✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    आर्थिक मंदी : आंबेडकरवादी दृष्टीकोन,भाग-१

    आर्थिक मंदी  : आंबेडकरवादी दृष्टीकोन,भाग-१  

    भारतातील सद्याची आर्थिक मंदी किंवा स्लो-डाऊन हा आताचा सर्वाधिक चर्चेचा विषय आहे.अनेक कारखाने बंद पडत आहेत. विविध कारखान्यातील उत्पादन घटले आहे.उत्पादित झालेल्या वस्तू विक्रीविना पडून आहेत. अनेक उद्योग कामगार कपात करीत आहेत.शेअर बाजार कोसळतो आहे. जीडीपीचा दर दिवसेंदिवस घटतो आहे.डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य कमी-कमी होत आहे. अशी अनेक लक्षणे आर्थिक मंदी येत असल्याकडे अंगुलीनिर्देश करीत आहेत. ही आर्थिक मंदी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील  रा.स्व.संघ-भाजप सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे येत आहे असा मोदी विरोधकांचा आरोप आहे. दुसरीकडे देशातील आर्थिक स्थिती चिंता करण्यासारखी अजिबात नाही.मोदींच्या नेतृत्वाखाली देश प्रचंड वेगाने आर्थिक विकास करीत आहे असे मोदी समर्थकांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर आर्थिक मंदी, त्यांची वास्तविक कारणे,त्यावर सरकारी स्तरावर, सामाजिक स्तरावर आवश्यक असलेले उपाय, आर्थिक मंदीचा कष्टकरी,साधनहीन समाजघटकांवर होणारा परिणाम यावर प्रस्थापित सरकार विरोधी किंवा सरकार समर्थक याऐवजी  निखळ अर्थशास्त्रीय दृष्टीकोनातून चर्चा व्हायला पाहिजे.  त्याचबरोबर आर्थिक मंदीची सर्वात जास्त झळ कष्टकरी,साधनहीन आणि भारतीय समाजातील जातिव्यवस्थेच्या उतरंडीतील कनिष्ठ स्तरांना अधिकाधिक प्रमाणात बसणार असल्याने यावर आंबेडकरवादी दृष्टीकोनातून  चिंतन आणि विश्लेषण होणे आवश्यक वाटते.


    आर्थिक मंदी किंवा ‘स्लो डाऊन’ म्हणजे काय ?

    आर्थिक मंदी म्हणजे नेमके काय याविषयी सामान्य जनतेमध्ये अत्यंत ढोबळ कल्पना रुजलेल्या आहेत. जेव्हा कोणत्याही देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या (जीडीपी) वाढीचा दर सातत्याने घटत जातो  तेव्हा त्यास अर्थव्यवस्था ‘स्लो डाऊन’ होणे असे म्हणतात. ( जसा भारतात हा दर सातत्याने घटतो आहे ) जर सतत सहा महिने सकल राष्ट्रीय उत्पादन कमी-कमी होत गेलं (जीडीपी वाढीचा दर निगेटिव्ह होत गेला) तर त्याला मंदी किंवा ‘रिसेशन’ म्हणतात आणि ही मंदी आर्थिक क्रीयाकलापाच्या सर्व क्षेत्रात ( औद्योगिक उत्पादन, शेती उत्पादन,सेवा क्षेत्र, आयात-निर्यात,रोजगार निर्मिती इत्यादी ) खोलवर पसरत जाणारी असेल  आणि अधिक  काळ टिकणारी असेल तर त्याला महामंदी किंवा ‘डिप्रेशन’ असे म्हटले जाते. अमेरिकेत अशा प्रकारची महामंदी (ग्रेट डिप्रेशन) १९२९ ते १९३९ च्या दरम्यान  आली होती. त्यानंतर २००८ मध्ये अमेरिकेत ‘सब प्राइम क्रायसिस’ च्या निमित्ताने महामंदीची चाहूल लागली. मात्र अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी परिस्थिती कौशल्याने हाताळून अमेरिकन अर्थव्यवस्थेला या धोक्यातून बाहेर काढले. आज परिस्थिती पुन्हा बदलली आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची आततायी धोरणे, यातून निर्माण झालेले अमेरिका-चीन व्यापार युद्ध, ब्रिटनचे युरोपियन युनियन मधून बाहेर पडणे(ब्रेक्झीट) जगभरात अतिवादी उजव्या विचारांचे होत असलेले पुनरुत्थान, यातून आंतरराष्ट्रीय समुद्यातील बिघडलेले सौहार्द्राचे वातावरण इत्यादी अनेक कारणांचा एकत्रित परिणाम घडून जग पुन्हा एकदा आर्थिक महामंदीच्या दिशेने वाटचाल करण्याची भीती निर्माण झाली आहे.

    आर्थिक मंदी का येते?

    आर्थिक मंदी का येते? याचे ठोस कारण अजूनही प्रस्थापित अर्थतज्ज्ञांना नमूद करता आलेले नाही.याविषयी अनेक मतप्रवाह आहेत.मात्र आर्थिक मंदीचे अरिष्ट व त्यावर काय उपाय केले पाहिजेत यावर सखोल विचार जॉन मेनॉर्ड केन्स या ब्रिटीश अर्थतज्ज्ञाने केला आहे. हा अर्थशास्त्रीय विचार ‘केन्सीयन इकॉनॉमीक्स’ या नावाने प्रसिद्ध आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्थशास्त्रीय लिखाणात तसेच त्यांच्या ‘राज्य समाजवाद’ या संकल्पनेत आर्थिक मंदीवर मात करण्याची अनेक सूत्रे सापडतात. यावर विस्ताराने चर्चा पुढे येईलच. जेव्हा जनतेमध्ये प्रचंड आर्थिक विषमता वाढते त्यावेळी उत्पादित झालेल्या सर्व वस्तू खरेदी करण्याची क्षमता जनतेकडे राहत नाही.यामुळे वस्तूंची मागणी कमी होते. उत्पादित झालेल्या वस्तू बाजारात पडून राहायला लागतात. यामुळे उत्पादित केलेलाच माल खपत नाही. मग ‘नवीन उत्पादन कशाला करा?’ या मानसिकतेतून नवीन उद्योग निर्माण होत नाहीत आणि जे अस्तित्वात आहेत ते वाढत नाहीत. यामुळे कारखाने बंद पडतात. त्यातून कामगार/कर्मचारी बेकार होतात आणि जनतेची खरेदीक्षमता अधिकाधिक घटत जाते. यामुळे एकामागोमाग एक कारखाने बंद पडत जातात. हे एक चक्रच चालू होते. यामुळे राष्ट्रीय उत्पादनाच्या (जीडीपीच्या) वाढीचा दर घटत जातो. व तो सतत घटत राहिला तर आर्थिक मंदी निर्माण होते.  (क्रमशः )

     ©सुनील खोबरागडे
    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: