभावी शस्त्र वापरले जायचे, परंतु भारतीय लोकशाही स्थापित झाल्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रहास, जे की अहिंसक असूनही, त्याला विरोध केला होता. कारण की, ती संविधानबाह्य- गैर-संवैधानिक पद्धती होती.           एखाद्या महान माणसाच्या पायावर आपले स्वातंत्र्य अर्पण न करणे. याबद्धल डॉ.बाबासाहेब आंबेडकर, जॉन स्टुअर्ट मिल यांनी, लोकशाही तत्वाला मानणाऱ्या लोकांना दिलेल्या धोक्याच्या सुचनेची आठवण करून देतात. जॉन स्टुअर्ट मिल म्हणतो, “ कितीही महान व्यक्तीच्या पायावर आपण आपले स्वातंत्र्य अर्पिता काम नये. तसेच शासनसंस्थांचा ती व्यक्ती दुरुपयोग करील एवढी सत्तादेखील त्या व्यक्तीकडे आपण देता कामा नये.” डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा भारताबद्दल हाच धोक्याचा इशारा दिलेला आहे, कारण भारतामध्ये व्यक्तिपूजा-देवपूजा करण्याची संस्कृती आहे.त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, राजकीय लोकशाही ही सामाजिक लोकशाही झाली पाहिजे. राजकीय सत्ता ही सामाजिक प्रगतीची महत्वाची किल्ली आहे. राजकीय लोकशाहीच्या सिद्धांतात ‘ एक माणूस-एक मत’ आणि ‘एक मत-एक मूल्य’ आहे. राजकीय स्वातंत्र्याशिवाय लोकशाही अवास्तविक आहे. राजकीय लोकशाही सामाजिक लोकशाही बनली पाहिजे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या मते, “सामाजिक लोकशाहीचा आधारभूत पाया असल्याशिवाय राजकीय लोकशाही फार दिवस टिकाव धरू शकणार नाही.” सामाजिक लोकशाही म्हणजे काय? तर, समता, स्वातंत्र्य आणि बंधुभाव निर्माण करणाऱ्या जीवन जगण्याचा पध्दतीस सामाजिक लोकशाही म्हणता येईल.या तीनही मूल्यांची एकता व अखंडता त्याचबरोबर त्यांची जोपासना, म्हणजेच सामाजिक लोकशाही होय.  डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या लोकशाहीच्या विवेचनात आर्थिक लोकशाहीचा उल्लेख आहे. त्यांच्या मते, “ लोकांच्या असलेल्या आर्थिक मूलभूत गरजांची पूर्ती होणे, कोणतीही व्यक्ती ही अन्न, कपडे आणि घर यांवचून मरता कामा नये.” म्हणजेच आर्थिक साधनं ही कुण्या एकाच्या हातात नसावी. म्हणजेच, राजकीय लोकशाही ही सामाजिक व आर्थिक लोकशाहीशिवाय यशस्वी होऊ शकत नाही. राजकीय लोकशाही, सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठीचे सर्वात शक्तिशाली साधन आहे.
म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, “ Social and economic democracy are tissues and fiber of a political democracy.” लोकशाही जीवनाचा एक आदर्श आहे. सोशल रिलेशनशिपमध्ये लोकशाहीची मुले शोधली जातात व ती समाजाची स्थापना करणाऱ्या लोकांशी संबंधित, जीवनाच्या संदर्भात असतात. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाच्या मूल्यांवर, संविधानाच्या नैतिकतेवर अगाध विश्वास होता.आजच्या भारतीय लोकशाहीची परिस्तिथी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या अटींच्या विपरीत जात आहे. संविधानाच्या संवैधानिक पद्धतींच्या विरोधात जात आहे. लोकशाहीवादी, संविधानवादी लोकांनी आज भारतीय प्रशासनात जाण्यात अत्यंत गरज आहे. आज आपली जबाबदारी आहे की, भारतीय लोकशाहीला एकाधारशाहीच्या आलिंगातून मुक्तता करण्यासाठी संविधानाची मूल्ये, संविधानाची नैतिकता समाजात-जनमानसात रूजविण्याची, लोकांना शिकविण्याची आज नितांत आवश्यकता आहे. आपण सर्वजण मिळून हे कार्य करूयात.
“लोकशाही म्हणजे बुद्धाचा मार्ग होय.” अशी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची धारणा होती. लोकशाहीची एक अवस्था अशी की, “ युद्धकडून-बुद्धाकडे, बुद्धाकडून-विश्वशांतिकडे यालाच खरी लोकशाही म्हणता येईल.”

लेखक:-
टीम- लेखणी चळवळीची
मुंबई

पुढील लेख मिळवण्यासाठी ई-मेल टाकून फॉलोव करा..

अश्या  प्रकारे आपणही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर लिखाण करत असाल, तर ते लेख या वेबसाईटवर टाकायचे असल्यास  whattsapp 9930791372 यावर संपर्क करु शकता)

Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel