दि मॅनेजमेंट गुरू चक्रवर्ती सम्राट अशोक त्यांची राज्य आणि शेतकरी विषयक धोरण भाग -3



बळी हा बहुजनांचा राजा होता, असे विधान सर्रास केले जाते. मुळात वर्ण व्यवस्था ही कर्माधीष्ठीत होती. राजा हा राज्याचा पालक, शासक आणि संरक्षक या भूमिकेत असल्यामुळे तो कोणत्याही (अगदी रावणा सारखा जन्माने ब्राम्हण वर्णाचा असला तरीही) वर्णाचा असला तरी त्याला क्षत्रिय समजले जाई. जर बहुजन म्हणजे शूद्र हेच अभिप्रेत असेल, तर क्षत्रिय वर्णाचा राजा हा बहुजन समाजाचा कसा ठरू शकतो?अर्थात मराठा चळवळ चालविणारे नेते बहुजनांची व्याख्या ब्राम्हणेतर समाज अशी करतात. पण तार्किक दृष्ट्या हे तरी खरे कसे मानायचे? मध्य युगीन इतिहास नीट पाहिला तर ब्राम्हण समाजा इतकीच क्षत्रिय (मराठा) समाजाने ही शूद्र समाजावरील (दलित समाज) अन्यायात भागीदारी नोंदविली आहे. मुळात अस्पृश्यता हा सामाजिक कलंक आहे. तो पाळणारे सगळेच दोषी इतकी परखड मांडणी सोयीची नसल्यामुळे मग इतिहास अर्धवट सांगून सत्य दडपले जाते. मग प्रश्न उरतो की बळी कोण होता?


बळी हा विरोचनाचा पुत्र, सुप्रसिद्ध विष्णू भक्त प्रल्हादाचा नातू आणि हिरण्य कश्यपू या असुर सम्राटाचा पणतू होता. इतकेच नव्हे तर पुढे महाभारत काळात बळी राजाचा मुलगा बाणासुर देखील दिसतो. असूर हा शब्द मूळ संस्कृत आहे. सूर (देव) या शब्दाचा विरुद्ध अर्थ असूर असा नव्हे तर असूर म्हणजे वीर्यवान किंवा प्राण शक्ती असणारा होय. वेदां मध्ये काही ठिकाणी देवराज इंद्राला देखील ‘असूर’ म्हणून गौरविले आहे. गंमत म्हणजे देव, असुर, नाग आणि मानव हे सर्वच कश्यप ऋषींचे पुत्र होते. ब्रम्हदेवाने सृष्टी निर्मिती केल्यानंतर त्यांचे मानस पुत्र मरीचि ऋषींपासून कश्यपाचा जन्म झाला. कश्यपाने दक्ष या प्रजापतीच्या (गौरीचा पिता आणि शंकराचा सासरा) १७ मुलींशी विवाह केला. ज्यातील अदिती या पत्नीपासून आदित्य. इंद्र आणि आपल्या लेखातील वामन या विष्णूच्या अवताराचा जन्म झाला. दिती पासून दैत्य, दनु पासून दानव,अनिष्ठापासून गंधर्व, सुरसापासून राक्षस, मुनिपासून अप्सरा, विनता पासून गरुड आणि अरुण (सूर्याचा सारथी), कद्रूपासून नाग, याशिवाय काष्ठा, इला, क्रोधवशा,सुरभि, सरमा, ताम्रा, तिमि, पतंगी, यामिनी या इतर पत्नी होत. उर्वरित समस्त जीव सृष्टी यांच्यापासून निर्माण झाली असे उल्लेख वेद, पुराणे आणि ब्राम्हण्ये यांमध्ये मिळतात.थोडक्यात ही कथा सत्य मानली तर वरील सर्व वंश एकाच व्यक्तीपासून सुरू झाले असे मानावे लागेल आणि जर ही कथा मान्य नसेल तर मग त्यातील सोयीची व्युत्पत्ती घेऊन आपल्याला हवे ते कुतर्क देणे तरी थांबले पाहिजे.


आता मूळ बळी राजाच्या कथेकडे वळू. बळी राजाचा वंश वृक्ष पाहिला तर त्याचे पणजोबा हिरण्य कश्यपू, आजोबा सुविख्यात विष्णू भक्त प्रल्हाद आणि वडील विरोचन हे होते. बळीराजाचा मुलगा बाणासुर हा महान शिवभक्त आणि श्रीकृष्णाचा नातू अनिरुद्ध याचा सासरा होय. म्हणजे रामायणपूर्व काळ ते महाभारत युद्धोत्तर काळ एवढ्या प्रचंड दीर्घ कालावधीत बळीराजा किंवा त्याचा वंश डोकावतो. मग हा वंश कोणीतरी वेगळा, शोषित किंवा अन्याय ग्रस्त होता असे कसे मानायचे?


आता थेट बळी राजाचे चरित्र पाहू. भारतीय इतिहासातील अत्यंत न्याय प्रिय, प्रजा हित दक्ष, दानशूर, सत्य वचनी आणि पराक्रमी राजांमध्ये बळीची गणना होते. हिरण्य कश्यपू हा देखील अतिशय पराक्रमी सम्राट होता. तत्कालीन बहुतांश भारत देशावर त्याची सत्ता असली तरी तो अतिशय एककल्ली आणि संशयी होता. प्रल्हाद आख्यानातून त्याचा हा संशयीपणा विशेषत्वाने डोकावतो. एवढे असले तरी त्याची पत्नी कयाधू ही गर्भवती असताना तिच्या सुरक्षेसाठी देवर्षी नारदाच्या आश्रमात हिरण्य कश्यपूच्या सांगण्या वरून राहात होती. याचाच अर्थ देव आणि असुर यांच्यातील वैर हे वांशिक नव्हे तर सत्तानुषांगिक असावे. पुढे हिरण्य कश्यपूने आपलाच पुत्र प्रल्हाद याच्यावर अनेक अत्याचार केले. अखेर विष्णूने नरसिंह अवतार धारण करून हिरण्य कश्यपूचा वध केला. यावेळी विष्णूने प्रल्हादाला वचन दिले की, यापुढे तुझ्या वंशातल्या कोणाचा ही मी वध करणार नाही. विरोचना बद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. मात्र बळी आणि बाणासुर या दोघांनाही वामन आणि श्री कृष्णाने विष्णूच्या वचनाचा मान राखून जिवंत ठेवले. इतकेच नव्हे तर त्यांच्याशी नातेसंबंध जोडले.


बळी राजाने आपल्या कार्य काळात तब्बल ९९ अश्वमेध यज्ञ केले. एक अश्वमेध यज्ञ सुमारे वर्षभर चालणारा असतो. याचाच अर्थ बळीने दीर्घकाळ पृथ्वीवर राज्य केले. या यज्ञाचे वैशिष्ट्य म्हणजे यज्ञाची दीक्षा घेतल्या नंतर एक अश्व सोडला जायचा. हा अश्व ज्या राज्यांत जाईल, त्यांनी एकतर यज्ञ करणाऱ्या सम्राटाचे मांडलिक व्हावे, अथवा त्याच्या सैन्याशी युद्ध करून त्यांना पराभूत करावे. तब्बल ९९ यज्ञ करणाऱ्या बळीराजाला त्या दरम्यान कोणी आव्हान देणारे होते, असे दिसत नाही. किंबहुना या काळात त्याचे देवांशी युद्ध झाल्याचीही नोंद नाही.


शंभरावा यज्ञ करताना मात्र बळीचा उद्देश स्वर्गावर आपली सत्ता प्रस्थापित करणे हा होता. साहजिकच त्यामुळे देवांच्या गोटात चिंता पसरली. याचाच अर्थ तोपर्यंत देव आणि असुर या दोन्ही राज्यांत निकराची लढाई करणे दोन्ही पक्षांनी टाळले होते. आधुनिक भाषेत बोलायचे तर शक्ती संतुलन करून आपापले प्रभाव क्षेत्र निर्माण करण्याचा दोन्ही पक्षांचा उद्देश असावा. मात्र ९९ यज्ञ करून इतर असंख्य राजांना आपल्या कवेत घेणारा बळी राजा आता सामर्थ्यवान झाला होता आणि त्याचा प्रतिकार करण्याची क्षमता नसल्यामुळे देवांनी ब्रम्हदेव आणि पुढे विष्णूकडे धाव घेऊन हस्तक्षेपाची विनंती केली. विष्णूने आपल्या पूर्वीच्या वचनाचे स्मरण ठेवून आणि बळीच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी कश्यप आणि अदिती यांच्या पोटी वामन या बटू रूपाने अवतार घेतला. नेमका हाच संदर्भ आपल्या सोयीने वापरला जातो. वामन हा ब्राम्हण होता असा कांगावा करून त्याने शेतकऱ्यांच्या राजाला मारले असे सांगतात. पण असुर काय किंवा देव काय सगळे याच कश्यपाचे वंशज होते. म्हणजे वामन हा यांच्या सोयीने नव्हे तर कर्माने ब्राम्हण होता. तसेच बळी राजा हा कर्माने क्षत्रिय होता. हे दोघे ही एकाच वंशात जन्माला आले होते. इतकेच नव्हे तर बळी राजाचा यज्ञ करणारे असुर कुलगुरु श्री शुक्राचार्य आणि इतर ऋत्विज हे ब्राम्हण नव्हते काय? मग आपल्याला अर्धवट इतिहास का सांगितला जातो?


पुढे वामनाने बळीच्या यज्ञ स्थानी येऊन बळीकडे दान मागितले. इतक्या तेजस्वी बटूला पाहून शुक्राचार्यांना तोच विष्णू असल्याचा संशय आला. त्यांनी तसे बळीला बोलून दाखवले. मात्र बळीने शुक्राचार्यांना सांगितले की, “प्रत्यक्ष भगवान विष्णू माझ्या द्वारी याचक म्हणून आले हाच माझा मोठा सन्मान आहे. मी त्यांना नकार देणार नाही.” वामनाने तीन पदे भूमी मागितली. जिचे दान बळीने देऊ नये म्हणून ब्राम्हण शुक्राचार्य बळीने उदक सोडण्यासाठी घेतलेल्या झारीत जाऊन बसले. वामनाने झारीच्या तोटीमध्ये दर्भ घालून शुक्राचार्यांना तेथून बाजूला केले आणि आपल्या हातावर उदक घेऊन बळीला आपले वाचन पाळण्यास सांगितले. म्हणजेच पुन्हा एकदा एक ब्राम्हण ऋषी बळीचे कथित अध:पतन टाळण्यासाठी झटला. मग आता कथित बहुजन नेते शुक्राचार्यांची पूजा करणार का? गंमत म्हणजे समस्त पृथ्वीचा सम्राट इतका सहजपणे एका ब्राम्हण बटूच्या कपटाला भूलेल, इतका भोळा असू शकेल का? किंबहुना त्याला समोर कोण आहे याची जाणीव होती, हे आपण सोयीस्करपणे कसे विसरू शकतो? आणखी एक बाब म्हणजे हा सगळा प्रसंग सुरू असताना यज्ञ मंडपात केवळ वामन, शुक्राचार्य आणि बळी एवढेच नसणार. इतर राजे, सरदार आणि अन्य मंडळी तिकडे असलीच पाहिजेत. त्यांनी बळीला आपल्या संकल्पापासून परावृत्त का केले नाही? की सगळे क्षत्रिय आणि बहुजन मिळून वामनाला सामील झाले आणि त्यांनी बळी सारख्या महान राजाचा काटा काढला, असे मानायचे?


पुढे वामनाने भव्य रूप धारण करून पहिल्या पावलाने समस्त पृथ्वी, दुसऱ्या पावलाने स्वर्ग आणि इतर लोक पादाक्रांत केले. बळीचे राज्य इतके प्रचंड असताना वामनाने निमिषार्धात हे कसे काय केले? एकतर ही खरोखरच आपल्या बुद्धीला न उमजलेली दिव्य लीला असावी किंवा बळीच्या राज्यातले त्याचे उर्वरित विरोधक वामनाला मदत करीत असावेत. एवढे होऊन मग वामन बळीला जिवंत का सोडतो? पाताळाचे राज्य कसे देतो? तत्कालीन प्रथे प्रमाणे अशा व्यक्तीला त्याने ठार मारणे भविष्याच्या दृष्टीने अगदी आवश्यक नव्हते काय? विशेषत: सर्व परिस्थिती अनुकूल असताना वामनाने तसेच करणे अपेक्षित होते. आधुनिक भाषेत सांगायचे तर क्रांतीला कारण ठरू शकणाऱ्या नेत्याचा शक्य तितक्या लवकर काटा काढला जातो.


आमचे बहुजनवादी नेते नेमके हेच तर सांगू पाहतात. वामनाने बळीला राज्य वगैरे काहीही दिले नाही. त्याला कपट करून मारले. पण संपूर्ण आख्यानात तसा संदर्भ डोकावत नाही. उलट वामनाने बळीच्या औदार्यावर खूष होऊन देवांचा विरोध असताना देखील त्याला पाताळाचे राज्य दिल्याची नोंद मूळ कथेत आहे. पुन्हा सप्त पाताळांचे राज्य हे स्वर्गा पेक्षा ही ऐश्वर्य संपन्न असल्याची नोंद अनेक पुराणे आणि भागवता सारख्या ग्रंथात अतिशय ठळकपणे आहे. इतकेच नव्हे तर वामनाने बळीला स्वत:हून दिलेल्या वरदाना नुसार या पुढील इंद्र पद बळीलाच त्याच्या पुण्य प्रभावामुळे व न्याय प्रियतेमुळे दिले. या वचनाची पूर्तता होई पर्यंत वामनाने बळीच्या द्वारी थांबावे, असा ही करार झाला. विरोधक म्हणतील कशा वरून हे वरदान बळीने मागितले असेल? बळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कशा वरून वामनानेच हे कारस्थान रचले नसेल? याच्या अगदी उलट तर्काने विचार केला तर कशा वरून बळीने वामना कडून स्वत:ला देवांपासून सुरक्षित केले नसेल?


द्वारपाल हा रक्षक असतो. नेमक्या त्याच पदी वामनाची नियुक्ती कशी? प्रधान, कुलगुरू, सेनापती किंवा तत्सम पदांवर वामन आपली वर्णी लावू शकला नसता काय? बळीचा काटा काढण्यासाठी ही पदे जास्त उपयोगी ठरली असती. थोडक्यात आपण पाहू तसे आपल्याला दिसेल. शिवाय वामनाने मारलेल्या असुराला ब्राम्हणांनी चिरंजीव पद कसे द्यावे? तो युगानुयुगे जिवंत आहे, हे कसे मानावे?

क्रमशः...



Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel