धर्माआड होणारे स्त्रीचे वर होणारे अन्याय अत्याचार..!


 स्ञियांवर अत्याचार का होतात किंबहुना हे कधी थांबेल?

अतिशय नाजुक विषय हाताळण्याचा एक मार्मिक प्रयत्न. स्ञियांवर होणारे अत्याचार ह्यात भेदभाव, घरगुती हिंसा,बलात्कार, अपमानास्पद वागणूक ह्या सर्व दृष्टीनं विचार करुन मी मतं मांडण्याचा प्रयत्न केला आहे. कदाचीत माझी मतं पटणार नाहीत.असो.

माझ्या मते सर्वात महत्वाचं सर्वधर्मसमभाव हे म्हणण्यापेक्षा सर्व स्ञी— पुरुष एक समान ही मानसिकता असणं खुप गरजेचं... दुसरं स्ञी हीच स्ञीची वैरीण असते असं म्हणतात त्यात बदल करणं तितकचं गरजेचं. स्ञी ही त्यागमुर्ती, सहनशील ही जी व्याखा आहे तीत बदल करणं. किंबहुना समाज स्विकारेल की नाही हा विचार करुन झालेल्या अत्याचारावर आवाज न उठवता गप्प रहाणं. ही जी डोक्यात ठाण मांडुन बसलेली मानसिकता ह्यात बदल करणं नितांत गरजेचं...

स्ञियांच्या बाबतीत अगदी लहानपणापासुनच तिच्या राहणीमानावर, विचारांवर, तिच्या करीअर वर कळत नकळत बंधन ही लावलीच जातात. बर्‍याच ठिकाणी काही अंशी मुलगा अन् मुलगी मध्ये फरक हा केलाच जातो. मुलगा हा वंशाचा दिवा, घराण्याचा वारसदार ही जी पिढ्या न् पिढ्या असलेली मानसिकता मनुष्यानीच निर्माण केली आहे किंबहुना पुरुष संस्कृतीनं म्हणायला हरकत नाही. ही विचारसरणी स्ञियांच्या डोक्यात ठाण मांडुन बसलेली आहे.ह्याला मोडता तर घालु शकतो.मुली ही मुलां इतक्याच कर्तबगार असतात. मुलींनी केलेल्या कर्तुत्वामुळे आई—वडीलांचेही नाव निघतेच ना? एका दृष्टीनं बघितलं तर घराण्याची ती सुध्दा वारसदार ठरते. म्हणूनच सर्वधर्मसमभाव म्हणण्यापेक्षा सर्व स्ञी—पुरुष एकसमान म्हणणं जास्त योग्य ठरेल...

सासरी जाच होत असेल तर बर्‍याच ठिकाणी समाज काय म्हणेल ह्याचा विचार करुन मुलीला पाठिंबा देण्यापेक्षा घे निभाऊन, होईल सुधारणा, आपल्या लहान बहीण भावांचा विचार कर हेच आई शिकवत असते.फारकत झाली तर तुला जग एकटं जगु देणार नाही.

आपला मुलगा दारु पिऊन सुनेला मारहाण करत असेल तर सासु ही गप्पच बसते.ती फक्त आईच असते पण एक स्ञी म्हणून विचार करत नाही. कन्या भृण हत्यालाही स्ञीचं जबाबदार असते. बर्‍याच ठिकाणी नातवासाठी पुरुषांपेक्षा स्ञीच स्ञीला छळत असते.

एकाच आॅफीस मध्ये काम करणार्‍या स्ञियांच्या बाबतीतही तेच घडत असते. उच्च वर्गातील स्ञिया ह्या मागासवर्गीय स्ञीचा पदोपदी अपमान करत असतात. किंबहुना तिच्याकडुन स्वताःची सुध्दा कामं करुन घेतात. ती सहन करत असते कारण तिला साथ देणारं कोणीच नसतं किंबहुना घरची परीस्थिती बेताची असेल तर तिला त्या नोकरीची गरज असते. बर्‍याच वेळा पुरुषांच्या घाणेरड्या नजरेलाही तोंड द्यावं लागतं पण त्याची वाच्यता इतर स्ञियांकडे करु शकत नाही कारण त्याच तिचा अपमान करत असतात. एक स्ञीच दुसर्‍या स्ञीच्या राहणीमानावर बोट ठेवत असते..पुरोगामी विचार,खुलं व्यक्तीमत्व असलेल्या स्ञीला दुसरी स्ञी कधीच स्विकारत नाही..उलट ती चेष्टा मस्करीचा विषय असते अन् प्रतिगामीचं रहाणं योग्य वाटतं...एकमेकींच्या आयुष्याची तुलनाच कारणीभुत ठरते ती एकमेकींचा राग, द्वेष अन् मत्सरतेला..

बर्‍याच ठिकाणी मुलगी ही घरातही सुरक्षित नसते.जर नातेवाईकानं शारीरीक छळ केला तर घराची अन् मुलीची अब्रु जाईल हा विचार करुन त्याची वाच्यता केली जात नाही. 

बलात्कार झालेल्या स्ञीची जात, धर्म बघितल्या जातो. बलात्काराचे प्रमाण इतके वाढले आहे की लोकांच्या भावना मरायला लागल्या आहेत. किंबहुना दोन दिवस चर्चा होते अन् नंतर शांतता. पण ठोस निर्णय घेतला जात नाही. बर्‍याच केसेस मध्ये उठविलेला आवाज दाबला जातो तर बर्‍याच केसेस दाबल्या जातात.

स्ञी ही कोणत्याही जाती धर्माची असो तिला न्याय हा मिळालाच पाहिजे ह्यासाठी सर्वांनीच पुढाकार घेतला पाहिजे.

बर्‍याच ठिकाणी आपण स्वताः जाऊ शकत नाही अश्या वेळेस आपण आपली मतं सोशल मिडीयावर मांडु शकतो. म्हणतात ना "Pen is mightier than sword" जर लिहु शकत नाही तर Petition तर sign करु शकतो.

 स्ञियांनी वैचारीक पातळीत बदल अन् पिढ्या न् पिढ्या चालत आलेल्या मानसिकते मधे बदल केला तर स्ञियांवर वाढणार्‍या अत्याचारात थोडाफार तरी बदल होईल. एक स्ञीच दुसर्‍या स्ञीवर होणार्‍या अत्याचारावर आवाज उठवु शकते अन् तिच्यात तेवढी ताकद ही असते. पुरुष संस्कृतीला अन् पुरुषांकडुन होणार्‍या अत्याचाराला स्ञियांनी एकवटुन लढा दिला पाहिजे.त्यासाठीचं मानसिकता बदलली पाहिजे...

५/३/२०२०

वैशाली गरूड,मुंबई

Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel