✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    अशा साजऱ्या व्हाव्यात राष्ट्रपुरुषांच्या जयंत्या / पुण्यतिथ्या!

            ज्यांनी आयुष्यभर आपल्या देशाची, समाजाची सेवा केली आहे, आपले संपूर्ण जीवन देशाला समर्पित केले आहे अशा थोर व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे. ज्यांनी सामाजिक बांधिलकी जाणलि स्वहित न पाहता निस्वार्थपणे कुठलीही अपेक्षा न ठेवता देश सेवेला, समाजकार्याला झोकून दिले अशी व्यक्ती नक्कीच समाज मान्य होते. त्यांनी केलेल्या त्यागाचे स्मरण करण्यासाठी आपण त्यांची जयंती साजरी करणे इष्ट ठरते.

            अशा राष्ट्रपुरुषांच्या जयंती किंवा पुण्यतिथी निमित्त एकत्र आल्यावर त्या माध्यमातून सामाजिक, विधायक कामे समाजाच्या हितासाठी करावयास पाहिजेत. तसेच देशनिष्टा, सामाजिक बांधिलकी, सामाजिक ऐक्य, सर्व धर्म समभाव जोपासला पाहिजे. जयंती म्हणजे नुसते मनोरंजन असू नये. समाज प्रबोधनासाठी जाणकार अभ्यासपूर्ण वक्त्यांची भाषणे असणे आवश्यक आहे.

          यानिमित्त मुलं, विद्यार्थी यांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांच्यातील अंगभूत कला गुण प्रकट करण्यासाठी विविध स्पर्धात्मक विषयांचे आयोजन करावयास हवे. समाजाला बोध घेण्यासारखे कार्यक्रम आयोजित करावयास हवेत. वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, संगीत, कला इत्यादी कलांचे आयोजन करून त्यांना प्रोत्साहन द्यावयास हवे.

         जयंतीनिमित्त सार्वजनिक ठिकाणी झाडे लावणे, समाज हिताचे, सामाजिक सलोखा राखणारे, देश हिताचे कार्यक्रम राबविले पाहिजेत. महापुरुषांना देव मानून अथवा आवतारी पुरुष मानून त्यांची पूजा अर्च्या करण्यापेक्षा त्यांच्या जिवन कार्याचे कर्तृत्वाचे योग्य ते मूल्यमापन करून त्यांचे विचार आचरणात आणले पाहिजेत. जयंती कुठल्याही नेत्याची असो आदर् यांच्या त्यागाचा कार्याचा होतो, धर्माचा नाही याची जाण आपण ठेवली पाहिजे.

           महापुरुषांची जयंती आपण करतो, परंतु त्यानि दाखविलेल्या मार्गावरून, विचारावरून आपण चालतो का? याचा विचार प्रकर्षाने व्हावयास हवा. जयंतीच्या दिवशी आपण मोठमोठ्या लोकांसोबत फोटो काढण्यात गुंततो, पण एक गोष्ट लक्षात ठेवा फोटो काढल्याने माणूस मोठा होत नसतो, तर आपण ज्या विचारावर मातीवर उभे आहोत त्या मातीचं, विचारांचं सोनं कसं होईल याकडे लक्ष द्यावयास पाहिजे.

            धूम धडाक्यात, जोशात, नाच गाणे म्हणत जयंती साजरी केली म्हणजे, आम्ही फार मोठी जयंती साजरी केली असे म्हणताना खेद वाटतो. राष्ट्रपुरुषांनी लिहिलेले किंवा त्यांच्या विचारांची इतर लेखकाने लिहिलेली पुस्तके आम्ही वाचले आहेत का? त्यांचे एखादे पुस्तक आपल्या संग्रही आहे का? इतर जयंती साजरी करतात म्हणून आपणही जयंती साजरी करावयास पाहिजे अशा विचारांना अर्थ नाही.

            नुसता डीजे लावून, नाचून, जय जय कार करून जयंती साजरी करणे म्हणजे या महापुरुषांचा अवमान तर होत नाही ना? याचे भान आपण ठेवले पाहिजे. समाजाला एकच विनंती आहे, राष्ट्र पुरुषांची वैचारिक संपत्ती मोडीत काढू नका, जयंती नाचून नाही, तर महापुरुषांची आत्मचरित्र वाचून साजरी करा.

             जयंतीचा समारोप करताना प्रत्येकाने असा निश्चय केला पाहिजे की, मी समाजासाठी, देशासाठी, गरिबासाठी काहीतरी विधायक काम करेन, ते हि प्रामाणिकपणे कुठलीही अपेक्षा न ठेवता निव्वळ नावासाठी किंवा फोटो काढण्यासाठी समाजसेवा असू नये.

         राष्ट्रपुरुषाविषयी बोलताना तथाकथित वक्ते त्या महापुरुषाविषयी त्यांचे विचार मांडतात, त्यांनी देशासाठी त्याग केला त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. त्यांच्या कार्याविषयी भरभरून बोलतात, परंतु बोलणे वेगळे व त्यांचे विचार आचरणात आणणे वेगळे. याचा सखोल विचार आपण ऐकणाऱ्यांनीही केला पाहिजे 

          बऱ्याच ठिकाणी असे निदर्शनास येते की, ज्या धर्माचा किंवा समाजाचा राष्ट्रपुरुष असेल, त्या समाजाचे अथवा धर्माचे लोक असे जयंतीचे समारंभ घडवून आणतात इतर धर्मियांना अशा जयंती समारंभाबद्दल अधिक उत्सुकता दिसून येत नाही निव्वळ एक औपचारिकता म्हणून ते अशा समारंभास उपस्थित राहतात ते ही आमंत्रण असेल तरच. तर असे होता कामा नये. धार्मिक, सामाजिक कार्यात सर्व समावेशकता असावी. जेणेकरून समाजात एकोपा, एकमेकांबद्दल आदर राहील. आणि हे सर्व आपल्या देशासाठी आवश्यक आहे.


            राष्ट्रपुरुष कोणत्याही जाती धर्माचा असो, त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणे आपले कर्तव्य आहे. सामाजिक समानता जपण्यासाठी राष्ट्र पुरुषांच्या जयंत्या साजऱ्या व्हायलाच पाहिजेत. जेणेकरून पुढील पिढीला त्यांच्याबद्दलची माहिती मिळेल.


           राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा वर प्रेम करणे ठीक आहे परंतु त्यांच्या विचाराकडे दुर्लक्ष करणे म्हणजे समाजाला अधोगतीकडे नेण्यासारखे आहे. उत्सवाच्या नशेत त्यांच्या विचारांची घुसमट होणार नाही याचि दक्षता घ्यावयास पाहिजे. शोभायात्रा काढाव्यात परंतु विचार यात्राच टिकाऊ असतात याचे भान आपण ठेवावयास हवे.

             तसेच भंपक बाजी करणारे कार्यकर्त्यापेक्षा चांगल्या विचारांचे कार्यकर्ते असावेत, असेच कार्यकर्ते टिकाऊ असतात. वाचलेली पुस्तक आणि भेटलेली माणसंच माणसाला हुशार बनवितात याचे भान कार्यकर्त्याने व समाजाने ठेवावे.

             समाजाचा खरा चिंतक कोण? आणि नुसता तोंडपूजेपणा करणारा नेता कोण? हे आपणास आजमवता आले पाहिजे. जशी आपण पुस्तके वाचतो तसा माणूस ही वाचता आला पाहिजे. म्हणून आपल्या व्यथा तिथे मांडा जिथे समाधान मिळेल आणि आपला माथा तिथे टेकवा जिथे स्वाभिमान मिळेल.

           समाजाचा हित साधणारा नेता शोधा, गरजेपुरता समाजाचा उपयोग करून घेणारा नेता नसावा शिकलेल्या माणसाने समाजाला घडविण्याचे व वाढविण्याचे कार्य केले पाहिजे.

       🪔📖🌳👏.

    विलास मारुती अडसुळे

     मेघवाडी, जोगेश्वरी पूर्व, 

     मुंबई 400060. 

     संपर्क- 993059886



    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: