✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    आर्थिक मंदी : आंबेडकरवादी दृष्टीकोन, भाग -२

    आर्थिक मंदी : आंबेडकरवादी दृष्टीकोन, भाग -२

    सट्टेबाजीवर आधारित अर्थव्यवस्थेची स्थापना !

    आर्थिक मंदी हे एकूणच अर्थव्यवहारातील भीषण वास्तव आहे. पहिली जागतिक महामंदी सन १९२९ ते १९३९ अशी जवळपास १० वर्षे कायम राहिली.दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका व इतर अँग्लो-सॅक्सन   देशांनी जॉन  मेनॉर्ड केन्स प्रणीत केनेसियन आर्थिक विचारावर अर्थव्यवस्थेची उभारणी केली. यामुळे पुढील जवळपास ४० वर्षे  जागतिक अर्थव्यवस्थेची वेगाने वाढ झाली. हा काळ भांडवली अर्थव्यवस्थेचा सुवर्णकाळ म्हणून ओळखला जातो. यानंतर मात्र आर्थिक विकासाची गती मंदावली.साधारणपणे १९८० च्या दशकात जागतिक अर्थव्यवस्था कुंठीतावस्थेच्या ( Stagflation) फेऱ्यात सापडली. यामुळे केन्सियन आर्थिक मॉडेलचे विरोधक असलेल्या उजव्या मार्केट फंडामेंटलिस्ट अर्थतज्ञांनी ( जे निओ लिबरल इकॉनॉमिक विचारांचे होते ) या अवस्थेला केन्सच्या आर्थिक विचारांना जबाबदार धरले. अर्थव्यवस्थेवर कोणतेही सरकारी नियंत्रण असू नये. अर्थव्यवस्था बाजाराच्या नियमाप्रमाणे चालावी. सरकारने त्यात हस्तक्षेप करू नये असा जोरदार प्रचार निओ लिबरल इकॉनॉमीच्या पुरस्कर्त्यांनी केला. यामुळे सन १९७० नंतर  अमेरिकेने आपल्या आर्थिक धोरणात बदल करण्यास सुरुवात केली. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निक्सन यांनी सन १९७१ मध्ये अमेरिकन डॉलरचा सुवर्ण विनिमय आधार (Gold Standard) रद्द केला. त्यानंतर १९७३ साली डॉलरचा फिक्स्ड एक्स्चेंज रेट  समाप्त करून फ्लोटिंग एक्स्चेंज रेट लागू केला. अर्थव्यवस्थेवरील सरकारचे नियंत्रण कमी करण्यास सुरुवात केली. पुढे जगभरातील बहुतेक सर्वच देशांनी ही निओ लिबरल इकॉनॉमी किंवा मुक्त भांडवली अर्थव्यवस्था स्वीकारली. सद्याच्या काळात वारंवार उद्भवणाऱ्या आर्थिक अरिष्टांची बीजे या निओ लिबरल किंवा मुक्त भांडवली अर्थव्यवस्थेच्या अंगभूत दुर्गुणात समाविष्ट आहेत. वर्तमानात भारत देश मुक्त भांडवली अर्थव्यवस्थेच्या तत्त्वप्रणालीनुसार आपली अर्थव्यवस्था चालवितो आहे. यामुळे आपल्या आर्थिक दुरावस्थेचे कारण समजून घेण्यासाठी  मुक्त भांडवली अर्थव्यवस्था कोणत्या तत्त्वावर कार्य करते हे समजून घेण्याची आवश्यकता आहे.

    मुक्त भांडवली अर्थव्यवस्थेची मूलतत्त्वे

    सद्य:स्थतीत आपण ज्या आर्थिक व्यवस्थेला आपल्या आर्थिक जीवनाचा केंद्रबिंदू म्हणून स्वीकारले आहे ती अर्थव्यवस्था नवउदारमतवादी किंवा मुक्त भांडवली आर्थिक धोरणावर  ( Neo Liberal Financial Policy)  आधारलेली आहे. यानुसार आर्थिक व्यवहारावर सरकारचे नियंत्रण नसावे,आर्थिक व्यवहार  बाजारपेठेच्या  नियमानुसार  चालावेत,सर्व  प्रकारचे कर कमीत-कमी असावेत, व्यापारावर  देशांच्या भौगोलिक सीमांचे बंधन नसावे. म्हणजेच, कोणत्याही देशाची बाजारपेठ इतर देशांना व्यापारासाठी खुली असावी ही आर्थिक व्यवहाराची  मुलभूत तत्वे आहेत. हे आर्थिक तत्त्वज्ञान, व्यक्तीचे स्वातंत्र्य आणि व्यक्तीचे सुख-समाधान यावर कोणाचेही नियंत्रण असू नये या अमेरिकन अनिर्बंध व्यक्तीस्वातंत्र्यवादी तत्वज्ञानावर आधारित आहे. यामध्ये खालील महत्वाच्या आर्थिक तत्वाचा समावेश आहे.

    १)  शासनसंस्थेची स्थापना व्यक्तीचे व्यक्तिगत हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी करण्यात आलेली आहे.शासनसंस्थेला प्राप्त झालेले अधिकार शासितांच्या (प्रजेच्या)  सहमतीतून प्राप्त झालेले आहेत.यामुळे शासनसंस्थेची व्यक्तीवरील हुकुमत मर्यादित असेल.

    २) सरकारने कोणत्याही उपक्रमाला,व्यक्तीसमुहाला झालेला आर्थिक तोटा भरून काढण्यासाठी किवा वस्तू आणि सेवांच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी अर्थसहाय्यता (Subsidy) देऊ नये. किवा असे अर्थसहाय्य शक्य तेवढ्या किमानतम पातळीवर असावे.

    ३) सरकार जेव्हा व्यक्तिगत हक्कामध्ये हस्तक्षेप न करता उस्फुर्त आर्थिक स्पर्धेस अनिर्बंध उत्तेजन देईल त्यावेळी जनतेला अधिकाधिक दर्जेदार वस्तू व सेवा किमान किमतीत पुरविल्या जाऊ शकतील.यामुळे जनतेला अधिकतम आर्थिक लाभ मिळतील

    ४) साधनसंपत्तीवर व्यक्तीची व्यक्तिगत मालकी असणे हा साधनसंपत्तीचा किफायतशीर वापर करण्याचा सक्षम उपाय आहे.

    आजच्या काळात जगातील अधिकतम देशांनी स्वीकारलेल्या  मुक्त बाजारपेठीय अमेरिकन भांडवलशाही अर्थव्यवस्थेची ही मुलतत्वे ज्यू-ख्रिश्चन (Judeo-Christian  principles )  तत्वप्रणालीच्या आधारावर विकसित झालेल्या स्वयंसर्वोत्तमवाद आणि स्वेच्छाचरणवाद या अमेरिकन नितीशास्त्रावर आधारित आहेत. यामुळे जगाची एकूणच आर्थिक व्यवस्था अनिर्बंध आर्थिक स्वेच्छाचरण,प्रचंड सट्टेबाजी, कृत्रिम आर्थिक विकासाचे बुडबुडे (Financial Bubbles) निर्माण करणे या दुर्गुणांनी ग्रस्त झाली आहे. यातूनच आर्थिक अरीष्टांची किंवा आर्थिक मंदीची वारंवारिता वाढली आहे. ती कशी हे पुढील भागात पाहू. (क्रमशः)
    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: