✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    जनआंदोलनाचे-चळवळीचे पुढे काय ?

    भारताने संसदीय लोकशाहीचा स्वीकार केला आहे. संसदीय लोकशाही टिकवण्यासाठी सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष या दोहोंची नितांत जरुरी असते. दुःखाची बाब अशी की, या देशातील सत्ताधारी पक्ष हा अकार्यक्षम व तितकाच नीच आहे. हे विद्यार्थी आंदोलनालाच्या पार्श्वभूमीवर देशातील जनतेच्या अधिक प्रखरतेने लक्षात आले आहे. अनुभवास आले आहे. आणि विरोधी पक्षाने खरे तर जे काम करावयास हवे ते त्या ताकदीने न केल्याने, शेवटी जनतेलाच ती भूमिका पार पाडावी लागत आहे. हे तर सर्वाधिक दुःखद आहे.

    Dr Babasaheb Ambedkar thoughts on Democracy and Political Parties

    सद्यस्थितीत सत्ताधारी पक्ष व विरोधी पक्ष हे दोन्हीही भारतीयांना नकोसे वाटत असले तरी संसदीय लोकशाही यंत्रणा टिकविण्यासाठी विरोधी पक्षाची गरज आहे. जनआंदोलनाच्या भूमिकेतून निर्माण झालेली तिसरी जनशक्ती ही जोवर संरचनात्मक, संघटनात्मक होत नाही, त्यास पक्षसंघटनेचे मूर्त रूप देण्यात येत नाही तोवर ती संसदीय लोकशाही प्रणालीला कार्यान्वित करण्यास उपयोगी होऊ शकत नाही. कारण तोवर ती केवळ एक चळवळ असते. आणि राज्यकारभार चालवायला गरज असते ती पक्षसंघटनेची ! चळवळीने फार तर अंकुश ठेवता येईल. तो ही दीर्घकालीन कार्यक्रम असेलच असेही नाही. तो प्रासंगिक असतो. 


    आणि म्हणूनच श्री. गांधींना आणि बाबासाहेबांना या देशात गतकाळात राबविलेल्या चळवळीचे पुढील स्वरूप हे संरचनात्मक, संघटनात्मक, पक्षात्मक हवे होते. पक्ष पद्धतीचे हवे होते. 


    संसदीय लोकशाहीत राजकीय पक्षाची नितांत गरज का?


     'चळवळीला राजकीय स्वरूप कसे प्राप्त होते' यावर बाबासाहेबांनी भाष्य केले आहे. काँग्रेसने जी चळवळ उभारली ती सुरवातीच्या काळात इंग्रजांनी या देशात सुराज्य (Good Governance) प्रस्थापित करावे या मुद्द्यांना धरून उभारण्यात आली होती. परंतु कालांतराने पुढे काँग्रेसने त्यांचे धोरण बदलवून सुराज्य वरून स्वराज्याकडे (Independence) वळविले आणि पुढे १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर श्री. गांधी यांनी काँग्रेसला एक सुज्ञ सूचना केली की, ' काँग्रेसी लोकांनी आता काँग्रेसला (चळवळीस) बरखास्त करून स्वतंत्र संविधानिक भारतात राजकीय पक्ष नव्याने निर्माण करायला हवा. परंतु काँग्रेसने गांधींची ही सूचना धुडकावून लावली व चळवळीस बरखास्त करून नव्याने राजकीय पक्ष निर्माण करण्याचे टाळले. मात्र प्रज्ञावंत बाबासाहेबांना श्री. गांधींनी काँग्रेसला दिलेली ही सूचना अतिशय योग्य वाटते. कारण स्वातंत्र्य मिळविण्यासाठी केलेली चळवळ आणि राज्यघटनेच्या अमंलबजावणीसाठी गरज असणारी राजकीय पार्टी ह्या दोन भिन्न बाबी आहेत. परंतु काँग्रेसने असे न करता, स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सरळसरळ त्यांच्या चळवळीचेच रूपांतर राजकीय पक्षात केले. हे नैतिकदृष्ट्या अयोग्य कृत्य होते. देशाच्या भवितव्यासाठी पूरक नव्हते. काँग्रेसच्या चळवळी विषयी बोलतांना बाबासाहेब म्हणतात, "शांततेच्या प्रस्थापनेनंतर युद्धकाळात उभारलेले सैन्य बरखास्त करावे लागते. याचे कारणही उघड आहे. लढाईच्या काळात सैन्य भरती करतांना योग्य ती पथ्ये पाळलेली नसतात. चांगले वाईट बेफिकीर संधीसाधू अशा सर्व प्रकारच्या लोकांची भरती पलटणीत होत असल्याने तिचा दर्जा खूपच खालावलेला असतो. भारताच्या बाबतीत हे असे सैन्य (काँग्रेस चळवळ) बरखास्त करण्याचे दूरच राहो, उलट त्याने सारी सत्ता हस्तगत केली आहे." यावरून काँग्रेसने राबविलेल्या चळवळीचे रूपांतर जे सरळसरळ राजकीय पार्टीत करण्यात आले ते अतिशय चुकीचे झाले. कारण देशाचा राज्यकारभार चालवण्यासाठी तज्ञ, कार्यक्षम व लायक लोकांची जरूरी असते. अन्यथा देशाचे वाटोळे होऊ शकते हे बॅरिस्टर गांधींना उमगले होते. देशातील जनतेला उत्तरोत्तर त्याचा अनुभव येत होता. बाबासाहेबांच्या तर फार पूर्वीच लक्षात आले होते.


    त्यामुळे श्री. गांधी यांनी काँग्रेसला ज्या तळमळीने सुज्ञ सूचना केली होती की, 'स्वतंत्र भारतात राजकीय पक्षपद्धती असावी', त्या मताशी बाबासाहेब सहमत होते, नव्हे ती संसदीय लोकशाहीची गरजच असते हे त्यांना ठाऊक होते. तेव्हा त्याकडे भारतीयांनी अतिशय गांभीर्याने लक्ष पुरविणे गरजेचे आहे. ज्याअर्थी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर संसदीय लोकशाहीच्या रुजवणुकीकडे आपली वाटचाल सुरू झाली आहे, तेव्हा नागरिक म्हणून भारताची राज्यघटना खऱ्याखुऱ्या अर्थाने राबवायची असेल, देश हित साधायचे असेल, राष्ट्र निर्मिती करायची असेल, दास्यत्व-भूक-भय यांपासून मुक्ती हवी असेल तर राजकीय पक्षपद्धतीमध्ये सत्ताधारी पक्षासह प्रबळ विरोधी पक्षही तितकाच महत्त्वाचा असतो हे एकदिलाने, एकमताने स्वीकारले पाहिजे.


    आणि या सारासार बाबींचा विचार करूनच संविधानिक भारतात, बाबासाहेब आपली वाटचाल करतांना म्हणतात, 

    "भारताची राज्यघटना खऱ्याखुऱ्या अर्थाने राबविण्यासाठी माझा पक्ष 'रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया' हा राहणार असून पक्षाचे मुख्य ध्येय समानता, स्वातंत्र्य व बंधुता हे राहणार आहे." एवढेच नव्हे तर पक्षाच्या वाटचालीसबंधी दिशनिर्देश करतांना म्हणतात,

    "रिपब्लीकन पार्टी आफ इंडिया या पक्षाला मान्य असलेल्या तत्वज्ञानाच्या व उद्दीष्टांच्या पुर्तीसाठी मतदारांची संघटना करावी लागेल." असेही भारतीयांना स्पष्ट बजावून सांगतात. यावरून संविधानाच्या अमंलबजावणीच्या दृष्टीने विचार करता राजकीय पक्षाचे किती अनन्यसाधारण महत्व आहे हे आपल्या लक्षात येते.पक्षसंघटनेविषयी बाबासाहेबांनी अगदीच स्पष्ट मांडणी करतांना म्हटले आहे की, " सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, विशिष्ट ध्येयवादाने प्रेरित होउन मतदारांनी केलेली संघटना म्हणजे पक्ष होय."

    तेव्हा आपला ध्येयवाद कोणता? हे ओळखूनच आजच्या तरुणांनी त्याप्रमाणे पाऊले उचलली पाहिजेत. "Capture the political Power " या बाबासाहेबांच्या दिशानिर्देशात त्यांना अभिप्रेत 'आझादी' (दुःख मुक्ती) दडलेली आहे हे ओळखता आले पाहिजे. ध्येयवादाच्या पूर्तीसाठी अत्यावश्यक बाबींची जुळवाजुळव केली पाहिजे. विरोधी पक्षाची अत्यावश्यकता स्वीकारली पाहिजे. गरज भासल्यास नवनिर्मिती केली पाहिजे. मात्र संसदीय लोकशाहीचीच कास धरली पाहिजे. कारण " व्यक्ती व समाज या दोहोंच्या कल्याणाच्या दृष्टीने ती सर्वोत्तम राज्यपद्धती होय. " असे बाबासाहेबांचे आपणास सांगणेच आहे. हे विसरून चालता येणार नाही. केवळ 'चळवळ' एवढ्यावरच समाधान मानू नये. तार्किक शेवट गाठला पाहिजे. तरच त्यांना उज्वल भविष्य असेन. अन्यथा पुन्हा 'जैसे थे' !


    लेखक - प्रशिक आनंद, नागपूर

    आभार - Ambedkar Movement.in team




    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: