आर्थिक मंदी : आंबेडकरवादी दृष्टीकोन, भाग -३

आर्थिक मंदी : आंबेडकरवादी दृष्टीकोन, भाग -३

कृत्रिम आर्थिक विकासाचे बुडबुडे (Financial Bubbles)

अमेरिकेने डॉलरचा सुवर्ण विनिमय आधार (Gold Standard) रद्द करून डॉलरचा फ्लोटिंग एक्स्चेंज रेट लागू केल्यामुळे परकीय चलनामध्ये प्रचंड सट्टेबाजी सुरू झाली. या काळामध्ये अमेरिका आणि युरोपमधल्या मॅन्युफॅक्चरिंगमधला नफ्याचा दर प्रचंड गतीने खाली आला. सोन्याच्या किमती प्रचंड गतीने वाढण्यास सुरुवात झाली. श्रीमंतानी व भांडवलदार उद्योजकांनी आपल्याकडील पैसा हा वस्तूंच्या उत्पादनात गुंतवण्याऐवजी शेअर मार्केट, म्युच्युअल फंड आणि परकीय चलन यांच्या सट्टेबाजींमध्ये गुंतविण्यास सुरुवात केली. यातून ‘वित्तीय भांडवल’ (फायनान्स कॅपिटल) या संकल्पनेचा उदय झाला. वित्तीय भांडवल म्हणजे आर्थिक विकासाच्या नावाने निर्माण करण्यात आलेला पहिला आर्थिक बुडबुडा (Financial Bubble) होय. सन १९७९ साली व्होकर कमिटीने वित्तीय भांडवलावरचे सर्व निर्बंध काढून टाकले. यामुळे आता सट्टेबाजीतून निर्माण झालेले वित्तीय भांडवल हेच अर्थव्यवस्थेला गती देणारा मुख्य स्त्रोत बनले. वित्तीय भांडवलाचा पसारा प्रचंड वाढला आणि त्याचे अनेक प्रॉडक्टस आणि डेरिव्हेटिव्हज् तयार झाले. याच काळात माहिती तंत्रज्ञान युग ( Information Technology Age ) अवतरले. आर्थिक विनियंत्रण (Liberalization), जागतिकीकरण आणि इंटरनेट यांच्या वाढीमुळे वित्तीय भांडवलाचा बुडबुडा प्रचंड विस्तारला. यामुळे हे वित्तीय भांडवल जगभर कुठेही अर्निबधपणे संचार करू लागले. भांडवलदारांना त्यांच्याकडील भांडवलाची गुंतवणूक आपल्या देशात करण्यासाठी जगभरातील अनेक देश पायघड्या घालू लागले. भरपूर वित्तीय भांडवल बाळगणाऱ्या श्रीमंत गुंतवणूकदारांनी (High Net Worth Investors ) आणि भांडवलदारांनी आपला पैसा  कोणत्या देशातील कोणत्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवायचा, याचा अभ्यास करून सल्ला देणाऱ्या जे. पी. मॉर्गन, गोल्डमन सॅक्स, मॉर्गन स्टॅनली, नोमुरा, टाटा कॅपिटल, रिलायंस कॅपिटल, एल. अॅण्ड टी. फायनान्स यासारख्या सल्लागार कंपन्या उदयास आल्या.परंपरागत बँकिंग व्यवसाय मागे पडून इन्वेस्टमेंट बँकिंग ही नवीन संकल्पना बँकिंग क्षेत्रात निर्माण झाली.इन्वेस्टमेंट बँकिंग कंपन्यांनी व आर्थिक सल्लागार कंपन्यांनी आर्थिक विषयाचे उच्च शिक्षण (CA,CFA, MBA Finanace वगैरे ) घेतलेल्या सट्टेबाजीतील निष्णात सल्लागारांना भरभक्कम पगार देऊन नोकरीस ठेवले. तसेच IT क्षेत्रात उच्च शिक्षण घेतलेल्या इंजिनिअर्सना नवीन संज्ञापन प्रणाली ( Software) तयार करण्यासाठी मागणी वाढली. यातून प्रचंड रोजगार वाढला. सट्टेबाजीतून प्रचंड नफा कमावलेल्या श्रीमंत गुंतवणूकदारांनी आणि भरभक्कम पगारावर नोकरी करणाऱ्या नोकरदारांनी आपल्याकडे आलेल्या पैशातून आलिशान घरे, विविध कंपन्याचे शेअर्स, सोने इत्यादीसारख्या मिळकती ( Assets) खरेदी करण्यास सुरुवात केली. यातून या मिळकतीच्या ( Assets)  किमती अतिप्रचंड वेगाने वाढल्या. यामुळे प्रचंड आर्थिक विकास झाल्याचा आभास तयार झाला. हा  आर्थिक विकास हा खराखुरा नैसर्गिक आर्थिक विकास  नसून सट्टेबाजीतुन निर्माण झालेल्या वित्तीय भांडवलाने तयार केलेला कृत्रिम आर्थिक बुडबुडा होता. हा कृत्रिम बुडबुडा आज ना उद्या फुटून आर्थिक अरिष्ट ओढवणे क्रमप्राप्त असते.


निओलिबरल मुक्त अर्थव्यवस्थेचे व्यवच्छेदक लक्षण !

आर्थिक विकासाच्या कृत्रिम बुडबुड्यामुळे मिळकतीच्या ( Assets) किमती वाढल्याने ज्यांनी मिळकत धारण केली आहे, अशा मध्यम आणि उच्चमध्यमवर्गीय लोकांना आपण आता श्रीमंत झालो आहोत; आता आपल्याला आपल्या दर्जाला साजेसा खर्च करायला हरकत नाही अशी भावना तयार होते. यातून हा श्रीमंत,उच्च मध्यमवर्गीय, मध्यमवर्गीय समूह खऱ्याखुऱ्या अर्थव्यवस्थेत प्रवेश करतो व चैन करायला लागतो. यामुळे टीव्ही, फ्रीज, कॉम्प्युटर, एअरकंडिशनर, मोटरगाडी अशा अनेक चैनीच्या वस्तू विकत घ्यायला लागतो.  मोठमोठ्या मॉल्समध्ये जाऊन ब्रँडेड कपडे, ब्रँडेड शूज, उंची अत्तरे, इत्यादी चैनीच्या गोष्टी खरेदी करायला लागतो. परदेशप्रवास, हॉटेल्समधील वास्तव्य, ब्युटीपार्लर्स आणि सौंदर्यप्रसाधनांवरील खर्च,बॉडी बिल्डींग,व्यायाम,जीम यावर वारेमाप पैसे खर्च केले जातात. यामुळे चैनीच्या वस्तूंना प्रचंड प्रमाणात मागणी वाढते. उद्योजक त्या वस्तू तयार करण्याकरता गुंतवणूक करून नवीन कारखाने काढतात. हे उद्योग निघाल्यावर कौशल्य शिक्षण, उच्च शिक्षण घेतलेल्या सुशिक्षित आणि मध्यमवर्गीयांना नोकऱ्या मिळतात. अकुशल कामगारांना रोजगार मिळतो. त्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढते.नोकऱ्या आणि रोजगारामुळे त्यांची खरेदीशक्ती वाढल्याने ते सुद्धा खऱ्या अर्थव्यवस्थेमध्ये म्हणजेच बाजारात उतरून वस्तू खरेदी करायला लागतात. अशा प्रकारे कृत्रिम आर्थिक बुडबुडय़ांमुळे खऱ्या अर्थव्यवस्थेत मागणी व त्यामुळे गुंतवणूक व त्यामुळे रोजगार आणि उत्पादन वाढून तेजी येते. अर्थव्यवस्थेत निर्माण झालेली ही प्रगती कृत्रिम आर्थिक बुडबुडय़ांमुळे निर्माण झालेली असल्यामुळे ती निरोगी किंवा ‘नॉर्मल’ नसते. त्यामुळे ही प्रगती टिकाऊ राहू शकत नाही. कधीतरी हा कृत्रिम आर्थिक बुडबुडा फुटतो आणि आर्थिक मंदी किंवा स्लो डाऊन निर्माण होतेच. सट्टेबाजीवर अवलंबून असलेल्या निओलिबरल मुक्त अर्थव्यवस्थेचे हे व्यवच्छेदक लक्षण आहे. अमेरिकेमध्ये सन २००८ साली सब प्राईम क्रायसिसच्या माध्यमातून हा आर्थिक बुडबुडा फुटला. त्यास सरकारने बेलऑउटच्या नावाने सरकारी अर्थसहाय्य करून सावरले. यामुळे ते आर्थिक अरिष्ट तात्पुरते सावरले.मात्र बेलऑउट हा आर्थिक मंदीवरील कायम स्वरूपी उपाय होऊ शकत नाही हे  सद्याच्या जागतिक आर्थिक वातावरणावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. भारतामध्ये गृहबांधणी क्षेत्राचा आणि IT क्षेत्राचा कृत्रिम रित्या फुगविण्यात आलेला आर्थिक बुडबुडा आता फुटला आहे. मोदी सरकारने घेतलेले घातक आर्थिक निर्णय यांची त्यात भर पडली आहे. यामुळे भारतीय अर्थव्यवस्था मंदीच्या वाटेवर चालू लागली आहे.  (क्रमशः)
Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel