महाभारतावर बुद्ध धम्माचा प्रभाव

*महाभारतावर बुद्ध धम्माचा प्रभाव*

मूळलेखक - डॉ. पी. वि. बापट
अनुवाद - अरविंद भंडारे.

ब्राह्मण मान्यतेनुसार यज्ञामध्ये देवतांसाठी पशुबळी दिले जात असत. याच्या अतिरेकामुळेच तत्कालीन भारतीय जनसमुदायात क्रांतीची भावना उत्पन्न झाली. वैदिक यज्ञ करण्यासंबंधीच्या मतांत हळू हळू जटीलता येऊ लागली होती होती त्यामुळे ते संपन्न करण्यास निपुण पुरोहितांची आवश्यकता भासू लागली जे की ह्या कामात निपुण होते. अश्याप्रकारे यज्ञांवर ब्राह्मणांचा एकाधिकार प्रस्थापित झाला. सामान्यजन त्यामध्ये कोणतीही ढवळाढवळ करत नसे या अवस्थेमुळेच बौद्धिक आणि सामाजिक क्रांतीचा मार्ग खुला झाला, ज्याचे पहिले उदाहरण आपणाला उपनिषद काळात मिळतात. ब्राह्मणांनी आपल्या यज्ञसंबधी मताच्या बाजूने जे सिद्धांत मांडले त्या सर्व मतांचे  अंधानुकरण करण्यास लोक तयार नव्हते. स्वतंत्र चिंतनाचे एक आंदोलन सुरू झाले ज्याचे नेतृत्व ब्राह्मणेतरांनी केले विशेषतः प्रथम क्षत्रियांनी. ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की ह्या परिवर्तनामुळे आपण कधी कधी ब्राह्मणांना सुद्धा क्षत्रियांचे शिष्यत्व स्वीकारताना पाहतो.

*ब्राह्मण क्षत्रियम अधस्ताद उपास्ते  ( बृहदारण्यक उपनिषद 1-4-11 ).*
पालि ग्रंथात ह्या गोष्टींवर जोर दिला गेला आहे की क्षत्रिय ब्राह्मणांपेक्षा श्रेष्ठ आहे. *खत्तिया सेट्ठा जनेतस्मि ये गोत्तपटिसारिनो । ( दिघ. प्र. 99 ).*
याच बौद्धिक आणि सामाजिक क्रांतीने जैन व बुद्ध धर्माला जन्म दिला. या विरोधी धार्मिक आंदोलनाने तत्कालीन भारतीय सामान्यजन खूप प्रभावित झाले.
ते विचार करू लागले की या धार्मिक आंदोलनात ते ही भाग घेऊ शकतात जे आंदोलन उघडपणे वेदांचे प्रामाण्य आणि धार्मिक जीवनचर्येवर ब्राह्मणांच्या एकाधिकाराला आव्हान देते.
या जैन तथा बौद्ध मतांनी वैदिक यज्ञांमध्ये होणाऱ्या पशुवधाच्या विरुद्ध आपले आंदोलन अगदी यशस्वीरीत्या चालविले. या यज्ञांमध्ये हजारो गाई, रेडे, बकऱ्या, मेंढ्या, कोंबड्या इ. बळी दिल्या जात असत. दर्भासाठी ( गवत ) मोठी मोठी जंगले नष्ट केली जात असत हे वर्णन आपणांस दीघ्घनिकायाच्या कूटदन्त सुत्तामध्ये मिळते. परंतु ही गोष्ट काही प्रमाणात अतिशयोक्ती आणि धार्मिक विद्वेषपूर्ण सुद्धा असू शकते. खूप मोठा जन समुदाय या धार्मिक मतांच्या बाजूने उभा राहत राहत होता. कारण हे होते की त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीने जनसामान्यांना खुप प्रभावित केले होते. याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रभाव ब्राह्मणांवर सुद्धा पडला आणि ते ही नव्या पद्धतीने विचार करू लागले. त्यांच्यामध्ये जे विचारवंत होते त्यांनी आपल्या विरुद्ध असलेल्या या आक्षेपांची तर्कसंगतता स्वीकारली व स्वतः मध्ये बदल करण्याचे ठरविले. त्यामुळेच त्यासमयीच्या काही ब्राह्मण ग्रंथामध्ये आपणाला पशुवध असलेल्या यज्ञांचा विरोध पहावयास मिळतो. काही काळ गेल्यानंतर आपणांस हे सुद्धा पहावयास मिळते की काही नवीन संप्रदायांचा जन्म झाला ज्यात आपल्या आराध्य देवासमोर ( जे सर्वांचे आराधनेचे विषय असतात ) सर्व वर्णांची समानतेची बाब मान्य केली गेली आहे. ही गोष्ट सर्वच ठिकाणी मान्य केली जाते की भारताचे विशिष्ट महाकाव्य महाभारत एक विश्वसाहित्य कृती आहे. याची रचना विश्वकोषासारखी आहे. काही ठिकाणी असे ही लिहलेले आढळते की ही कृती धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चार बाबींचे इतिहास, काव्य आणि शास्त्र आहे. या महान कृतीत आपणाला सर्व दार्शनिक आणि धार्मिक चिंतन, ऐतिहासिक किंवा अर्धऐतिहासिक रचनेचे नीती कथा श्लोक व आचरणसंबधी उपदेशांसोबत चित्रित पहावयास मिळतात. यामध्ये आपण सांख्य, योग, वेदांत, पाञ्चरात्र, पाशुपत इत्यादींची मते सुद्धा पाहतो. तथापि ही गोष्ट ब्राह्मण ग्रंथकारांनी स्पष्टपणे मान्य केली नसली तरीसुद्धा महाभारत बौद्ध विचारांच्या प्रभावाने प्रभावित होण्याचे राहिले नाही. महाभारताच्या कुम्भकोण संस्करणातील परिच्छेदात - ज्यामध्ये बुद्धांच्या उत्पत्ती विषयी भविष्यवाणी केली गेली आहे त्याला आपण नंतरचा प्रक्षिप्त अंश मानू शकतो. कारण हा भाग उत्तरभारतातील संस्करणामध्ये मिळत नाही. तरीसुद्धा ही खूप मजेशीर गोष्ट आहे की त्या परिच्छेदाला लिहिणारा बुद्धांच्या उत्पत्तीचा प्रभाव कसा मांडतो.

*शूद्रा: शुद्धेषु भुज्यन्ते मयि बुद्धत्वमागते ।*
*भविष्यन्ति नरा: सर्वे बुद्धा: काषायसंवृता : ।।*
*अनध्याया भविष्यन्ति विप्रा मार्गविवर्जिता : ।*
*अग्निहोत्राणि सीदन्ति गुरुपूजा च नश्यति ।। 44-45*

( माझ्या बुद्ध होण्याने शूद्र लोक शुद्ध वर्णवाल्या लोकांसोबत भोजन करतील. सर्व मनुष्य काषाय वस्त्रधारी बुद्ध होतील. पदभ्रष्ट ब्राह्मण आपले अध्ययन क्रम सोडून देतील. अग्निहोत्र लुप्त होतील. परंपरागत पूजल्या जाणाऱ्या गुरूंची पूजा नष्ट होईल ). मागील पिढीतील पश्चिम भारतातील महाभारताचे प्रसिद्ध विद्वान दिवंगत रावबहादूर चिंतामणराव वैद्य ज्यांच्यावर आपण बौद्धांच्या बाजूने असण्याचा तिळमात्र आक्षेप घेऊ शकत नाही त्यांनी महाभारत आदीपर्व वर केलेल्या त्यांच्या टिप्पणी मध्ये स्पष्ट रूपाने मान्य केले आहे की भारताच नाही तर संपूर्ण विश्व बुद्ध धर्माच्या प्रति दोन गोष्टींसाठी ऋणी आहे. एक तर ही की पशुवध वाल्या यज्ञांच्या विरोधात यशस्वीपणे आंदोलन चालविले आणि दुसरे हे की बुद्ध धर्माने मन, शील आणि कर्म यांच्या पवित्रतेवर अधिक भर दिला. बुद्ध धर्माचे प्रचाराचे हे तत्व  जनसमुदायात अधिक सहाय्यक झाली.

या प्रभावाचे स्पष्ट चिन्ह आपणाला महाभारतात मिळतात. यामध्ये आपणाला एक साथ दोन्ही प्रकारचे परिच्छेद पहावयास मिळतात. एक तर हे की ज्यात पशुवधाचे समर्थन केले गेले आहे कारण ही भारताची जुनी परंपरा होती. सोबतच आपण दुसरी गोष्ट पाहतो ज्यात मांसप्राशन निषिद्ध मानले गेले आहे. तसेच त्या यज्ञांची निंदा सुद्धा केली गेली आहे. शान्तिपर्वात आपणास सांगितले जाते की असा अश्वमेध यज्ञ केला होता ज्यात कोणत्याही प्रकारचे पशुवध केले गेले नव्हते ( न तत्र पशूघातो भूत ). 324 व्या अध्यायात आपणाला पशुवधासंबधी दोन मत दिसतात. ऋषी मुनींनी त्या यज्ञांचे समर्थन केले आहे ज्यात अन्नाचा बळी दिला गेला पाहिजे. परंतु देवांनी पशुबळींची मागणी केली आहे. अनुशासन पर्व 115-16 मध्ये आपणांस हे पहावयास मिळते की अश्वमेध यज्ञ आवश्यक समजला गेला तर तो प्रतिमास केला जाऊ शकतो परंतु त्यात मांसभक्षण न करणे हे कुशल असेल. यासोबत एक मोठी परंपरा जोडण्यासाठी हे सुद्धा सांगितले गेले आहे की कृतयुगात कोणत्याही प्रकारची पशुबळी दिली जात नसे - अहिंसा यज्ञपशवो. आणि असे सुद्धा सांगितले जात असे की अन्नापासून पशु निर्मित केला जात असे. 'श्रुयते ही पुरा कल्पे नृपाम ब्रीहीमय: पशु:
महाभारताच्या एका संस्करणात ( कुम्भकोण ) पिठापासून ( पिष्टमय: पशु: ) बनविलेल्या पशूंचा उल्लेख आहे. तुलाधार आणि जाजलि यांच्यामध्ये झालेल्या संवादात पशुबळींची निंदा केली आहे. तसेच हे सुध्दा सांगितले गेले आहे की यज्ञांमध्ये मांस खाण्याची परंपरा काही धुर्तांकडून चालविली गेली आहे. 12-254-45-47 मध्ये एक गाय आणि रेड्याचा बळी देण्याचा उल्लेख आला आहे. या गंभीर पापाच्या फळस्वरूप ऋषी मुनींनी शंभर रोग व व्याधींची वर्षा केली. हे उदाहरण सुत्तनिपातातील 'ब्राह्मण धम्मिय सुत्त' मधील गाथेशी साम्य दर्शविते ज्यात उल्लेखिलेले आहे.
*अधम्मोति पक्कन्दुं यं निपति गवे ।*
*पसूनं च समारम्भा अट्ठानवुतिमागमुं ।।*

महाभारतात अहिंसेला परमधर्म मानले गेले आहे ( 13-115-24-25 ). अहिंसेला सर्व धर्माहून श्रेष्ठ मानले गेले आहे - अहिंसैव हि सर्वेभ्यो धर्मेभ्यो ज्यायसी मता ( 12-257-6 भ. यो. रि. इ. ). ही बाब वेगळी आहे की थेरवादी बौद्ध मांस भक्षणाला त्यागण्याच्या तत्वाला इतके महत्व देणार नाहीत. परंतु ही गोष्ट ध्यानात ठेवण्यासारखी आहे की महायानी बौद्धांनी मांसभक्षणाच्या व्यसनाला सोडण्याचे मान्य केले होते. लंकावतार सूत्राच्या आठव्या अध्यायात पहा ज्यात शिक्षा समुच्चय विस्ताराने उदधृत आहे. आणखी खूप सारे परिच्छेद प्रस्तुत केले जाऊ शकतील, परंतु ते अनावश्यक असतील. कारण आपणाकडे या गोष्टी सिद्ध करण्यासाठी खूप सारी सामग्री आहे.
एक दुसरी गोष्ट ज्याच्या विषयी आपण वर उल्लेख केला आहे ती ही की मनुष्याचे गुण त्याच्या आचरणावर अवलंबून असतात ना की त्याच्या जन्मावर. ब्राह्मण त्याच्या गुणांनी आणि आचरणाने पदभ्रष्ट झाल्यावर शूद्र होतो. उलटपक्षी एक शूद्र सुद्धा ब्राह्मणांसारखा दुसऱ्यांसाठी पूजनीय होतो. जर तो पवित्र असेल किंवा त्याने आपल्या कर्म बलाने आपल्या इंद्रियावर विजय मिळविला असेल. असे खुद्द ब्रह्मा ने म्हटले आहे. या मजेशीर परिच्छेदाच्या शेवटी हा उल्लेख येतो की : "येथे या गोष्टीचे रहस्य सांगितले की कसा एक शूद्र ब्राह्मण बनतो आणि पदभ्रष्ट होऊन कसा एक ब्राह्मण शूद्र बनतो"( 13.143.47-59 ). कोणी ब्राह्मण बनण्यासाठी त्याच्यातील अंतर्भूत गुण महत्वाचे आहेत न की त्याचे अध्ययन. जरी त्याने खूप वाचन - अध्ययन केले असेल तर त्याला बहुपाठी व्यक्ती म्हटले जाईल : *'विद्यात् बहुपठन्तं तु द्विजं वै बहुपाठिनम् ।'*
यामुळे हे क्षत्रिय ही गोष्ट जाणून घे  की मंत्रोच्चार करण्याने कोणी ब्राह्मण बनत नाही. सत्यापासून विचलित न होण्यानेच मनुष्य ब्राह्मण होतो ( उद्योग 43. 27-29 ).

महाभारतात अधिक नाही तर कमीत कमी दोन ठिकाणी तरी अष्टांगिक मार्गाचा उल्लेख येतो, जो साऱ्या जगातील बौद्धांना माहीत आहे ( 3.2.7.73  भ. ओ. रि. इ. ). पहिल्या स्थानावर अष्टांगिक मार्गाचा उल्लेख या प्रकारे येतो : यज्ञ, अध्ययन, दान, तप, सत्य, सहनशिलता, निग्रह आणि अलोभ तथा दुसऱ्या ठिकाणी हे सांगितले आहे की *अष्टांगेन मार्गेण विशुद्धात्मा समाचरेत् ।*
यांच्यानंतर ज्या अंगाचा उल्लेख येतो त्यात सम्यक संकल्प सुद्धा आहे. जे बौद्धांच्या अष्टांगिक मार्गाचे अंग आहे. एखादं दुसऱ्या ठिकाणी ( 12.211.31-39 ) आपणाला बौद्धांच्या दर्शन शास्त्राचे उदाहरण सुद्धा मिळतात. प्रतित्यसमुत्पादाचे काही तत्वज्ञान असण्याचे संकेत सुद्धा प्राप्त होतात. सतराव्या शतकातील टीकाकार नीलकंठ यांनी त्या पदांची व्याख्या प्रतित्यसमुत्पादाच्या सर्व निदानांची विस्तृत नामावली देऊन केली आहे.

एके ठिकाणी आपणाला नारदा द्वारे नारायणावर लादल्या गेलेल्या विशेषणांमध्ये किती तरी अशी नावे मिळतात जे निश्चितपणे बौद्ध देवतांचे नावे आहेत. जसे की ब्रह्मपुरोहित, ब्रह्मकायिक, महाराजिक, चातुर्महाराजिक, आभासुर, भहाभासुर..याम्य, महायाम्य, संज्ञासंज्ञ, तुषित, महातुषित, परिनिर्मित, वशवर्ती ( भ्रमवश बौद्ध नाव परिनिर्मित - वशवर्ती साठी ), अपरिनिर्मिन, अवशवर्ती ( बौद्ध नाव अपरिनिर्मितवशवर्ती साठी ) इत्यादी. ही गोष्ट स्पष्ट आहे की टीकाकाराला हे माहीत नाही की ही नावे बौद्ध देवतांची आहेत आणि त्यांची काल्पनिक व्याख्या करण्याचा प्रयत्न करतात. एक मजेशीर उदाहरण असे आहे की 'संज्ञा' ची व्याख्या करताना त्याला तो यमपत्नी लिहितो.

सभापर्वात ( भ. ओ. रि. इ. 29, 47 ) ज्यात ग्रंथकार दक्षिणापथात सहदेवाच्या विजयाचे वर्णन करतो, तेथे 'पाखण्डञ्च ( भ. ओ. रि. इ. मध्ये पिच्छण्ड' पाठ मिळतो ज्याचे अर्थ अस्पष्ट आहेत ) करहाटकम् चे उल्लेख मिळतात. असे वाटते की हे उदाहरण मुंबई प्रांताच्या सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध व्यापारी केंद्र वर्तमान कराड बद्दल दिले गेले आहे जेथे आजही शहरापासून थोड्याच अंतरावर बौद्ध लेण्या आहेत ज्यांना ह्या लेखाच्या लेखकानी स्वतः काही वर्षांपूर्वी पाहिल्यात.

अंगुत्तर निकायाच्या सत्तसुरियसुत्तामध्ये या मतांचे वर्णन मिळते की विश्वाच्या प्रलय चक्राच्या अंतात सात सूर्य प्रकट होतील. याच्याशी मेळ असणारा एक श्लोक आपणाला वनपर्व ( भ. ओ. रि. इ. 186, 58 ) मध्ये मिळतो. त्याच पर्वात आलेल्या 'एडुक' या शब्दाची व्याख्या पश्चिमी बौद्ध विद्वान स्तुपांसोबत करतात, परंतु दिवंगत धर्मानंद कोसंबी यांनी आपल्या पुस्तकात ' हिंदी संस्कृती आणि अहिंसा' यात एडुक हा मुस्लिम 'इदगा' शी संबधीत असल्याचा हवाला दिला आहे ना की बौद्ध स्तुपांशी.
सामान्य जणांच्या सामान्य देवतांचा हवाला सुद्धा आपणास मिळतो ज्यांचा उल्लेख महानिद्देस 1.89 मध्ये ( सुत्तनिपाताची अट्ठकथा ) आला आहे. उदाहरणासाठी वासुदेव च्या अनुयायींच्या सोबत ज्यांचे वर्णन कित्येक अध्यायात येते, आपणास 'मनिभद्र' ( वनपर्व 61,123 भ. ओ. रि. इ. ) 'पूर्णभद्र' ( यासाठी भ. ओ. रि. इ. 31, 12 मध्ये 'पूर्णदंस्ट्र' ) यांची नावे मिळतात. 5.97.12.14 भ. ओ. रि. इ. मध्ये गोव्रत चे उदाहरण मिळते.

शब्द, पद आणि कथन या दृष्टीने महाभारत आणि बौद्ध ग्रंथ यांत शेकडो समान स्थळ मिळतात, ज्याचे कारण हे सुद्धा असू शकते की ते एकाच साहित्यिक रचनेतून घेतले गेले असावेत. या गोष्टीचा उल्लेख करणे हा या लेखाचा उद्देश नाही आहे.

- धर्मदूत मे - जून 1960

( हा लेख सन 1956 मध्ये सिलोन येथील 'दि बुद्धिस्ट' या मासिकात प्रकाशित झाला होता )
01/01/2020
Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel